शासनाच्या त्रिसूत्रीनुसार काम झाले तर प्रत्येक गाव समृद्ध बनेल – आ. विजयसिंह पंडित

पंचायत समिती कार्यालयाच्या वतीने गेवराईत मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानाबाबत कार्यशाळा संपन्न

गेवराई दि.९ (प्रतिनिधी) महाराष्ट्र शासनाच्या वतीने १७ ते २१ सप्टेंबर मध्ये मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान राबविण्याची घोषणा करण्यात आली असून या अभियानांतर्गत उत्कृष्ट कार्य करणाऱ्या ग्रामपंचायत, पंचायत समिती तसेच जिल्हा परिषदांची निवड करून त्यांना तालुका, जिल्हा, महसुल विभाग व राज्य स्तरावरील प्रोत्साहनपर पुरस्काराने गौरविण्यात येणार असून शासनाच्या त्रिसूत्रीनुसार काम केले तर हे आपले प्रत्येक गाव समृध्द बनेल असे प्रतिपादन गेवराई विधानसभा मतदार संघाचे आमदार विजयसिंह पंडित यांनी केले.

राज्य शासनाच्या वतीने दिनांक १७ सप्टेंबर ते २१ डिसेंबर या कालावधीत मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान राबवण्यात येणार असून यानिमित्ताने तालुकास्तरीय कार्यशाळांचे आयोजन करण्यात आले होते. या पार्श्वभूमीवर गेवराई येथे तालुकास्तरीय कार्यशाळेचे उदघाटन गेवराई विधानसभा मतदारसंघाचे आमदार आ. विजयसिंह पंडित यांच्या हस्ते संपन्न झाले. या कार्यक्रम प्रसंगी ते बोलत होते.कार्यक्रमाला गटविकास अधिकारी अनिरुद्ध सानप, अभियंता संजीव चोपडे, अतिरिक्त गटविकास अधिकारी डोंगरे, गटशिक्षणाधिकारी शिंदे, सरपंच संघटनेचे अध्यक्ष कालिदास नवले, सिरसदेवीचे सरपंच रवींद्र गाडे यांच्यासह आदींची प्रमुख उपस्थिती होती.

या वेळी पुढे बोलताना आ. विजयसिंह पंडित म्हणाले की, ग्रामविकास, स्वच्छता, हरितीकरण, स्वयंपूर्णता व आदर्श ग्रामनिर्मिती या उद्दिष्टांच्या पूर्ततेसाठी हे अभियान एक महत्वपूर्ण पाऊल ठरणार असून प्रत्येक ग्रामपंचायतीने ही संधी साधून आपल्या गावाला समृद्ध गाव करण्यासाठी प्रयत्न करण्याची गरज आहे. गावातील प्रत्येक योजना, प्रत्येक उपक्रम हा विकासाशी थेट जोडलेला असावा. आशा अभियानाच्या माध्यमातून ग्रामपंचायतींना ही भरघोस निधी मिळत आहे आणि यातून आज ग्रामीण भागातील अनेक गावे समृद्ध बनत आहेत. येणाऱ्या काळात ही शासन स्तरावर अनेक अभियान राबवले जातील यामध्ये प्रत्येक ग्रामपंचायतींनी सहभाग नोंदवत शासनाच्या त्रिसूत्री नुसार काम केले तर आपल्या तालुक्यातील गावे समृद्ध होतील. दरम्यान आता पंचायत समितीमध्ये गावच्या विकासासाठी कुठल्याही गटातटाला येथे स्थान नाही. कुणालाही चांगले काम करताना अडचण येणार नाही, याची मी आमदार म्हणून वैयक्तिक जबाबदारी घेतो. गावच्या प्रगतीच्या वाटचालीत मी सदैव तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहणार आहे.
ते पुढे म्हणाले की, मागील काही काळात पंचायत समितीच्या कामकाजात विस्कळीतपणा दिसून आला होता. मात्र गेल्या दोन वर्षांत आम्ही त्यावर मोठ्या प्रमाणात सुधारणा केल्या आहेत. भैय्यासाहेबांच्या नेतृत्वाखाली पंचायत समितीने एकजुटीने काम सुरू केले असून येत्या काळात बीड जिल्ह्यातच नव्हे तर राज्यात सर्वोत्कृष्ट कामकाज करणारी पंचायत समिती म्हणून गेवराईचे नावलौकिक मिळवू असा विश्वास व्यक्त केला

गावाच्या विकासात सरपंचांची भूमिका अधोरेखित करताना गटविकास अधिकारी अनिरुद्ध सानप म्हणाले की, गावचे खरे नेतृत्व सरपंच करतात. शासनाच्या त्रिसूत्रीचा अंगीकार करून प्रत्येक गावात योजनांची अंमलबजावणी झाली, तर गावाचे सर्वांगीण रूपांतर होऊन खऱ्या अर्थाने समृद्ध गाव निर्माण होईल. म्हणून या अभियानात जास्तीत जास्त ग्रामपंचायतींनी आपला सहभाग नोंदवा असे आवाहन बीडीओ सानप यांनी केले.

या कार्यशाळेत मोठ्या संख्येने सरपंच, ग्रामसेवक, ग्रामरोजगार सेवक, सर्व अधिकारी कर्मचारी यांनी सहभाग नोंदवला होता. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विस्तार अधिकारी रमेश उनवणे यांनी केले तर उप अभियंता संजीव चोपडे यांनी उपस्थितीतांचे आभार मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *