May 3, 2025

गेवराई मतदारसंघात शिवसेनेचा भगवा फडकविल्याशिवाय खांद्यावर घेतलेला धनुष्य खाली ठेवणार नाही –  बदामराव पंडित

शिवसैनिकांशी संपर्कप्रमुख परेश पाटीलांचा शिवसंवाद

गेवराई दि  4  ( वार्ताहार  ) गेवराई विधानसभा मतदार संघातल्या गावागावात शिवसेना आणि घराघरात शिवसैनिक तयार झालेला आहे. सामान्य माणसांच्या बळावरच गेल्या जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीत आपण सत्ता स्थापन केली. यापुढेही मतदारसंघातील प्रत्येक निवडणूक शिवसेनेच्या धनुष्यबाण या चिन्हावरच लढवणार असून, शिवसेनेचा भगवा फडकविल्या शिवाय खांद्यावर घेतलेला धनुष्य खाली ठेवणार नाही असा दृढ विश्वास शिवसेना नेते माजी राज्यमंत्री बदामराव पंडित यांनी व्यक्त केला आहे.

         शिवसंपर्क अभियानांतर्गत कार्यक्रमात गेवराई विधानसभा मतदार संघाचे संपर्कप्रमुख परेश पाटील यांनी जातेगाव व तलवाडा सर्कल मधील शिवसैनिकांशी शिवसंवाद साधला. याप्रसंगी शिवसेना नेते, माजी मंत्री बदामराव पंडित बोलत होते. याप्रसंगी शिवसेना जिल्हा समन्वयक तथा माजी अर्थ व बांधकाम सभापती युधाजित पंडीत, माजी सभापती पंढरीनाथ लगड, जि प सदस्य युवराज डोंगरे, युवानेते रोहित पंडित, युवानेते यशराज पंडित, गीताराम डोंगरे, शिवसेना उपजिल्हाप्रमुख बबलू खराडे, तालुकाप्रमुख कालिदास नवले, शहरप्रमुख शिनूभाऊ बेदरे, तालुका संघटक भागवत आरबड, जय भवानी कारखान्याचे माजी संचालक विनायक पवार, ऍड धर्मेंद्र भोपळे, सर्कलप्रमुख शेख रफिकभाई, महादेव धोंडरे आदींची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी बोलताना शिवसेना गेवराई मतदारसंघ संपर्कप्रमुख परेश पाटील म्हणाले की, माजी राज्यमंत्री बदामराव पंडित यांच्यासारखा अठरा पगड जातींच्या लोकांना सोबत घेऊन, सामान्य माणसाच्या प्रगतीसाठी झगडणारा खरा लोकनेता माझ्या सोबत असल्याने, गेवराई मतदारसंघात शिवसेना वाढवणे आणि बळकट करणे याची मला चिंता वाटत नाही. शिवसेनेचे चार जिल्हा परिषद सदस्य, सहा पंचायत समिती सदस्य आणि सर्वाधिक ग्रामपंचायती ताब्यात घेऊन, विधानसभेच्या निवडणुकीत अपक्ष लढूनही 52 हजारापेक्षा अधिक मते घेणाऱ्या बदामराव पंडित व एकनिष्ठ शिवसैनिकांच्या गेवराई मतदारसंघाचा मी संपर्कप्रमुख आहे, याचा मला अभिमान वाटतो. येणाऱ्या काळात गेवराई तालुक्यात शिवसेनेचा भगवा फडकविण्यासाठी शिवसैनिकांनी ताकतीने कामाला लागावे असे आवाहन संपर्कप्रमुख परेश पाटील यांनी केले. पुढे बोलताना बदामराव पंडित म्हणाले की, गेवराई तालुक्यात कोणी कितीही दिखाऊपणा करू द्या आणि कोणत्याही वल्गना करू द्या, त्याकडे येथील जनता लक्ष देत नाही. फोडाफोडीच्या राजकारणापेक्षा विश्वासाने काम करणाऱ्या नेतृत्वाच्या पाठीमागे उभा राहणारी गेवराई तालुक्यातील स्वाभिमानी जनता आहे. याचा मी कित्येक वेळा अनुभव घेतला आहे. यापुढेही याच विश्वासाने जिल्हा परिषद, पंचायत समितीवर शिवसेनेचाच भगवा फडकेल असा विश्वास बदामराव पंडित यांनी यावेळी व्यक्त केला.
कार्यक्रमास सरपंच भैय्यासाहेब नाईकवाडे, शिवाजीराव चव्हाण, नितिन पवार, बंडू पवार, बाळराजे पवार, सरपंच मुकुंद बाबर, राजाभाऊ खिस्ते, पप्पू चौधरी, जगदीश मस्के, बाळासाहेब आनंदे, महादेव चव्हाण, बंटी भांबरे, अभय पांढरे, अमोल धोंडरे, भैय्या डुकरे, गोरख चव्हाण, राजू महाराज आदींसह शिवसेना पदाधिकारी, ग्रामस्थ व शिवसैनिकांची बहुसंख्येने उपस्थिती होती. आनंदे महाराज, माऊली पवार, जयप्रकाश चव्हाण, बळीभाऊ सराटे, अशोक तौर, अंगद तौर, राजू नाडे, अण्णा गाडे आदींनी उपस्थितांचे स्वागत केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *