आदिवासी बांधवाला मिळाले जीवदान, गोरगरिबांचा कैवारी ठरले डॉ. फाटक

डॉ. दीपक फाटक यांच्या शर्थीच्या प्रयत्नाने रुग्ण मृत्यूच्या दाढेतून परतला
गेवराई, दि. 1 (प्रतिनिधी): अंबू नाईक तांडा, खांडवी येथील आदिवासी पारधी समाजातील भद्री भोसले (वय 40) यांना डॉ. दीपक फाटक यांच्या वेळेवर केलेल्या उपचारांमुळे जीवदान मिळाले. मृत्यूशी झुंज देणारा रुग्ण सहा दिवसांत चालता-बोलता घरी परतला.
दि. 24 एप्रिल 2026 रोजी सकाळी 9.30 वाजता भद्री भोसले यांना त्यांच्या पत्नीने बेशुद्ध अवस्थेत गेवराई क्रिटिकल केअर हॉस्पिटलमध्ये दाखल केले. त्यावेळी त्यांना 105.6°F ताप, मेंदूला सूज व सतत येणारे फिट्स (स्टेटस एपिलेप्टिकस) असा त्रास होता. रुग्ण तीन दिवस कोमात होता. नातेवाईक घाबरले होते, मात्र डॉ. फाटक यांनी त्यांना धीर देत उपचार सुरू केले.
डॉ. फाटक यांनी तातडीने NCCT ब्रेन सिटी स्कॅन करून मेंदूची तपासणी केली. रुग्णाची आर्थिक परिस्थिती बेताची असल्याने त्यांनी महागड्या तपासण्यांवर सवलत दिली. मानेला कडकपणा जाणवल्याने मेंदूतील पाणी (CSF) तपासले असता मेनिंजायटिसचे निदान झाले. त्यानुसार योग्य अँटिबायोटिक्स सुरू केले.
तीन दिवसांनी रुग्ण शुद्धीवर आला, मात्र दारूच्या व्यसनामुळे पुन्हा विड्रॉलमध्ये फिट्स येऊ लागल्या. डॉ. फाटक यांनी त्यावरही यशस्वी उपचार केले. अखेर भद्री भोसले पूर्णपणे बरे झाले. ते आता बोलू, चालू व फिरू लागले आहेत.
डॉ. फाटक यांनी उपचारासोबतच भद्री भोसले यांना दारू सोडण्याचे समुपदेशन केले. पैशाची अपेक्षा न ठेवता सामाजिक बांधिलकी जपल्याने त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.
दि. 30 एप्रिल रोजी त्यांना डिस्चार्ज देण्यात आला. यावेळी आदिवासी सेवक पुरस्कार प्राप्त सामाजिक कार्यकर्ते कडूदास कांबळे व नातेवाईकांनी डॉ. फाटक यांचा सत्कार करून आभार मानले.”गोरगरीबांचा खरा कैवारी, गरीबांचा आधार” अशा शब्दांत गेवराईकर डॉ. फाटक यांचे कौतुक करत आहेत.



