April 19, 2025

शिवाजीराव आढळराव पाटील शिवसेनेत,कारवाई तात्काळ मागे

पिंपरी, दि. ३ ( वार्ताहार ) – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पक्षाच्या गटनेतेपदावरुन हटविण्यात आल्यानंतर आता माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांची शिवसेनेतून हकालपट्टी करण्यात आल्याची बातमी समोर आली होती. पक्षविरोधी कारवाया केल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला होता. मात्र शिवसेनेने नुकत्याच जारी केलेल्या पत्रकानुसार आढाळराव पाटील यांच्यावरील कारवाई मागे घेण्यात आली असून त्यांना शिवसेना पक्षातच ठेवण्यात येणार आहे. आढाळराव पाटील यांनी केलेल्या खुलाशानंतर त्यांच्यावरील कारवाई मागे घेण्यात आली आहे. शिवसेना सचिव खासदार विनायक राऊत यांनी याबाबत पत्रकाद्वारे माहिती दिली आहे.

शिवाजीराव आढळराव पाटील यांनी एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्यानंतर सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत शिंदे यांना शुभेच्छा दिल्या होत्या. एकनाथ शिंदेंचा फोटो शेअर करत त्यांनी त्यावर गर्जत राहील आवाज हिंदुत्वाचा, अभिनंदन मुख्यमंत्री साहेब’ असं कॅप्शन लिहिलं होतं. यात माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा फोटो टाकलेला नव्हता. यानंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने शिवाजीराव आढळराव पाटील यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे.

दरम्यान, महाविकास आघाडी स्थापन झाली आणि आंबेगाव विधानसभा मतदार संघातील दिलीप वळसे-पाटील यांना गृहमंत्रीपद दिल्याने आणि राष्ट्रवादीकडून सातत्याने त्यांना व शिवसैनिकांना त्रास दिला जात असल्याची तक्रार आढळरावांनी ठाकरेंकडे केली होती.

एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीनंतर शिवसेनेकडून मेळावे घेवून शिवसैनिकांची व शिवसेनेच्या नेत्यांची बाजू जाणून घेण्यात आली. त्यात आढळराव यांनी पुणे जिल्ह्यातील शिवसैनिकांना राष्ट्रवादीच्या जाचापासून वाचवा, त्यांना जगूद्या अशा स्वरुपाची वक्तव्ये केली होती. याच त्यांच्या वक्तव्यानंतर शिवसेनाभवनात बरीच उलट-सुलट चर्चा झाल्याचे बोलले जाते. काल (ता. २) रात्री उशिरा शिवाजीराव आढळराव यांच्या उपनेतेपदासह शिवसेना सदस्य म्हणून त्यांना काढून टाकल्याचे शिवसेनेचे मुखपत्र सामनातून जाहीर करण्यात आले. त्यानंतर एकच खळबळ उडाली होती. अनेक शिवसैनिक मुंबईकडे रवानाही झाले होते. मात्र आढाळराव पाटील यांनी केलेल्या खुलाशानंतर त्यांच्यावरील कारवाई मागे घेण्यात आली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *