April 19, 2025

‘विजयी भव’ चित्रपट 20 मे रोजी होणार प्रदर्शित

मुंबई, दि. १७ ( वार्ताहार )  आजवर राजकारण खेळावर आधारित बरेच चित्रपट प्रदर्शित झाले आहे. काही चित्रपटात केवळ खेळ तर काही मध्ये फक्त राजकारण दाखविण्यात आले आहे. आता मात्र एक असा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ज्यात राजकारण व खेळ यांची अचूक सांगड घालण्यात आली आहे. ‘विजयी भव’ हा चित्रपट मागील काही दिवसांपासून रसिक तसेच सिनेसृष्टी पर्यंत सर्वत्र चर्चेत आहे. काही दिवसांपूर्वीच प्रदर्शित झालेल्या विजयीभव या चित्रपटाच्या ट्रेलरने रसिकांची उत्सुकता शिगेला पोहचण्याचे काम केले आहे. अत्यंत कमी वेळेत ‘विजय भव’चा ट्रेलर लाखो रसिकांपर्यंत पोहोचला आहे.

 या चित्रपटात नेमकं काय पाहायला मिळणार आहे याची प्रतीक्षा आता संपली असून 20 मे रोजी विजयी भव हा चित्रपट संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे. विजयी भव या चित्रपटाची निर्मिती किर्तन गोवर्धन पटेल यांनी केली आहे तर दिग्दर्शन शैलेश पाटील व अतुल सोनार या जोडगोळीने केले आहे. तर या चित्रपटाची कथा मुकुंद महाले यांनी लिहिली आहे. ज्येष्ठ अभिनेत्री नयन पवार यांची या चित्रपटात पाटलींन बाईची महत्वाची भूमिका असणार आहे. चित्रपटाची कथा पळसखेडा गावाभोवती गुंफण्यात आली आहे. त्या गावात दर पाच वर्षांनी नवीन सरपंचांची निवड करण्यासाठी कबड्डी सामने खेळवले जातात. सरपंच पदासाठी उभ्या असलेल्या त्याच्या उमेदवारांचा संघ विजय होतो. त्याच्या गळ्यात सरपंच पदाची माळ पडते. राजकारण म्हटलं की कट कारस्थान, डावपेच, सूडभावना आलेच. या सर्वांची अचूक सांगड घालण्यात आली आहे. कबड्डी सारख्या अस्सल लाल मातीतील खेळाशी राजकारणाची जोड देऊन हा चित्रपट निर्मिती करण्यात आला आहे. प्रेक्षकांनी चित्रपट गृहात येऊन हा चित्रपट पहावा, अशी विनंती या चित्रपटातील ज्येष्ठ अभिनेत्री नयन पवार यांनी केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *