शिक्षकांचा गौरव करण्याचे भव्य काम शारदा प्रतिष्ठान करत आहे – इंद्रजित देशमुख
सुजाण नागरिक घडविण्याची किमया शिक्षकच करु शकतो – मा आ.अमरसिंह पंडित
शारदा प्रतिष्ठानचे आदर्श शिक्षक पुरस्कार वितरण सोहळा थाटामाटात संपन्न
गेवराई, दि.5 ( वार्ताहार ) शिक्षकी पेशात आपण आलोय हे आपले भाग्य आहे. येणाऱ्या पिढीला आपण गुणवत्ता पुर्ण शिक्षण दिले पाहिजे. आजचे सर्वात श्रेष्ठ दान हे शिक्षण क्षेत्रात आहे आणि या पवित्र क्षेत्रात शिक्षणाचे पवित्र काम करणाऱ्या गुरुजनांचा गौरव करण्याचे भव्य काम शारदा प्रतिष्ठान करत आहे. जीथे भव्यता आहे तीथेच दिव्यता आहे, आणि तिथेच आपण आदराने झुकले पाहिजे असे प्रतिपादन सुप्रसिद्ध विचारवंत इंद्रजित देशमुख यांनी केले. सुजाण नागरिक घडविण्याची किमया शिक्षकच करु शकतो ती किमया गेवराई तालुक्यात होऊन शिक्षण क्षेत्रात क्रांती घडेल असा विश्वास व्यक्त करुन शिक्षकांनी या दृष्टीने काम करण्याचे आवाहन प्रतिष्ठानचे कार्यवाह अमरसिंह पंडित यांनी केले. शारदा प्रतिष्ठानच्या वतीने आयोजित आदर्श शिक्षक पुरस्कार वितरण सोहळ्यात ते बोलत होते.
माजी आमदार अमरसिंह पंडित यांच्या संकल्पनेतून शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या गुणी गुरुजनांचा गौरव करण्याच्या उद्देशाने मागील सोळा वर्षांपासून शारदा प्रतिष्ठान सातत्याने शिक्षक दिनी आदर्श शिक्षकांना पुरस्कार देवून गौरव केला जात असून प्रतिष्ठानचा १७ वा आदर्श शिक्षक पुरस्कार वितरण समारंभात शुक्रवार दिनांक ५ सप्टेंबर शिक्षकदिनी र.भ. अट्टल महाविद्यालच्या गोदावरी सभागृहामध्ये मोठ्या थाटामाटात संपन्न झाला. या समारंभाला सुप्रसिध्द विचारवंत तथा व्याख्याते इंद्रजित देशमुख, शारदा प्रतिष्ठानचे कार्यवाह अमरसिंह पंडित, आ. विजयसिंह पंडित, बाजार समितीचे सभापती मुजीब पठाण, उपसभापती विकास सानप, प्रतिष्ठानचे सचिव भाऊसाहेब नाटकर, निवड समितीचे अध्यक्ष नारायणराव मोटे, सरपंच परिषदेचे जिल्हाध्यक्ष कालिदास नवले, शिक्षक पतसंस्थेचे विष्णू खेत्रे, जेष्ठ शिक्षण विस्तार अधिकारी प्रविण काळम, रिपाईचे तालुकाध्यक्ष किशोर कांडेकर, जालिंदर पिसाळ यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात अमरसिंह पंडित म्हणाले की, गेवराई तालुक्यातील शिक्षण क्षेत्रात गुणवंत शिक्षकांचा सन्मान शारदा प्रतिष्ठानगेल्या सोळा वर्षांपासून करत असून या स्पर्धेच्या युगात टिकण्यासाठी निकोप वातावरणात स्पर्धा झाली पाहिजे. कृषी पदवीधारक तरुणांनी आपल्या ज्ञानाचा उपयोग आपल्या भागात कृषी क्षेत्रात करुन उत्पादन वाढ झाली तर तो खरा चमत्कार असेल. खाजगी शाळापेक्षाही जिल्हा परिषदेच्या शाळेत चांगले काम होत असल्याचे गौरवोद्गार त्यांनी काढले.
कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी इंद्रजित देशमुख यांनी आपल्या चि़तनांतून विचारांची पेरणी केली. आज माणूस हिंसेकडे वळतो आहे त्याला प्रेम, मानवता, आदर या बाबी समजावून सांगून त्याला माणूस म्हणून कसे जगता येईल यावर शिक्षकांनी किमी केले पाहिजे. आपण शिक्षक झालो हे आपले भाग्य आहे आणि या शिक्षकांच्या पाठीवर कौतुकाची थाप मारण्याचे काम शारदा प्रतिष्ठानच्या माध्यमातून अमरसिंह पंडित करत आहेत. थोर विभूतींकढून मिळालेला दिव्य वारसा आणि संस्कृतीची पताका आता आपल्या खांद्यावर आहे, ती आपण पुढे सक्षमपणे घेऊन गेले पाहिजे असेही ते म्हणाले.
प्रातिनिधिक स्वरूपात सत्काराला उत्तर देताना आदर्श शिक्षक तात्यासाहेब मेघारेम्हणाले की , शिक्षकांच्या गौरवा बरोबरच शारदा प्रतिष्ठान गेल्या २३ वर्षांपासून समाज हित डोळ्यासमोर ठेवून काम करत आहे. आदर्श पुरस्कार प्राप्त शिक्षकांची निवड करण्याचे काम निवड समिती पारदर्शक करत असून समिती सार्वभौम आहे. यात शिवछत्र परिवाराचा हस्तक्षेप नसतो. त्यामुळे या पुरस्कारांना विशेष महत्त्व आहे असेही ते म्हणाले.कार्यक्रमाचे सुत्रसंचलन माधव चाटे यांनी केले तर उपस्थितांचे आभार मानले. कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीताने करण्यात आली. यावेळी कार्यक्रमाला शिक्षक, प्राध्यापक, विद्यार्थी व शिक्षणप्रेमी नागरीक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या कार्यक्रमात जि.प.प्रा.शाळा, धुमेगांव येथील सहशिक्षक विठ्ठल देशमुख, जि.प.प्रा.शाळा, मोरे वस्ती, राजपिंप्री येथील सहशिक्षक कैलास पट्टे, जि.प.प्रा.शाळा, गुळज येथील सहशिक्षक भगवान मोरे, जि.प.प्रा.शाळा, हिवरा बु., ता. माजलगांव येथील सहशिक्षक ओमप्रकाश आगे, जि.प.प्रा.शाळा, सांडरवण, ता. बीड येथील सहशिक्षक बबन नांदे, जि.प.प्रा.शाळा, पाचेगांव येथील सहशिक्षिका पुष्पांजली दुधाळ, जि.प.प्रा.शाळा, मारफळा तांडा येथील सहशिक्षक विश्वभुषण सोनवणे, जि.प.माध्यमिक शाळा, तलवाडा येथील सहशिक्षक सतिष खेडकर, शारदा विद्या मंदिर, गेवराई येथील सहशिक्षक दादाराव काकडे, जि.प.माध्यमिक उर्दु (मुलींची) शाळा, गेवराई येथील सहशिक्षक महंमद इलियास आणि विशेष शिक्षक म्हणुन जि.प.प्रा.शाळा, केकतपांगरी येथील सहशिक्षक डॉ. तात्यासाहेब मेघारे
या अकरा आदर्श शिक्षकांचा सन्मानचिन्ह, प्रमाणपत्र, शालश्रीफळ देवून सपत्नीक गौरव करण्यात आला.