पुरग्रस्तांच्या पाठीशी ‘शिवछत्र’ परिवार खंबीरपणे उभा आहे – अमरसिंह पंडित
पूरग्रस्त भागाची आ. विजयसिंह पंडित आणि अमरसिंह पंडित यांनी पाहणी करून दिला धिर
गेवराई दि.१४ ( वार्ताहार ) सरासरी पेक्षा अधिक झालेला पाऊस आणि नाथसागरातून गोदावरी पात्रात १ लाख १३ हजार क्युसेस पाणी सोडल्याने गेवराई तालुक्यातील गोदावरी नदीकाठच्या गावांमध्ये पूरग्रस्त परिस्थिती निर्माण झाली असून शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. जयभवानी सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन अमरसिंह पंडित आणि आ. विजयसिंह पंडित यांन पूरग्रस्त भागाची पाहणी करून शेतकरी व नागरिकांना धीर दिला. पुरामुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे करून शासकीय मदत मिळवून देण्याचे आश्वासन त्यांनी यावेळी दिले. काळजी करू नका शिवछत्र परिवार तुमच्या पाठीशी आहे,अशी ग्वाही त्यांनी यावेळी देऊन प्रशासकीय अधिकाऱ्यांना सुचना केल्या, यावेळी तहसीलदार संदीप खोमणे, भाऊसाहेब नाटकर यांच्यासह महसूल विभागाचे कर्मचारी, संबंधित गावातील पदाधिकारी, ग्रामस्थ आदी उपस्थित होते.
अचानक झालेली अतिवृष्टी, मुसळधार पाऊस आणि पैठण येथील नाथसागरातून सोडण्यात आलेल्या पाण्यामुळे गेवराई तालुक्यातील गोदाकाठावरील गावामध्ये पूरग्रस्त परिस्थिती निर्माण झाली आहे. अनेक शेतकऱ्यांच्या जमिनी पाण्याखाली गेल्या असून शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. जयभवानी सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन अमरसिंह पंडित आणि आ. विजयसिंह पंडित यांनी गोदावरी नदी काठावरील राजापूर, काठोडा, सावळेश्वर, म्हाळस पिंपळगाव, कटचिंचोली यासह गोदावरी नदीकाठच्या गावातील नुकसानीची पाहणी करून पंचनामे करण्याचे निर्देश यावेळी प्रशासनाला दिले.
गेवराई विधानसभा मतदारसंघात काल रात्री अतिवृष्टी झाल्यामुळे शेती आणि पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झालेले आहे. गोदावरी नदी आणि उपनद्यांना पूर आल्यामुळे अनेक ठिकाणी विशेषतः गोदावरी नदीकाठच्या भागांमध्ये अनेक गावांचा संपर्क तुटला असून गेवराई – राक्षसभुवन रस्त्यावरील गंगावाडी नजीकच्या पुलावर अमृता नदीचे पाणी आल्यामुळे या भागातील रहदारी बंद आहे. अनेक ठिकाणी महापुराचे पाणी लोकांच्या घरात गेल्यामुळे शेतीबरोबरच घरांचेही नुकसान झालेले आहे. मागील दोन दिवसांपासून शेतात पाणी साठून राहिल्यामुळे उभ्या पिकांचेही मोठे नुकसान झालेले आहे. त्यामुळे शेती, उभी पिके, पशुधन, शेतातील गोठे, शेतघर यासह वाडी, वस्त्यावरील राहती घरे यांचे अतिवृष्टी, मुसळधार पाऊस आणि महापुरामुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे करण्याचे अमरसिंह पंडित यांनी प्रशासनाला निर्देश दिले.
गेवराई विधानसभा मतदारसंघातील गोदाकाच्या भागांमध्ये सरासरीपेक्षा अधिकचा पाऊस अक्षरशः ढगफुटी सारखा झाल्यामुळे ही परिस्थिती निर्माण झाली. गव्हाणथडी, काळेगाव ता. माजलगाव यासह संपूर्ण गेवराई विधानसभा मतदारसंघात ज्या ज्या ठिकाणी अतिवृष्टी आणि महापुरामुळे नुकसान झालेले असेल त्या सर्व नुकसानग्रस्तांना शासनाकडून नुकसान भरपाई मिळवून देण्याचा प्रयत्न करणार असल्याचे आ. विजयसिंह पंडित यांनी यावेळी सांगितले.