गेवराई दि २५ ( वार्ताहार ) अलीकडील पुरामुळे राज्यातील अनेक भागातील शेतकऱ्यांचे संसार उद्ध्वस्त झाले आहेत. शेतीचे नुकसान, घरांचे पडझड, जनावरांचा नाश आणि उपजीविकेची साधनं हरविल्यामुळे या शेतकऱ्यांच्या मुलांच्या शिक्षणावर गंभीर संकट कोसळले आहे. अडचणीच्या काळात शालेय शिक्षण खंडित होणे आणि सुरक्षित वातावरणाचा अभाव ही मुलांच्या भविष्यासाठी चिंतेची बाब ठरत आहे.
याच पार्श्वभूमीवर बालग्राम परिवाराने पुढाकार घेतला असून पूरग्रस्त शेतकऱ्यांच्या पाल्यांच्या निवासी शिक्षणाचे पालकत्व स्वीकारण्याचा निर्णय घेतला आहे. या उपक्रमांतर्गत मुलांना सुरक्षित वसतिगृह, पोषणयुक्त आहार, आवश्यक शैक्षणिक साधनं तसेच संस्कारमय व प्रोत्साहनपर वातावरण उपलब्ध करून देण्यात येणार आहे. मुलांना केवळ शाळेत पाठविणं नाही तर त्यांच्या सर्वांगीण विकासाची जबाबदारी स्वीकारणं हेच या उपक्रमाचं वैशिष्ट्य असल्याचे बालग्राम परिवाराने स्पष्ट केले आहे.
बालग्राम परिवाराचे प्रतिनिधी यांनी सांगितले की, “पूरामुळे उद्ध्वस्त झालेल्या कुटुंबातील मुलांसाठी शिक्षण हीच खरी संपत्ती आहे. त्यांना शिक्षणाची सातत्यपूर्ण संधी मिळाली, तरच ते उद्या सक्षम नागरिक म्हणून समाजात उभे राहू शकतील. त्यामुळे या उपक्रमाला समाजातील दातृत्ववान व्यक्ती, संस्था आणि स्वयंसेवकांनी सहकार्य करावं, ही आमची अपेक्षा आहे.”
बालग्राम परिवाराने गेल्या अनेक वर्षांपासून अनाथ, वंचित व गरजू मुलांसाठी निवासी शिक्षणाच्या माध्यमातून कार्य केलं आहे. आता पूरग्रस्त शेतकऱ्यांच्या मुलांसाठी उचललेलं हे पाऊल त्यांच्या आयुष्यात नव्या आशेचा किरण ठरणार आहे.
समाजातील प्रत्येक घटकाने अशा उपक्रमांना सहकार्य करावं, जेणेकरून पूरग्रस्त मुलांचं हसतं-खेळतं बालपण आणि उज्ज्वल भविष्य पुन्हा फुलू शकेल, असं आवाहन बालग्राम परिवाराने केलं आहे. संपर्क 7588177979
लोकशाहीचा अर्धवट उत्सव: स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा वनवास. [दर्पणदिन विषेश ] भारतीय लोकशाहीच्या सुदृढ वाटचालीमध्ये केंद्र आणि राज्य सरकारइतकेच...