सर्व अतिक्रमण धारकांना हक्काचा पिटीआर मिळवून देऊ- आ विजयसिंह पंडित

गेवराईतील अतिक्रमण धारकांना पीटीआरचे वाटप

 

गेवराई दि.8 ( वार्ताहार ) गेवराई शहरातील अतिक्रमणधारकाचा पी टी आर चा प्रश्न गंभीर होता. अतिक्रमण धारकांना न्याय मिळाला पाहिजे ही सर्वांची भावना होती. शिवछत्र परिवाराने शासन दरबारी पाठपुरावा करून हा प्रश्न सोडवला, हे खरे असले तरी आपण यात श्रेय घेणार नाही. आपल्या सर्वांच्या संघर्षाचे हे फलित आहे. यापुढील काळात उर्वरित अतिक्रमण धारकांनाही हक्काचा अधिकृत पिटीआर उपलब्ध करून देऊ असे प्रतिपादन आ. विजयसिंह पंडित यांनी केले तर विरोधक सध्या आपण करीत असलेल्या कामाचा अपप्रचार करून राजकारण करत आहेत, पंधरा – वीस वर्षे सत्ता असताना ज्यांना शहरातील प्रश्न सोडविता आले नाहीत त्यांना आता बोलण्याचा अधिकार नाही असा टोलाही त्यांनी विरोधकांना नाव न घेता मारला.

गेवराई नगरपालिकेच्या वतीने संजयनगर येथील अतिक्रमण धारकांना पिटीआर चे वाटप, लाड पागे समितीच्या शिफारशीनुसार सफाई कामगारांच्या वारसांना नियुक्ती आदेशाचे वाटप आणि नगर परिषदेच्या व्हॉट्सॲप चॅटबॉट सेवेचा शुभारंभ आ. विजयसिंह पंडित यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी शिवशारदा मल्टिस्टेटचे संस्थापक अध्यक्ष जयसिंग पंडित, भवानी बॅंकेचे अध्यक्ष बप्पासाहेब मोटे, मुख्याधिकारी विक्रम मांडुरके, सभापती मुजीब पठाण, माजी नगरसेवक महेश दाभाडे, विनोद सौंदरमल, शेख खाजा भाई, दीपक आतकरे, एस. अन्सारी, राधेशाम येवले, शांतीलाल पिसाळ, रिपाइंचे किशोर कांडेकर, कडुदास कांबळे, भास्कर काकडे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.

यावेळी बोलताना आ. विजयसिंह पंडित म्हणाले की, विरोधकांनी नगरपरिषदेचा स्वार्थासाठी वापर केला त्यांच्या काळात अतिक्रमण धारकाचा प्रश्न प्रलंबित ठेवला, अनुकंपाधारकांना नियुक्ती पत्र देण्यासाठी प्रयत्न केले नाहीत. प्रत्येक वेळी राजकारण करण्याचा प्रयत्न केला. अतिक्रमीत जागेवर गाळे काढून भाडे खाण्याचे पाप केले आहे. जनतेने मोठ्या विश्वासाने मला विधानसभेत पाठवले. निवडणूक संपली आणि शिवछत्र परिवार जनतेने दिलेल्या आशिर्वादाची उतराई होण्यासाठी कामाला लागला. नगरपालिकेच्या माध्यमातून सर्वांना न्याय देण्याचा प्रयत्न केला. नागरिकांचे प्रश्न सोडविले. अनुकंपाधारकांना नियुक्ती, संजय नगर सह सर्व अतिक्रमणधारकांना हक्काचा पीटीआर वाटप यांसह नागरिकांचे प्रश्न सोडविण्यासाठी नियोजन केले. विरोधक मात्र त्याचेही श्रेय लाटण्याचा प्रयत्न करत आहेत. पुढे बोलताना आ. विजयसिंह पंडित म्हणाले की शिवछत्र परिवाराने सर्वांना न्याय देण्याचे काम करत आहे. कुणाबरोबरही शिवछत्र परिवाराने दुजा भाव केला नाही आणि करणारही नाही. आदरणीय अमरसिंह पंडित यांच्या नेतृत्वाखाली शहरातील नागरिकांचे प्रश्न समजावून सोडविण्याचा प्रयत्न केला जात आहे. विरोधक मात्र आमची कॉपी करत आहेत, येणाऱ्या नगर परिषदेच्या निवडणुकीमध्ये नगरपालिकेला लागलेले हे हुक काढण्याची वेळ आली आहे. शिवछत्र परिवाराची काम करण्याची पद्धत आपण सर्वांनी समजून घेतली पाहिजे. सकारात्मक दृष्टिकोन ठेवून आपण काम करत आहोत. जुने नवे कार्यकर्ते यांनी समन्वय राखून एक दिलाने काम करावे. लोक स्वीकारला तयार आहेत, शिवछत्र परिवाराची ताकद तुमच्या पाठीशी आहे, सरकार आपले आहे कसलीही अडचण येणार नाही सगळ्यांना न्याय देण्याच्या बाबतीमध्ये शिवछत्र परिवार कधीही मागे राहणार नाही असे सांगून परिषदेमध्ये मदत कक्ष सुरू करण्यात आला असून त्याचा नागरिकांनी घ्यावा असे आवाहन त्यांनी यावेळी केले.

यावेळी प्रकाश नरनाळे, सुमनबाई धनवटे, कचराबाई हातागळे, रमेश नन्नवरे, सलमान सय्यद, राजेंद्र सोळुंके, बप्पा आबू उपळकर , खय्युम गुलाब रसूल कुरेशी, शेख अफसर हुसेनी, जनाबाई कांबळे सायरा कालू पठाण यांना प्रातिनिधिक स्वरूपात पिटीआरचे वाटप करण्यात आले.

याप्रसंगी नगर परिषदेचे मुख्याधिकारी विक्रम मांडुरके यांनी प्रास्ताविक केले. कडुदास कांबळे, एस. आर. अन्सारी, महेश दाभाडे यांनीही मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाला गेवराई शहरातील नागरिकासह संजयनगर आणि परिसरातील अतिक्रमणधारक,राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *