April 19, 2025

 

मुस्लिमांनो, पॉलिटिकल सेक्युलॅरिझम धुडकावून लावा; ओवेसींचं महाराष्ट्रातील मुस्लिमांना आवाहन

 

सेक्युलॅरिझमचे गोडवे आजवर तुमची मते घेण्यात आली. त्यातून तुम्हाला काय मिळालं? या सेक्युलॅरिझमने तुम्हाला काय दिलं? मी केवळ संविधानातील सेक्युलॅरिझमला मानतो. पॉलिटिकल सेक्युलॅरिझमला अजिबात मानत नाही.

मुंबई:दि 11  सेक्युलॅरिझमचे गोडवे आजवर तुमची मते घेण्यात आली. त्यातून तुम्हाला काय मिळालं? या सेक्युलॅरिझमने तुम्हाला काय दिलं? मी केवळ संविधानातील सेक्युलॅरिझमला मानतो. पॉलिटिकल सेक्युलॅरिझमला अजिबात मानत नाही. तुम्हीही हे पॉलिटिकल सेक्युलॅरिझम धुडकावून लावा, असं आवाहन एमआयएमचे नेते असदुद्दीन ओवैसी यानी केलं.

एमआयएमच्या तिरंगा रॅलीची सांगता आज चांदिवली येथील सभेने झाली. या सभेला संबोधित करताना असदुद्दीन ओवैसी यांनी धर्मनिरपेक्षतेच्या मुद्द्यावरून काँग्रेस आणि राष्ट्रवादीवर जोरदार हल्ला चढवला. या शिवाय राज्यातील महाविकास आघाडीवरही त्यांनी जोरदार हल्ला चढवला. कुठे आहे आरक्षण? तुम्ही आम्हाला मतदान केलं नाही. तुम्ही कुणालाही मतदान करावं हा तुमचा हक्क आहे. पण तुम्ही कधीपर्यंत फसवले जाणार आहात. बाबरी मशिद पडल्यानंतर मुंबईत हिंसाचार झाला त्यानंतर तरी तुमचे डोळे उघडायला हवे होते. पण तुम्ही सर्व विसरला, असं ओवैसी म्हणाले.

तुम्हाला धर्मनिरपेक्षता दाखवली गेली. भारतातील मुसलमानांना विचारतो धर्मनिरपेक्षतेने तुम्हाला काय मिळालं? धर्मनिरपेक्षतेने तुम्हाला केवळ घोषणा दिल्या, आश्वासने दिले, पण आरक्षण मिळालं नाही, मशीद मिळाली नाही. मशिद पाडणाऱ्यांनी शिक्षा मिळाली नाही. न्याय मिळाला नाही. पण तरीही आपण धर्मनिरपक्षेतेला भुलतो. केवळ संविधानातील सेक्युलॅरिझमला मानतो. मी पॉलिटिकल सेक्युलॅरिझमला कधीच मानत नव्हतो आणि मानणार नाही. मुसलमानांनो पॉलिटिकल सेक्सुलॅरिझम धुडकावून लावा. तुम्हाला शासन कर्ती जमात बनायचं आहे, असं ओवैसी म्हणाले.

सेक्युलॅरिझम शब्दाने सर्वाधिक धोका दिला

सेक्युलॅरिझम या शब्दाने जेवढा धोका दिला तेवढ्या कोणत्याही शब्दाने दिला नाही. ओवेसी येणार आहेत. त्यामुळे सेक्युलॅरिझमला धक्का पोहोचेल. सेक्युलॅरिझम धोक्यात येईल असं सांगितलं जात आहे. अरे सेक्युलॅरिझमचा ठेका काय तुम्हीच घेतला आहे का? असा सवालही त्यांनी केला.

आमच्याबाबत दुजाभाव का?

आरक्षण आपल्याला हवं आहे. संविधानाने मुलभूत अधिकार दिले आहेत. त्यात सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मागासलेले आहेत त्यांना आरक्षण देण्याची तरतूद आहे. तुम्ही कुणालाही आरक्षण द्या. त्याला आमचा विरोध नाही. पण कोर्टाने सांगितल्यानंतरही आम्हाला आरक्षण दिलं जात नाही असं का? मुसलमानांना एवढा दुजाभाव का? असा सवाल त्यांनी केला.

तरीही धर्मनिरपेक्षतेच्या गप्पा मारणार?

यावेळी त्यांनी मुस्लिम आणि मराठा समाजाचं शिक्षण आणि नोकरीतील प्रमाण आकडेवारीसहीत दाखवून दिलं. तसेच मराठ्यांपेक्षा मुस्लिम किती मागास आहेत हे दाखवून देण्याचा प्रयत्न त्यांनी केला. महाराष्ट्रात 4.9 टक्के मुसलमान पदवीधर आहेत. तर 8.9 टक्के हिंदू पदवीधर आहेत. ख्रिश्चन 22 टक्के पदवीधर आहे. तुम्ही फक्त 4 टक्के पदवीधर आहात. महाराष्ट्रात 22 टक्के मुस्लिम मुले प्राथमिक शाळेत शिक्षण घेत आहेत. माध्यमिक शाळेत 13 टक्के तर दहावी 12 टक्केच मुस्लिम मुलं शिक्षण घेत आहेत. तरीही तुम्ही आरक्षण देत नाही. मुस्लिमांना शिकायचं आहे. पण त्यांच्याकडे पैसे नाही. त्यामुळे ते शिकू शकत नाही. तुम्ही आम्हाला आरक्षण द्या, आमची मुलं बघा शैक्षणिक प्रगती करतील. शिक्षणात आपला टक्का प्रचंड कमी आहे. तरीही कधीपर्यंत धर्मनिरपेक्षतेच्या गप्पा मारणार आहात? असा सवाल त्यांनी केला.

अविवाहित राहू नका

उद्या तुम्ही लग्न करणार आहात. करणार ना? अविवाहीत राहू नका. जेवढे आहेत तेवढ्यांनी देशाला परेशान केलं आहे. त्यामुळे लग्न करा. लग्न केल्यावर डोकंही हलकं होतं, असा चिमटा त्यांनी काढला.

पवार-ठाकरेंना मराठ्यांचा कळवळा का?

महाराष्ट्रात 33 मुस्लिमांकडे जमीन नाही. तर फक्त एक टक्का मराठ्यांकडेच जमीन नाही. हा कोणता न्याय आहे? ही विसंगती असतानाही शरद पवारांना केवळ मराठ्याचा कळवळा का आहे? उद्धव ठाकरेंनाही मराठ्यांचा एवढा कळवळा का? असा सवाल त्यांनी केला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *