गेलेला पैसा आणि संपत्ती परत मिळवू शकालपण हे जीवन मिळू शकणार नाही – ह.भ.प.पुरुषोत्तम महाराज
शिवाजीराव पंडित यांच्या वाढदिवसानिमित्त कीर्तन महोत्सवातील तिसरे पुष्प
गेवराई, दि.०७ (प्रतिनिधी) ः- मनुष्य चिंतन करण्यापेक्षा चिंता जास्त करतो, जे जाणार आहे त्याची असक्ती कशाला ठेवता ? एकदा देवावर विश्वास ठेवा तुमच्या आयुष्याचे कल्याण होईल. मोबाईल आणि इतर कामांना तुम्ही वेळ देता, जरा देवासाठी वेळ द्या, भक्तीसाठी वेळ काढा. गेलेला पैसा, संपत्ती आणि सत्ता परत मिळवू शकाल पण हे जीवन तुम्ही परत मिळवू शकणार नाहीत. जन्म वाया जाण्या अगोदर देवाचे चिंतन करा असे आवाहन ह.भ.प.पुरुषोत्तम महाराज पाटील यांनी केले. शिवाजीराव (दादा) पंडित यांच्या अभिष्टचिंन सोहळ्यात तिसऱ्या दिवशीची किर्तनसेवा करताना ते बोलत होते.
माजीमंत्री शिवाजीराव (दादा) पंडित यांच्या वाढदिवसानिमित्त गेवराई शहरात भव्य किर्तन महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.कीर्तन महोत्सवातील कीर्तनाचे तिसरे पुष्प ह.भ.प.पुरुषोत्तम महाराज पाटील यांनी गुंफले. संत तुकाराम महाराजांच्या ‘सेविता हा रस वाटतो अनेका’ या अभंगावर पुरुषोत्तम महाराजांनी आपल्या परखड आणि श्रावणीय वाणीतून किर्तनसेवा केली. यावेळी बोलताना ते म्हणाले की, सर्वांनी सर्वांना समजून घेणे याच्यासारखा दुसरा कोणताही परमार्थ नाही. ज्याच्या गळ्यात माळ, कपाळी गोपीचंदाचा टिळा आणि जो महाराष्ट्राचा रहिवाशी आहे त्याची मान ज्ञानोबा आणि तुकोबा यांच्याच चरणी झुकली पाहिजे. ज्ञानोबा आणि तुकोबांसारखे विचारवंत जगात कुठे झाले नाही. त्यांच्या विचारांचे पारायण करा, परमार्थ थोडा करा पण भावनेतून करा. एकदा माझ्या देवावर विश्वास ठेवा तुमच्या आयुष्याचे कल्याण झाल्याशिवाय राहणार नाही असे सांगून अलिकडच्या काळात वर्षश्राध्दाचे किर्तन सुरु झाल्यापासून कीर्तनकार खोटे बोलत आहेत अशी खंत त्यांनी यावेळी व्यक्त केली. पुरुषोत्तम महाराज यांनी आपल्या परखड भाषेत उदाहरणे आणि दृष्टांत देत उपस्थित भाविक भक्तांना विठ्ठलभक्तीमध्ये रममान होण्यासाठी रामकृष्ण हरिचा जप करा, देव आणि धर्माबद्दल स्वाभिमान बाळगा, आपल्या आई-वडिलांवर प्रेम करा आणि तरुणांनी व्यसनांच्या आहारी जावून आपले जीवन उध्वस्त करू नका असे आवाहन त्यांनी यावेळी केले.
आदरणीय शिवाजीराव (दादा) पंडित यांचा हा अभिष्टचिंतन सोहळा हा भक्तीचा सोहळा आहे. शिवछत्र परिवाराचे हे भाग्य आहे की, दादांचा वाढदिवस मोठ्या भक्तीभावाने साजरा केला जात आहे. पंडित परिवाराच्या पुर्वजांनी काहीतरी पुण्याई केली त्यामुळेच हा भक्तिचा सोहळा सजला आहे असे सांगून शिवाजीराव दादांना दिर्घायुष्य मिळो अशी प्रार्थना आज आपण सर्व मिळून पांडुरंगाचरणी करू असेही पुरुषोत्तम महाराज यांनी यावेळी सांगितले. याप्रसंगी उपस्थित भाविक भक्तांनी हात उंचावून टाळ्यांचा गजर करत विठ्ठल माझा-माझा, मी विठ्ठलाचा असा जप करून वातावरण भक्तीने भारावून टाकले.
*शाहीर देवानंद माळी यांच्या पोवाड्याने रोमांच उभे केले* ============ सायंकाळच्या सत्रात शाहीर देवानंद माळी यांचा पोवाड्याचा कार्यक्रम झाला, यावेळी देवानंद माळी यांनी त्यांच्या सहकार्यांसह छत्रपती शिवाजी महाराजांचा पोवाडा सादर करून उपस्थितांमध्ये रोमांच उभे केले. यावेळी त्यांनी शिवाजीराव (दादा) पंडित यांच्या कार्यकर्तृत्वावर पोवाड्यातून भाष्य करून उपस्थितांच्या टाळ्या मिळविल्या. यावेळी शिवाजीराव पंडित हे फक्त नेते नाहीत तर ते गोरगरीबांचे दाते आहेत असे ते यावेळी म्हणाले. तब्बल दोन तास चाललेल्या या पोवाड्याचे कार्यक्रमाने उपस्थित भाविक भक्तांमध्ये उत्साह संचारला होता. बालशाहीर हर्षवर्धन माळी याने आपल्या गोड आवाजातून शिवाजी महाराजांचा पोवाडा सादर केला. यावेळी त्यांना श्रीमती चंद्रीका कल्पना माळी, आशाताई सुर्यवंशी, मारोती आईवळे, अवधुत पवार, रामचंद्र सुतार, राजेंद्र सपकाळ, आर्यन कांबळे, अविष्कार जयसिंगे, अवधुत ओतारी, सुमित जयसिंगे यांनी संगीत साथ दिली.
लोकशाहीचा अर्धवट उत्सव: स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा वनवास. [दर्पणदिन विषेश ] भारतीय लोकशाहीच्या सुदृढ वाटचालीमध्ये केंद्र आणि राज्य सरकारइतकेच...