बालविवाह बंदीमध्ये युवकांचा सहभाग महत्त्वाचा – सचिन खाडे

रेवकी येथे सात दिवसीय शिबिराचे उद्घाटन

गेवराई, दि. ४ ( वार्ताहार ) ‘सर्व दानांमध्ये श्रमदान सर्वश्रेष्ठ दान आहे. कारण ज्यामध्ये देणारा आणि घेणारा असा दोघांना ही लाभ होत असतो. समाजात आजही जात धर्मावरून अनावश्यक वाद वाढवले जातात. जातीला अनाठायी प्राधान्य देणे हे अज्ञानीपणाचे लक्षण आहे. विवाहप्रसंगी हुंडा देणे – घेणे ही घातक कुप्रथा आहे. ‘बालविवाह बंदी’ करताना यासंदर्भातले समुपदेशन विवाहपूर्वीच होणे आवश्यक असते. यामध्ये युवकांचा सहभाग आणि जबाबदारी अधिक आहे’ असे प्रतिपादन गेवराई येथील तहसीलदार सचिन खाडे यांनी केले. रेवकी- देवकी येथे राष्ट्रीय सेवा योजना सात दिवसीय निवासी शिबिराचे उद्घाटक म्हणून ते बोलत होते.

मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळ संचलित र.भ.अट्टल महाविद्यालय गेवराई आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ औरंगाबाद यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित युवकांचे ग्रामविकासातील योगदानाने बालविवाह बंदी या संकल्पनेवर आधारित सात दिवासीय निवासी शिबिराचे उद्घाटन महाविद्यालयाच्या प्राचार्य प्रो रजनी शिखरे यांच्या अध्यक्षतेखाली रेवकी येथे संपन्न झाली याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून सहायक पोलीस निरीक्षक संदीप काळे यांची उपस्थिती होती. त्यांनी बालविवाह बंदी विषयक घटना आणि त्यावरील उपाय योजना संदर्भात अनेक उदाहरणे देऊन त्याचे महत्त्व आणि वस्तुस्थिती विद्यार्थ्यांसमोर सांगताना त्यावरील उपाय योजनाही सांगितल्या. यावेळी ग्रामसेवक विजयकुमार मस्के,मंडळ अधिकारी बाळासाहेब पखाले,तलाठी गोविंद नरोटे जिल्हा परिषद केंद्रीय शाळेचे मुख्याध्यापक बाळाभाऊ पिंपळे, विलास देवकते, सयाजी जायभाय, राजू अष्टकर, कमळाजी यमगर, कचरू बाबरे, उपप्राचार्य मेजर विजय सांगळे, डॉ. प्रशांत पांगरीकर, कार्यालयीन अधीक्षक भागवत गवंडी, यांची उपस्थिती होती.
अध्यक्षीय मार्गदर्शन करताना प्राचार्य प्रो. रजनी शिखरे यांनी महाविद्यालय आणि ग्रामस्थ यांच्यातील समन्वयाचा अनुभव सांगत शिबिराच्या आयोजना मागील उद्दिष्ट सांगितले.

उद्घाटन समारंभाचे सूत्रसंचालन कार्यक्रमाधिकारी डॉ. समाधान इंगळे यांनी केले. तर प्रा. शरद सदाफुले यांनी आभार मानले. यावेळी शरद मोटे आणि संध्या तळतकर या राष्ट्रीय सेवा योजना विभागातील स्वयंसेवकांचे प्रजासत्ताक पथ संचलनामध्ये मुंबई येथे सहभागी झाल्याबद्दल मान्यवरांच्या हस्ते अभिनंदन करण्यात आले.कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी कार्यक्रमाधिकारी डॉ. अमोल शिरसाट, डॉ. वृषाली गव्हाणे, प्रा. चंद्रकांत पुरी, उमेश म्हेत्रे आदींनी परिश्रम घेतले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *