गेवराई तालुक्यातील सर्व शाळा विद्यार्थ्यांच्या गर्दीने फुलल्या
पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांचे ठिकाणी जल्लोषात स्वागत
गेवराई दि १६ ( वार्ताहार ) कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गेल्या दोन वर्षापासून शाळा बंद असल्याने, विद्यार्थी ऑनलाईन शिक्षण घेत होते. परंतु दिनांक 15 जून 2022 रोजी प्रत्यक्ष शाळा सुरू झाल्या असून, पहिल्याच दिवशी ठिकाणी उपस्थित विद्यार्थ्यांचे शाळेत जल्लोषात स्वागत करण्यात आले .विद्यार्थ्यांच्या किलबिलाट आणि गर्दीने सर्वच शाळा फुलल्याचे दिसून आले.
गेल्या दोन वर्षापासून कोरोनामुळे लॉकडाऊन झाल्याने राज्यातल्या आणि विशेषतः बीड जिल्ह्यातल्या सर्वच शाळा बंद होत्या. शहरी व ग्रामीण भागातील विद्यार्थी आहे त्या सुविधेसह ऑनलाईन शिक्षण घेत होते. मुलांना ऑनलाइन शिक्षण मिळाले. परंतु त्यांचे खेळणे, बागडणे आणि एकमेकांशी प्रत्यक्ष भेटून शालेय शिक्षण घेणे बंद असल्याने विद्यार्थी हिरमुसले होते. परंतु आता दिनांक 15 जून 2022 पासून राज्यातल्या सर्वच शाळा प्रत्यक्ष सुरू झाल्या आहेत. गेवराई तालुक्यातील शाळाही सुरू झाल्याने पहिल्याच दिवशी प्रत्येक शाळेत आलेल्या विद्यार्थ्यांचे रांगोळी, लेझीम, डफडे वाजवून जंगी स्वागत करण्यात आले. तर काही ठिकाणी विद्यार्थ्यांवर शिक्षकांकडून पुष्पवृष्टीही करण्यात आली. शाळेत येताच एवढ्या मोठ्या स्वरूपात झालेले स्वागत आणि भेटलेले मित्र-मैत्रिणी यामुळे विद्यार्थ्यांमध्ये उत्साह पाहायला मिळाला. त्यासोबतच दोन वर्षापासून प्रत्यक्ष एकमेकांपासून दूर असलेले शिक्षक व विद्यार्थी एकत्र आल्याने आणि विद्यार्थ्यांच्या गर्दी आणि किलबिलाटाने संपूर्ण शाळा फुलल्याने शिक्षकांनी मनापासून आनंद आणि समाधान व्यक्त केले. आता गेल्या दोन वर्षाचा विद्यार्थ्यांचा प्रत्यक्ष शिक्षण घेण्याचा शैक्षणिक बॅकलॉग कोणत्याही स्थितीत भरून काढायचा आणि विद्यार्थ्यांचा बेसिक अभ्यास उत्तम पद्धतीने तयार करून घेण्याचा चंगही शिक्षकांनी बांधल्याचे बोलून दाखवले. शाळा सुरू होण्यापूर्वी दिनांक 13 आणि 14 जून रोजी मुख्याध्यापकांच्या प्रमुख उपस्थितीत प्रत्येक शाळेत शिक्षकांच्या बैठका झाल्या. यात विद्यार्थ्यांचे झालेले शैक्षणिक नुकसान भरून काढण्यासाठी करण्यात येणाऱ्या उपाय योजना बाबत चर्चा करून तसे नियोजनही करण्यात आल्याचे पाहायला मिळाले. शाळेच्या पहिल्या दिवशी तालुक्यातल्या विविध शाळेमध्ये काही विद्यार्थी घोड्यावर बसून तर काही विद्यार्थी बैलगाडीत बसून आले. त्यासोबतच कित्येक शाळेमध्ये पालकांनी आपल्या मुलांसह उपस्थिती लावल्याचे दिसले. अनेक शाळेमध्ये आलेल्या विद्यार्थ्यांना शालेय पुस्तके वाटप करण्यात आले. यामुळे विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावरही आनंद ओसंडून वाहत होता.
लोकशाहीचा अर्धवट उत्सव: स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा वनवास. [दर्पणदिन विषेश ] भारतीय लोकशाहीच्या सुदृढ वाटचालीमध्ये केंद्र आणि राज्य सरकारइतकेच...