April 19, 2025

 फोटोग्राफरवर गुन्हा दाखल करण्याची पत्रकार संघाची  मागणी

                 गेवराई  दि २५ ( वार्ताहार ) 

लग्नसोहळ्यात फोटोग्राफी अवश्य करा, पण लग्नसोहळा ताब्यात देऊ नका अशा आशयाची असलेली सामाजिक बातमी देणाऱ्या पत्रकार दिनकर शिंदे यांच्या विरोधात फोटोग्राफर संघटनेने, गैरसमजातून निषेध आंदोलन केल्यानंतर, गेवराई तालुक्यातील पत्रकार संतप्त झाले असून, सामाजिक लिखाण करणाऱ्या पत्रकारावर दबाव आणू पाहणाऱ्या आणि एक प्रकारे पत्रकारांची मुस्कटदाबी करू पाहणाऱ्या या अंदोलनकर्त्या फोटोग्राफर संघटनेने विरोधात कारवाई करावी त्यासोबतच जमावबंदीचा आदेश मोडून गर्दी केल्याबाबत त्यांच्यावर गुन्हे दाखल करावेत अशी मागणी तहसीलदार सचिन खाडे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

समाजाभिमुख लिखाण करणारे गेवराई तालुका पत्रकार संघाचे सचिव पत्रकार दिनकर शिंदे यांनी समाजहितासाठी दिनांक 23 जानेवारी रोजी दैनिक पार्श्वभूमी या वृत्तपत्र मध्ये, विवाह सोहळ्याला फोटोग्राफी आवश्य करा पण लग्न सोहळा ताब्यात घेऊ पाहणाऱ्या फोटोग्राफरला आवरा, या मथळ्याखाली तमाम फोटोग्राफरचे कौतुक करणारी आणि त्यांची महत्त्वाची भूमिका विषद करणारी रोखठोक बातमी प्रकाशित केली आहे. त्यात चांगल्या फोटोग्राफरच्या कार्याची दखल घेऊन त्यांच्यामुळे सामान्य माणसाच्या जीवनात आनंदी क्षण टिपता येतात असे सांगून, मात्र या फोटोग्राफीच्या आडून काही फोटोग्राफर चुकीच्या पद्धतीने विवाह सोहळ्यात वागत असल्याबाबत उल्लेख केला आहे. वास्तविक पाहता या बाबतीत इतर फोटोग्राफरला वाईट वाटण्याचे काहीही कारण नसताना, काही फोटोग्राफर यांनी संघटनेच्या माध्यमातून निवेदन देऊन पत्रकार दिनकर शिंदे यांचा निषेध करून कारवाईची मागणी करत, पत्रकाराच्या व्यक्तिस्वातंत्र्यावर गदा आणण्याचा आणि सामाजिक लिखाण करणाऱ्या पत्रकाराची मुस्कटदाबी करण्याचा प्रयत्न केला आहे. त्यासोबतच पत्रकार दिनकर शिंदे यांना सोशल मीडियाच्या माध्यमातून आणि फोनवर धमक्या देण्यात येत आहेत.

त्यांच्या फोटोवर फुली मारून धमकीवजा संदेश काही फोटोग्राफर यांच्याकडून देण्यात येत आहे. याविरोधात गेवराई तालुक्यातील पत्रकार संतप्त झाले असून, त्यांनीही दिनांक 25 जानेवारी रोजी तहसील कार्यालय येथे जाऊन, पत्रकारांची मुस्कटदाबी करू पाहणाऱ्या संबंधित फोटोग्राफर संघटनेच्या पदाधिकाऱ्यांवर कारवाई करावी अशी मागणी करून, जमावबंदीचा आदेश लागू असताना तो मोडून फोटोग्राफर संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी गर्दी केल्याबद्दल त्यांच्यावर कठोर कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी निवेदनाद्वारे तहसीलदार सचिन खाडे यांच्याकडे केली आहे. या निवेदनावर गेवराई तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष मधुकर तौर, सचिव दिनकर शिंदे, उपाध्यक्ष सखाराम शिंदे, उपाध्यक्ष कैलास हातघुले, सहसचिव भागवत जाधव, कार्याध्यक्ष गणेश शिरसागर, ज्येष्ठ पत्रकार आयुब बागवान, सुभाष सुतार, राजेंद्र बरकसे, काजी आमन, वैजनाथ जाधव, उपजिल्हाध्यक्ष जुनेद बागवान, प्रसाद कुलकर्णी, सुशील टकले, शेख इर्शाद, लक्ष्मण आहेर, गजानन चौकटे, सय्यद सिराज, आनंत कलाल, भास्कर सोळुंके, दत्ता वाघमारे, लक्ष्मण राऊत, अल्ताफ कुरेशी, अझहर इनामदार, भरत खरात, धनंजय बजगुडे, रामकीसन तळेकर, गोपाळ चव्हाण, मनोज आहेर, विजय नाटकर, कालिदास काकडे, सुनील मिसाळ आदी पत्रकारांच्या स्वाक्षर्‍या आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *