गेवराई टिपरे व सोंग लोककला कायम जतन करू – विजयसिंह पंडित

शारदा प्रतिष्ठान आयोजित टिपरे महोत्सवाला महिलांसह नागरिकांचा मोठा प्रतिसाद

गेवराई, दि.11 (वार्ताहार )  गेवराई नगरीचे नाव टिपरे खेळ आणि सोंग या लोककलेच्या माध्यमातून संपुर्ण महाराष्ट्रात ओळखले जात आहे. गेवराईला लाभलेला हा पारंपारीक वारसा जतन करण्याचे काम टिपरे महोत्सवाच्या माध्यमातून केले जाईल. शारदा प्रतिष्ठानच्या माध्यमातून यापुढील काळातही असे विविध सामाजिक उपक्रम राबविले जातील असे प्रतिपादन महोत्सवाचे आयोजक विजयसिंह पंडित यांनी केले. शारदा प्रतिष्ठान आयोजित टिपरे महोत्सवात ते बोलत होते. यावेळी झालेल्या स्पर्धेमध्ये गेवराईच्या शिवनेरी टिपरे संघाने प्रथम, जगदंबा टिपरे संघाने द्वितीय तर झुंजार टिपरे संघाने तृतीय पारितोषिक पटकावले.

बीड जिल्हा परिषदचे माजी अध्यक्ष विजयसिंह पंडित यांच्या मार्गदर्शनाखाली शारदा प्रतिष्ठान आयोजित टिपरे महोत्सवाचे उद्घाटन विविध मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आले. यावेळी स्पर्धा आयोजक विजयसिंह पंडित, गेवराई पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक दिपक लंके, शिवाजी कोटकर, पोलिस उपनिरीक्षक शिवाजी भुतेकर, सहाय्यक निबंधक सुरज जगदाळे, शारदा स्पोर्टस्‌‍ ॲकॅडमीचे अध्यक्ष रणवीर पंडित, राष्ट्रवादी महिला आघाडीच्या शितल धोंडरे, परिक्षक ॲड. सुभाष निकम, प्रशांत रुईकर, प्रा. राजेंद्र बरकसे, विष्णूप्रसाद खेत्रे, विलास सोनवणे यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते आणि संयोजनक समितीचे सदस्य उपस्थित होते.

महाराष्ट्रात प्रसिध्द असलेला गेवराई येथील पारंपारीक टिपरे आणि सोंग हा सांस्कृतिक वारसा सक्षमपणे चालविण्यासाठी व ही परंपरा जतन करून टिपरे व सोंग या कलेला प्रोत्साहन मिळावे यासाठी बीड जिल्हा परिषदचे माजी अध्यक्ष विजयसिंह पंडित यांनी शारदा प्रतिष्ठानच्या माध्यमातून शनिवार, दि.10 ऑगस्ट रोजी गेवराई येथे टिपरे आणि सोंग स्पर्धेचे भव्यदिव्य आयोजन केले होते. महोत्सवात यावर्षी शहरातील महिलांसाठी भोलोबा (फेर) गीत स्पर्धेचेही आयोजन करण्यात आले होते. महिलांनी भोलोबा स्पर्धेला उत्स्फुर्त प्रतिसाद दिला. टिपरे महोत्सवात सहभागी होण्यासाठी शहरातील कलावंत वेगवेगळ्या वेशभुषा करून बाजारतळाकडे येत होते. सायंकाळी हा महोत्सव पाहण्यासाठी गेवराई शहरातील लहान मुले, मुली, महिला, तरुण, वयवृध्द जनतेने उत्स्फुर्त गर्दी केली होती. टिपरे स्पर्धेचा शुभारंभ शिवनेरी संघाने केला. या महोत्सवात शहरातील 11 संघ सहभागी झाले होते.

महोत्सवात टिपरे स्पर्धा सांघीकमध्ये शिवनेरी ग्रुपने प्रथम पारितोषिक रोख 33,333/- रु., स्मृतीचिन्ह आणि प्रमाणपत्र तर जगदंबा ग्रुपने द्वितीय रोख 22,222/- रु., स्मृतीचिन्ह आणि प्रमाणपत्र तसेच झुंजार ग्रुपने तृतीय रोख 11,111/- रु., स्मृतीचिन्ह आणि प्रमाणपत्र पारितोषिके पटकावले. अण्णाभाऊ साठे क्रीडा मंडळ आणि धर्मवीर संभाजी क्रीडा मंडळ यांनी उत्तेजनार्थ प्रत्येकी रोख 5,555/- रु., स्मृतीचिन्ह आणि प्रमाणपत्र पटकावले. उत्कृष्ट पात्र सजावट स्पर्धेमध्ये प्रथम पारितोषिक रोख 5,000/- रु., स्मृतीचिन्ह आणि प्रमाणपत्र, झुंजार ग्रुपच्या शाहू महाराज या पात्राला देण्यात आले, द्वितीय पारितोषिक रोख 3,000/- रु, स्मृतीचिन्ह व प्रमाणपत्र मुळे मावशी या पात्राला देण्यात आले तर तृतीय पारितोषिक रोख 2,000/- रु., स्मृतीचिन्ह व प्रमाणपत्र सावता क्रीडा मंडळाच्या महात्मा फुले या पात्राला देण्यात आले. उत्तेजनार्थ प्रत्येकी रोख 1,000/- रु., स्मृतीचिन्ह व प्रमाणपत्र ओम ग्रुपच्या उर्फी जावेद या पात्राला देण्यात आले. उत्कृष्ट सोंग स्पर्धेमध्ये प्रथम पारितोषिक रोख 5,000/- रु., स्मृतीचिन्ह व प्रमाणपत्र ओम ग्रुपच्या आदिवासी पात्राला देण्यात आले. द्वितीय पारितोषिक रोख 3,000/- रु., स्मृतीचिन्ह व प्रमाणपत्र विकास ठाकुर यांच्या कैदी सोंगाला देण्यात आले तर तृतीय पारितोषिक रोख 2,000/- रु., स्मृतीचिन्ह व प्रमाणपत्र सावता संघाच्या जोकर या पात्राला देण्यात आले. उत्तेजनार्थ रोख 1,500/- रु., स्मृतीचिन्ह व प्रमाणपत्र प्रत्येकी श्रावणबाळ आणि विठ्ठल या पात्राला देण्यात आले. उत्कृष्ट वाद्य वादक स्पर्धेमध्ये प्रथम पारितोषिक रोख 3,000/- रु., स्मृतीचिन्ह व प्रमाणपत्र ओम ग्रुपच्या वादकाला देण्यात आले, द्वितीय रोख 2,000/- रु., स्मृतीचिन्ह व प्रमाणपत्र संतोष पवार या वादकाला तर तृतीय पारितोषिक रोख 1,500/- रु., स्मृतीचिन्ह व प्रमाणपत्र साठे ग्रुपच्या वादकाला देण्यात आले, उत्तेजनार्थ रोख 1,000/- रु., स्मृतीचिन्ह व प्रमाणपत्र प्रत्येकी क्रांती ग्रुपच्या संबळ वादकाला तर निकम गल्लीच्या वादकाला देण्यात आले. विजयी संघांनी जल्लोष आनंद साजरा केला, उपस्थित मान्यवरांच्या हस्ते पारितोषिकांचे वितरण करण्यात आले.

टिपरे महोत्सवाचे आयोजक विजयसिंह पंडित यांच्या संकल्पनेतून गेवराई शहरात पारंपरिक लोककलेला राजाश्रय देण्याचे काम होत आहे. टिपरी महोत्सवासह भोलोबा गीत स्पर्धेला मिळालेला अभूतपूर्व प्रतिसाद लक्षात घेता यावर्षी पासुन गौराई सजावट स्पर्धा आयोजित केल्याची घोषणा विजयसिंह पंडित यांनी करताच उपस्थित महिला भगिनींनी टाळ्यांच्या कडकडाटात प्रतिसाद दिला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *