January 22, 2025

दुहेरी खुन प्रकरणी चौघांना जन्मठेप

दुहेरी खून प्रकरणी चौघांना जन्मठेप

अंबाजोगाई दि २३ ( वार्ताहार ) : जमिनीच्या वादातून शेतकर्‍यासह साक्षीदाराच्या खून प्रकरणात तब्बल 9 वर्षांनी 11 पैकी 4 आरोपींना जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे. तर इतर दोघांना दोन वर्षाच्या सक्त मजूरीची शिक्षा सुनावण्यात आली. अंबाजोगाईच्या अतिरीक्त जिल्हा न्यायालयाने हा निकाल दिला. या प्रकरणातील पाच महिलांना निर्दोष सोडण्यात आले.

रेणापुर तालुक्यातील वांगदरी येथील वसंत मुकूंदराव कराड यांची तडोळा शिवारात शेती होती. 2012 मध्ये ऊस तोडणीच्यावेळी यातील आरोपींनी वसंत कराड आणि गणेश गंभीरे यांच्यावर कोयता कुर्‍हाडीने हल्ला केला. आरोपींनी तत्कालीन सरपंच बबन कराड यांनाही मारहाण केली. यात वसंत कराड यांचा मृत्यु झाला होता. या प्रकरणी बर्दापूर पोलीस ठाण्यात 11 आरोपींविरोधात खूनाचा गुन्हा दाखल झाला होता.या प्रकरणाचा संपुर्ण तपास करून आरोपी विरूद्धचे दोषारोप पत्र बर्दापुर पोलिसांनी अंबाजोगाईच्या अतिरिक्त जिल्हा न्यायालयात दाखल केले. जखमींचा व डॉक्टरांचा उत्तरीय तपासणी अहवाल व सरकार पक्षाचा युक्तीवाद ग्राह्य धरून अतिरिक्त जिल्हा न्यायाधीश एम.बी.पटवारी यांनी मदन ग्यानदेव पुजारी व महादेव ग्यानदेव पुजारी यांना वसंत कराड यांच्या खूनाबद्दल दोषी धरून जन्मठेप व दहा हजार रूपयांचा दंड ठोठावला. तसेच हल्ला करतेळी भांडण सोडविण्यासाठी गेलेल्या लक्ष्मण नरहरी गंभीरे यांच्याही खून प्रकरणात बळीराम ग्यानदेव पुजारी व अंकुश ग्यानदेव पुजारी यांना देखील जन्मठेप व दहा हजार रूपयांचा दंड ठोठावला तर घटना स्थळावरील साक्षीदाराला मारहाण केल्याबद्दल अरूण ग्यानदेव पुजारी, राजकुमार ग्यानदेव पुजारी यांना कलम 324 प्रमाणे एक वर्ष तर कलम 326 प्रमाणे दोन वर्षाची सक्तमजुरी सुनावण्यात आली. सरकार पक्षाच्या वतीने अ‍ॅड.लक्ष्मण फड यांनी काम पाहिले तर त्यांना अ‍ॅड. अनंत तिडके यांनी सहकार्य केले. या प्रकरणात पो.हे.का. गोविंद कदम व बी.एस. सोडगिर यांनी महत्वाची भूमिका बजावली. घटनेच्या 9 वर्षानंतर नातेवाईकांना न्याय मिळाल्यामुळे मयताच्या नातेवाईकांनी न्याया बद्दल समाधान व्यक्त केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *