January 22, 2025

शारदा प्रतिष्ठानचा सामुहिक विवाह सोहळा १४ मे रोजी होणार

इच्छुकांनी नोंदणी करावी – अमरसिंह पंडित

गेवराई, दि.१३ (वार्ताहार ) शारदा प्रतिष्ठान, गेवराई या सामाजिक संस्थेकडून यावर्षी शनिवार, दि.१४ मे २०२२ रोजी सामुहिक विवाह सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. प्रतिष्ठानकडून यावर्षी २३ व्या सामुहिक विवाह सोहळ्याचे आयोजन करण्यात येणार आहे. मागील २२ वर्षे सातत्याने सामुहिक विवाह सोहळ्याचे आयोजन करणारी शारदा प्रतिष्ठान ही एकमेव संस्था आहे. केवळ कोरोनाच्या संक्रमणामुळे मागील दोन वर्षे सामुहिक विवाह सोहळा आयोजनाची परंपरा खंडीत झाली. इच्छुकांनी सामुहिक विवाह सोहळ्यासाठी आपली नावनोंदणी तात्काळ करण्याचे आवाहन प्रतिष्ठानचे कार्यवाह अमरसिंह पंडित यांनी केले आहे.

शारदा प्रतिष्ठान गेवराई या संस्थेकडून अतिशय शिस्तबध्द व नेत्रदिपक सामुहिक विवाह सोहळ्याचे आयोजन करण्यात येते. सातत्याने २२ वर्षे अविरत सामुहिक विवाह सोहळा आयोजन करणारी शारदा प्रतिष्ठान ही राज्यातील एकमेव संस्था आहे, केवळ कोविड संक्रमणाच्या कालावधीत दोन वर्षे ही परंपरा खंडीत झाली. विवाहासारख्या संस्कारावर होणारा वारेमाप खर्च आणि अशा खर्चामुळे आर्थिक संकटात सापडलेले वधुपिता यांसह इतर अनिष्ट प्रथा बंद करण्याच्या उद्देशाने शारदा प्रतिष्ठानकडून सामुहिक विवाह सोहळ्याची चळवळ यशस्वीपणे राबविली जाते. यावर्षी शारदा प्रतिष्ठानचा सामुहिक विवाह सोहळा शनिवार, दि.१४ मे रोजी सायं. ०६ः३५ वाजता जयभवानी मंदिर परिसर, शिवाजीनगर, गढी, ता.गेवराई येथे करण्याचे निश्‍चित झाले असल्याची माहिती देताना इच्छुक वधु-वरांनी सामुहिक विवाह सोहळ्यासाठी आवश्यक कागदपत्रांसह नाव नोंदणी करावी असे आवाहन प्रतिष्ठानचे कार्यवाह अमरसिंह पंडित यांनी केले आहे.

शारदा प्रतिष्ठानच्या सामुहिक विवाह सोहळ्यात विवाहबध्द होणार्या जोडप्यांना नियमाप्रमाणे मिळणारे शासन अनुदान वाटप केले जाते. वधु-वरांचा संपुर्ण पोशाख, पादत्राणे, मनीमंगळसुत्र यांसह संसारोपयोगी साहित्याचा संच प्रतिष्ठानकडून भेट दिला जातो. नाव नोंदणीसाठी जगदंबा आयटीआय, गेवराई येथे वधुवरांच्या जन्म प्रमाणपत्रासह इतर आवश्यक कागदपत्रे देवून तातडीने नाव नोंदणी करण्याचेही आवाहन प्रतिष्ठानकडून करण्यात येत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *