गेवराईत रंगला कृष्ण जन्माचा सोहळा

माजीमंत्री शिवाजीराव पंडित यांच्या अभिष्टचिंतन सोहळ्यानिमित्त भागवत कथेस उत्स्फुर्त प्रतिसाद

गेवराई, दि.०७ ( वार्ताहार ) – माजीमंत्री शिवाजीराव (दादा) पंडित यांच्या ८६ व्या वाढदिवसानिमित्त गेवराई शहरात सुरु असलेल्या श्रीमद् भागवत कथा ज्ञानयज्ञ आणि कीर्तन महोत्सवाला उत्स्फुर्त प्रतिसाद मिळत आहे. भागवताचार्य केशव महाराज उखळीकर यांच्या अमृतमय आणि सुश्राव्य वाणीतून आज कृष्ण जन्माचा सोहळा मोठ्या थाटामाटात संपन्न झाला. यावेळी उपस्थित भाविक भक्तांनी आनंद साजरा केला. माजीमंत्री शिवाजीराव (दादा) पंडित जयभवानी कारखान्याचे अध्यक्ष अमरसिंह पंडित, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष विजयसिंह पंडित यांच्यासह अभिष्टचिंतन सोहळा समितीचे पदाधिकारी, कार्यकर्ते व भाविक भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.

माजीमंत्री शिवाजीराव (दादा) पंडित यांच्या अभिष्टचिंतन सोहळ्यानिमित्त शिवनगरी, गेवराई येथे सुरु असलेल्या भागवत कथेत भागवताचार्य केशव महाराज उखळीकर यांनी चौथै पुष्प गुंफून यावेळी त्यांनी समुद्रमंथन, प्रियवर्त राजाचे चरित्र सांगून कृष्ण चरित्राला सुरुवात केली. याप्रसंगी त्यांनी कृष्ण जन्माचे यथार्थ दर्शन आपल्या अमुल्य वाणीतून सादर केले. भगवान श्रीकृष्णाचे गोकुळात आगमन झाले असताना उपस्थित भाविक भक्तांनी आनंद व्यक्त केला. जय जय राधा रमन हरि बोल या भजनावर उपस्थित भाविक भक्तांनी भक्तिमय नृत्य करून आनंद साजरा केला. यावेळी बोलताना केशव महाराज उखळीकर म्हणाले की, भागवत कथा आपल्याला सुख देणारी असून भगवान श्रीकृष्णाचे चरित्र परमानंद देणारे आहे.

कथेची सांगता विजयसिंह पंडित यांच्यासह जय भवानी आणि जगदंबा संस्थेचे मुख्याध्यापक आणि प्राचार्यांच्या हस्ते करण्यात आली. यावेळी अभिष्टचिंतन सोहळा समितीचे पदाधिकारी, गेवराई शहरासह ग्रामीण भागातून आलेल्या भाविक भक्तांची संख्या मोठी होती. भागवत कथेचे उर्वरित तीन पुष्प साजरे होणार असून भाविक भक्तांनी मोठ्या मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन समितीच्यावतीने करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *