
वर्चस्ववादातून रक्तचरित्र, उद्योगनगरी नाशिकमध्ये खुनामागून खून; डोक्यात दगड घालून तरुणाला संपवले
एरवी रम्य, शांत असणारे नाशिक या आठवड्यात घडलेल्या एकेका घटनांनी हादरून गेले आहे. त्यामुळे सामान्यांमध्ये प्रचंड दहशत आहे.
नाशिकः दि २४ पर्यटननगरी म्हणून देशभर नाव कमावणाऱ्या नाशिकमध्ये सध्या खुनी खेळ सुरू झालेला दिसतोय. दोनच दिवसांपूर्वी झालेल्या पोलीस पुत्राच्या निर्घृण खुनानंतर आता आणखी एका तरुणाची अतिशय निर्घृण हत्या झाल्याचे समोर आले आहे. म्हसरूळ आरटीओ ऑफिसजवळ ही घटना घडली. राजू शिंदे असे मृताचे नाव आहे.
एरवी रम्य, शांत असणारे नाशिक या आठवड्यात घडलेल्या एकेका घटनांनी हादरून गेले आहे. अगदी कालच एका चार वर्षांच्या मुलीचे लॉकेट हिसकावण्याच्या प्रयत्नात चोराने तिच्यावर कट्यारीने हल्ला केला. या चिमुकलीवर अजूनही उपचार सुरू आहेत. त्यापूर्वी पोलीस पुत्राची झालेली हत्या आणि आता एका भाजीपाल्याचे दुकान चालवणाऱ्या तरुणाचा झालेला निर्घृण खून. यामुळे सामान्य नाशिकर हादरून गेला आहे. पंचवटी पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली. मृत तरुण राजू शिंदे फुलेनगरातल्या भराड वाडी येथे राहायचा. रात्री साडेबाराच्या सुमारास तो घरी जात होता. यावेळी दबा धरून बसलेल्या अज्ञातांनी त्याला अडवले. त्याच्या डोक्यात दगड घालून त्याला संपवले. पोलिसांना याची खबर लागताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. मात्र, तोपर्यंत मारेकरी पसार झाले होते.