मयत सुरेश जाधव यांच्या कुटुंबियांची बदामराव पंडित यांनी घेतली सांत्वन भेट

आम्हाला न्याय द्या मुलीची आर्त हाक

 

गेवराई दि 21 ( वार्ताहार ) येथील छत्रपती मल्टीस्टेट मध्ये असलेल्या हक्काच्या ठेवीची रक्कम दोन वर्षापासून मागूनही परत न दिल्याने हतबल झालेल्या शेतकरी सुरेश आत्माराम जाधव यांनी पतसंस्थेच्या शाखेसमोरच आत्महत्या केली होती. यामुळे दुःखाचा डोंगर कोसळलेल्या जाधव कुटुंबीयांची माजी राज्यमंत्री बदामराव पंडित यांनी भेट घेत सांत्वन करत धीर दिला.

गेवराई येथील छत्रपती मल्टीस्टेट मध्ये नऊ लाख रुपये च्या ठेवी परत मिळाव्यात म्हणून खळेगाव येथील शेतकरी सुरेश आत्माराम जाधव हे गेल्या दोन वर्षापासून चकरा मारत होते. पंधरा दिवसांनी देतो, महिन्याने देतो असं म्हणत छत्रपती मल्टीस्टेटचे चेअरमन संतोष भंडारी आणि येथील व्यवस्थापक ज्योती क्षीरसागर यांनी त्यांना त्यांचेच पैसे देण्यासाठी टाळमटाळ केली. मुला मुलीच्या शिक्षणासाठी तात्काळ पैशाची गरज असल्याने सुरेश जाधव हे पत्नी कविता आणि मुलगा शुभम व मुलगी साक्षी यांच्यासह छत्रपती मल्टीस्टेटच्या गेवराई शाखेत ठाण मांडून बसले होते. आपल्या मागणीकडे कोणी लक्ष देत नाही, त्यासोबतच आपला वारंवार पैसे मागणी करताना होणारा अपमान सहन न झाल्याने अखेर दिनांक 18 जून 2025 रोजी पहाटे तीन वाजता सुरेश जाधव यांनी गेवराई शाखेच्या समोर गळफास घेऊन आत्महत्या केली होती. यामुळे जाधव कुटुंबावर दुःखाचा मोठा डोंगर कोसळला. घटनेच्या वेळी बाहेरगावी असलेल्या माजी राज्यमंत्री बदामराव पंडित यांनी गेवराईत येताच खळेगाव येथे जाऊन जाधव कुटुंबीयांची भेट घेऊन त्यांचे सात्वन केले. यावेळी सुरेश जाधव यांची मुलगी साक्षी आणि शुभम यांनी, आम्हाला आमचे पैसे तर मिळाले पाहिजेच पण आम्हाला न्याय द्या आणि चेअरमन संतोष भंडारी व व्यवस्थापक ज्योती क्षीरसागर यांच्यावर कठोर कारवाई झाली पाहिजे अशी मागणी केली. यावेळी भाऊसाहेब माखले उज्वल सुतार यांच्यासह गावकरी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *