आपल्या भाषेतील साहित्य  लोकांपर्यंत पोहोचविणे ही आपलीच जबाबदारी – नम्रता फलके

                    गेवराई, दि. २७ ( वार्ताहार ) 

‘भाषेची निर्मिती काहीतरी सांगण्यासाठी झाली आहे. आणि ती प्रक्रिया पूर्ण करणे, आपल्या भाषेतून साहित्य निर्माण करणे, निर्माण झालेले साहित्य लोकांपर्यंत पोहोचविणे ही ती भाषा बोलणाऱ्या प्रत्येकाची जबाबदारी असते. आपल्या भाषेवर प्रेम करावे परंतु भाषेसाठी दुराग्रही असता कामा नये. जगातील सगळी युद्धे भाषेवरून झाली आहेत. आपल्या मातृभाषेवर प्रेम असेल तरच आपण इतर भाषांवर प्रभुत्व मिळवू शकतो. जास्तीत जास्त भाषा येणे हे सुजाण असल्याचे लक्षण आहे. आपण इतर भाषेतील साहित्य आपल्या भाषेत अनुवादित करणे ही एक जबाबदारीची प्रक्रिया आहे. एकाहून अधिक भाषा आत्मसात केल्यामुळे आपल्याला मराठी भाषेच्या विकासासोबत जगातील भाषिक विकास, साहित्यिक विकास बघता येईल अनुभवता येईल. आणि तशा पद्धतीचे कार्य आपल्याला मातृभाषेत करता येईल. भाषा निर्मितीमध्ये महिलांचे योगदान अनन्यसाधारण आहे. स्त्री-पुरुष संवादातून भाषिक समृद्धी आपण साध्य करू शकतो’ असे विवेचन औरंगाबाद येथील आकाशवाणीच्या कार्यक्रमाधिकारी नम्रता फलके यांनी केले.

मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळाच्या गेवराई येथील र. भ.अट्टल महाविद्यालयाच्या भाषा आणि वाङ्मय मंडळ उद्घाटन आणि मराठी भाषा गौरव दिन या कार्यक्रमासाठी त्या प्रमुख पाहुणे म्हणून निमंत्रित होत्या. कार्यक्रमाच्या अध्यक्ष महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ. रजनी शिखरे यांनी अध्यक्षीय समारोप करताना, आपण आपल्या कामातून आणि चिकाटीतून आपल्या भाषेविषयीचा आदर वाढवत असतो, असे सांगून विद्यार्थ्यांनी भाषा आणि साहित्य समजून घेण्याचा परोपरीने प्रयत्न करावा व स्वतःला भाषिक दृष्ट्या संपन्न करावे असे आवाहन केले. याप्रसंगी विद्यार्थ्यांनी तयार करून आणलेल्या भित्तीपत्रकांचे मान्यवरांच्या हस्ते विमोचन करण्यात आले. कार्यक्रमाच्या सुरुवातीला कवी कुसुमाग्रज यांच्या प्रतिमेला अभिवादन करून, दीप प्रज्वलित करून उद्घाटन करण्यात आले. मराठी विभाग प्रमुख डॉ. संदीप बनसोडे, भाषा आणि वाङ्मय विभाग प्रमुख डॉ. समाधान इंगळे यांनी सुरेश भट रचित ‘लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी’ या कवितेचे गायन केले. तसेच अनुक्रमे कार्यक्रमाचे प्रास्ताविक व कार्यक्रमाची भूमिका मांडली.कु. लक्ष्मी काबरा हिने सूत्रसंचालन केले. प्रा. जयश्री वाघ यांनी पाहुण्यांचा परिचय दिला. तर हिंदी विभाग प्रमुख प्रा. संतोष नागरे यांनी आभार मानले. यावेळी उपप्राचार्य मेजर विजय सांगळे, उपप्राचार्य डॉ. प्रशांत पांगरीकर, कनिष्ठ महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा. राजेंद्र राऊत, इंग्रजी विभाग प्रमुख तथा आयक्यूएसी समन्वयक डॉ. प्रवीण सोनवणे आदींची उपस्थिती होती.

कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रा. शरद सदाफुले, प्रा. अरुण जाधव, डॉ. नवनाथ गोरे, सुदर्शन निकम, अशोक पावनपल्ले यांनी परिश्रम घेतले. महाविद्यालयातील विद्यार्थी प्राध्यापक व कर्मचारी यांची कार्यक्रमास मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *