महापुरुषांचे विचार समजून घेणे ही सर्वात आनंद देणारी गोष्ट – समाधान इंगळे
राजमाता जिजाऊ आणि स्वामी विवेकानंद जन्मोत्सव २०२२ तुलसी सभागृह येथे साजरा
बीड दि 13 ( वार्ताहार )
देवगिरी प्रतिष्ठाण संचलित, तुलसी शैक्षणिक समूह, बीड यांच्या वतीने राजमाता जिजाऊ जन्मोत्सवानिमित्त व्याख्यानमालेचे आयोजन तुलसी सभागृह, बीड येथे करण्यात आले होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रा.प्रदीप रोडे यांची उपस्थिती होती तर व्याख्याते म्हणून डॉ. समाधान इंगळे (प्रसिद्ध वक्ते, गायक, निवेदक तथा मराठी विभाग, र.भ.अट्टल महाविद्यालय, गेवराई) यांना आमंत्रित करण्यात आले होते. यावेळी प्राचार्य उमा जगतकर, प्राचार्य अश्विनी बेद्रे, प्राचार्य देविदास निकाळजे यांची उपस्थिती होती.
राजमाता जिजाऊ जन्मोत्सव २०२२ व्याख्यानमालेत बोलतांना डॉ.समाधान इंगळे म्हणाले की, ‘तथागत भगवान गौतम बुद्ध, संत कबीर, संत रोहिदास, संत तुकाराम महाराज, यांच्यापासून ते राजमाता जिजाऊ, छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा ज्योतिबा फुले, सावित्रीबाई फुले, राजर्षी शाहू महाराज ते डॉ.बाबासाहेब आंबेडकर या महापुरुषांची विचारधारा एकसमान आहे. ही विचारधारा आत्मसात करून त्याप्रकारे वागण्याचा प्रयत्न प्रत्येकाने केला पाहिजे. आपल्या आतल्या प्रकाशाला महत्व दिले पाहिजे’ असे सांगून ‘भक्त बनण्यापेक्षा यासर्व महापुरुषांच्या विचारांचे अनुयायी व्हा’ असे मार्मिक आवाहन डॉ. समाधान इंगळे यांनी आपल्या व्याख्यानातून केले. उपस्थित श्रोत्यांना संबोधताना ते म्हणाले की,’ महापुरुष पुतळ्यांमध्येच बंद करू नका, त्यांचा विचार आत्मसात करून तो विचार परिवर्तित करा. जनमानसात महापुरूषांची विचारधारा पोहचवली पाहिजे यासाठी प्रयत्न करा’ जिजाऊ यांच्या कार्याविषयी सखोल माहिती देत जिजाऊ यांच्या कार्याचा आढावा घेणारा पोवाडा इंगळे यांनी गायला. छत्रपती शिवाजी महाराज यांची जडणघडण, अंधश्रध्दा निर्मूलनाचे जिजाऊ यांचे कार्य याविषयी विस्तृतपणे त्यांनी मार्गदर्शन केले. अध्यक्षीय भाषणात बोलतांना प्रा.प्रदिप रोडे म्हणाले की, ‘महापुरुषांची विचारधारा समजण्यासाठी महिलांनी राजमाता जिजाऊ, सावित्रीमाई, माता रमाई यांचे ग्रंथ वाचले पाहिजेत. महिलांनी घराबाहेर पडून व्याख्यानाच्या माध्यमातून हे विचार आत्मसात केले पाहिजेत’ या कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा.योगिता लांडगे यांनी केले, सूत्रसंचालन प्रा.अंकुश कोरडे यांनी केले. आभार सरकटे यांनी मानले. यावेळी तुलसी समूहातील सर्व प्राध्यापक व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
लोकशाहीचा अर्धवट उत्सव: स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा वनवास. [दर्पणदिन विषेश ] भारतीय लोकशाहीच्या सुदृढ वाटचालीमध्ये केंद्र आणि राज्य सरकारइतकेच...