यंदाची डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची जयंती ठरणार खास, आकाशातील ताऱ्याला महामानवाचं नाव
छत्रपती संभाजीनगर:दि 13 ( वार्ताहार ) भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर (Dr. Babasaheb Ambedkar) यांची 14 एप्रिलला 132वी जयंती आहे. बाबासाहेबांची जयंती देशभर उत्साहात साजरी केली जाते. मात्र यंदाची बाबासाहेब आंबेडकरांची जयंती थोडी हटके आणि ऐतिहासिक ठरणार आहे. कारण डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाने आकाशातील एका ताऱ्याच रजिस्ट्री करण्यात आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार 14 एप्रिलला या ताऱ्याचं नामकरण होणार आहे. सर्वसामान्यांना हा तारा मोबाईल, लॅपटॉप, संगणक, टॅबवर पाहता येणार आहे. छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेचे (Chhatrapati Sambhaji Nagar Municipal Corporation) स्थायी समितीचे माजी अध्यक्ष राजू शिंदे यांनी या ताऱ्याची रजिस्ट्री केली आहे.
अमेरिकेत अवकाशातील ताऱ्यांची रजिस्ट्री करणारी ‘इंटरनॅशनल स्टार अँड स्पेस रजिस्ट्री’ नावाची एक संस्था आहे. या संस्थेमार्फत अवकाशातील ताऱ्यांना व्यक्तींची नावं देण्यात येतात. यासाठी भारतीय चलनाच्या हिशोबाने सांगायचं तर नऊ हजार रुपये शुल्क भरावं लागतं. यंदाची बाबासाहेबांची जयंती आगळीवेगळी व्हावी म्हणून राजू शिंदे यांनी या संस्थेकडे बाबासाहेबांच्या नावे ताऱ्याची नोंद करण्यासाठी अर्ज केला होता. शिंदे यांनी 9 फेब्रुवारी रोजी अर्ज केला होता आणि आता त्यांना त्याचं प्रमाणपत्र आलं आहे. तर 14 एप्रिलला या ताऱ्याचं लाँचिंग होणार आहे. स्पेस रजिस्ट्रीच्या https:// space-registry.org या संकेतस्थळावरून हा तारा पाहता येऊ शकतो. तसेच मोबाइल, लॅपटॉप, संगणक, टॅबवर हा तारा पाहता येणार आहे.
दीड महिन्याच्या प्रक्रियेनंतर आकाशातील तार्याला बाबासाहेबांचं नाव
‘जब तक सूरज चाँद रहेगा, बाबा तेरा नाम रहेंगा’ अशी घोषणा डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या महापरिनिर्वाणानंतर त्यांच्या अंत्ययात्रेत देण्यात आली होती. अनेक कार्यक्रमांमध्ये आजही ही घोषणा दिली जाते. ही घोषणा लक्षात घेत राजू शिंदे यांनी बाबासाहेबांच्या नावाने अवकाशातील ताऱ्याची रजिस्ट्री केली आहे. ताऱ्याच्या रजिस्ट्रीसाठी नाव दिलं जाणाऱ्या व्यक्तीचं खूप व्यापक काम असायला हवं, त्यासाठी संबंधित संस्थेकडून विविध कागदपत्रांची पडताळणी केली जाते. त्यामुळे तब्बल दीड महिन्यापासून प्रक्रिया करत आणि वेगवेगळ्या कागदपत्रांची पूर्तता केल्यावर अखेर आकाशातील तार्याला बाबासाहेबांचं नाव मिळालं असल्याचं राजू शिंदे म्हणाले.