April 19, 2025

सावतानगर मध्ये भाजी विकण्यास परवानगी द्या

अन्यथा तहसिल कार्यालयात बाजार भरवू

                 गेवराई दि २० ( वार्ताहार ) 

कोरोना संक्रमणाची भिती दाखवून गेवराई नगर परिषद सावता नगरमधील भाजी विक्रेत्यांवर राजकीय सुड उगवत आहे असा आरोप करून सावतानगर मधील साठ फुटी रस्त्यालागत भाजी विकण्यास परवानगी द्या अन्यथा तहसिल कार्यालयात बाजार भरवू असा इशारा सावतानगर मधील भाजी विक्रेत्यांनी दिला आहे. या बाबत सदा वादे, राम म्हेत्रे, दिनेश घोडके आदींच्या उपस्थितीत तहसिलदारांना लेखी निवेदन देण्यात आले.

भाजीपाल्याची शेती करणारे आणि भाजी विकून उदर्रनिर्वाह करणार्‍या रहिवाशांची संख्या सावतानगर परिसरात मोठ्या प्रमाणावर आहे. मात्र गेवराई नगर परिषदेने अचानक बुधवार दि.१९ जानेवारी रोजी सावता नगरमधील आठवडी बाजारच्यानिमित्ताने रस्त्यालगत भाजी विक्री करणार्‍या विक्रेत्यांना कोणतीही पूर्व सुचना न देता हाकलून लावले. कोरोना संसर्ग सुरु झाल्यापासून मागील दोन वर्षांच्या काळात प्रशासनाने गेवराई शहरातील आठवडी बाजार बंद केला. आठवडी बाजाराची जागा सावतानगरच्या साठ फुटी रस्त्यालगत, कोल्हेर रोड, मोंढा नाका, ताकडगाव रोड आदी भागांत ठरवून दिली त्याप्रमाणे आजही भाजी विक्रेते त्या-त्या भागात भाजीपाला विक्रीचा व्यवसाय करत आहेत. बुधवारी अचानक भाजी विक्री करण्यास नगर परिषद कर्मचार्‍यांनी मज्जाव केला, त्यानंतर या भागातील भाजी विक्रेत्यांनी नगर परिषदेमध्ये जावून या बाबत विचारणा केली असता तहसिलदारांचे वाहन या भागातून जाण्यास अडसर होत असल्यामुळे तुमचा बाजार बंद केल्याचे नगर परिषद प्रशासनाने सांगितले. वास्तविक गेवराई नगर परिषद कोरोना संसर्गाचे कारण सांगून जाणीवपूर्वक सावतानगर मधील भाजी विक्री व्यवसाय बंद करून तो कोल्हेर रोडवर हालविण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप भाजी विक्रेत्यांनी यावेळी केला.

नगर परिषदेचा निषेध करून या भागातील राम म्हेत्रे, सदा वादे, कैलास मस्के, भागवत घोडके, दिनेश घोडके, सावता वादे, राहुल वादे, गोकुळ म्हेत्रे यांच्यासह आदींनी तहसिलदारांना लेखी निवेदन दिले. निवेदनावर अनेक महिला भाजी विक्रेत्यांच्या स्वाक्षर्‍या आहेत. सावतानगर मधील भाजी विक्रेत्यांमध्ये प्रशासन आणि नगर परिषदेच्या विरोधात संतापाची भावना निर्माण झाली असून त्यांनी सावतानगर मध्ये तात्काळ भाजी विक्री करण्यास परवानगी द्यावी अन्यथा तहसिल कार्यालयात आठवडी बाजार भरू असा इशारा दिला आहे. त्यांनी या प्रकरणी तहसिलदारांना लेखी निवेदन दिले आहे. या भागातील काही रहिवाशांनी नगर परिषद कोरोनाच्या संकटाच्या आडून राजकीय सुड सावतानगर मधील भाजी विक्रेत्यांवर काढत असल्याची भावना व्यक्त केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *