गेवराई शहरातील पत्रकारांनी पत्रकार हल्ला विरोधी कायद्याची “प्रत” जाळून केला निषेध
आमदार किशोर पाटील यांच्यावर कडक कारवाई करा
गेवराई दि. 17 ( वार्ताहर ) पाचोरा येथील आमदाराने पत्रकारास केलेल्या बेदम मारहाणीचा शुक्रवार ता. 17 रोजी दु. 1 वाजता गेवराई तालुक्यातील पत्रकारांनी एकत्र येऊन तिव्र निषेध व्यक्त करून आमदार किशोर पाटील यांच्यावर कडक कारवाई करावी अशी मागणी केली.
पत्रकारांवर होत असलेले हल्ले रोखण्यात महाराष्ट्र सरकार अपयशी ठरत असून, त्या निषेधार्थ पत्रकार हल्ला विरोधी कायद्याची “प्रत” जाळून सर्व पत्रकारांनी निषेध व्यक्त केला आहे. गुरूवार ता. 17 रोजी गेवराई तालुक्यातील पत्रकारांच्या वतीने पाचोरा येथील पत्रकार महाजन यांना आमदार पाटील यांच्या सांगण्यावरून काही गुंडांनी बेदम मारहाण करून गंभीर जखमी केले होते. या घटनेचा निषेध व्यक्त करण्यासाठी दु. एक वाजता गेवराई येथील सर्व पत्रकारांनी आंदोलनाची हाक दिली होती. गेवराई तहसील कार्यालयासमोर हे आंदोलन करण्यात आले. पत्रकार महाजन यांच्यावर झालेल्या भ्याड हल्याचा पत्रकारांनी निषेध करून, सरकार विरोधात घोषणा देत तहसील कार्यालय परिसर दणाणून सोडला होता. पत्रकार विरोधी कायदा करून ही पत्रकारांवर हल्ले होतात, हे दुर्दैव आहे. सरकार अपयशी ठरत असून, या पुढे हल्ले खपवून घेणार नाहीत, असा इशारा पत्रकार संघटनेच्या वतीने देण्यात आला. यावेळी पत्रकारांनी सविस्तर भूमिका स्पष्ट करून, महाराष्ट्र सरकार व आमदार पाटील यांचा तिव्र निषेध केला. यावेळी सर्व पत्रकार उपस्थित होते. तहसीलदार खोमणे यांना निवेदन देण्यात आले. तहसील कार्यालय परिसरात बुळगा कायदा करणाऱ्या सरकारचा निषेध म्हणून पत्रकार हल्ला विरोधी कायद्याची प्रत जाळून धिक्कार करण्यात आला.