जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुक मोर्चे बांधण्यासाठी
शिवसेना नेते बदामराव पंडित  उद्यापासून दौऱ्यावर 

               गेवराई दि १८ ( वार्ताहार ) 

बीड जिल्हा परिषद आणि गेवराई पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना नेते माजी राज्यमंत्री बदामराव पंडित ही उद्या दिनांक 20 फेब्रुवारी रोजी तलवाडा येथून झंझावती दौऱ्याला सुरवात करणार असून, गेवराई विधानसभा मतदार संघातील सर्व जि प गट आणि प स गणातील पदाधिकारी आणि ग्रामस्थांच्या भेटी घेऊन संवाद साधणार असल्याची माहिती गेवराई शिवसेनेकडून देण्यात आली आहे.

गेल्या पंचवार्षिक जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीमध्ये ऐनवेळी शिवसेनेत प्रवेश केलेल्या, शिवसेना नेते माजी राज्यमंत्री बदामराव पंडित यांनी संपूर्ण गेवराई विधानसभा मतदार संघात झंझावती दौरे करून, मजबूत अशी मोर्चेबांधणी केली होती. विद्यमान भाजप आ लक्ष्मणराव पवार आणि राष्ट्रवादीचे तत्कालीन विधानपरिषद सदस्य अमरसिंह पंडित हे दोघे त्यावेळी आमदार असल्याने, त्यांचे तगडे आव्हान समोर उभा असताना माजी राज्यमंत्री बदामराव पंडित यांनी या निवडणुकीमध्ये शिवसैनिक आणि कार्यकर्त्यांच्या बळावर बाजी मारली होती. जिल्हा परिषदेच्या 9 गटापैकी उमापूर, तलवाडा, मादळमोही आणि पाचेगाव या 4 जिल्हा परिषद गटावर आपले निर्विवाद वर्चस्व निर्माण करून, 6 पंचायत समिती सदस्य शिवसेनेच्या धनुष्यबाणावर निवडून आणले आहेत. शिवसेनेसोबत भाजपची युती झाल्याने जिल्हा परिषदेमध्ये याच सेनेच्या चार जिल्हा परिषद सदस्यामुळे युतीची सत्ता स्थापन झाली होती तर गेवराईच्या पंचायत समितीवरही पहिल्यांदाच शिवसेनेचा भगवा फडकला होता. याहीवेळी सर्वाधिक जिल्हा परिषद आणि पंचायत समितीचे सदस्य निवडून आणण्यासाठी, रात्रंदिवस जनसंपर्कात असलेले माजी राज्यमंत्री बदामराव पंडित यांनी कंबर कसली असून, ते उद्या दिनांक 20 फेब्रुवारी 2022 पासून मतदार संघातील प्रत्येक जिल्हा परिषद गटामध्ये जाऊन पदाधिकारी, शिवसैनिक आणि ग्रामस्थांशी संवाद साधणार आहेत. दिनांक 20 रोजी तलवाडा तर 21 फेब्रुवारी ते 11 मार्च पर्यंत धोंडराई, उमापूर, पाचेगाव, मादळमोही, रेवकी चकलांबा गडी जातेगाव टाकरवन बहिरवाडी तालखेड पिंपळनेर आधी सर्कल मधील सर्व पंचायत समिती गण पिंजून काढणार आहेत. एकंदरीत नवीन जिल्हा परिषद गटाची आणि पंचायत समिती गणाची निर्मिती झाल्याची घोषणा अद्याप बाकी असताना मात्र बदामराव पंडित यांनी निवडणुकीसाठी मोर्चेबांधणी केल्याने आता तालुकाभरत राजकीय धुराळा उडणार हे नक्की.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *