वंचित’ च्या शिवराज बांगरवर झोपडपट्टी दादा कायद्याने कारवाई

                     बीड दि.9 ( वार्ताहार ) 

वंचित बहुजन आघाडीचे माजी जिल्हाध्यक्ष व वंचित ऊसतोड कामगार संघटनेचे प्रदेशाध्यक्ष शिवराज बांगर यांच्यावर एमपीडीए (महाराष्ट्र झोपडपट्टी दादा प्रतिबंधक कायदा) नुसार कारवाई करण्यात आली. शिवाजीनगर पोलिस ठाणे व गुन्हे शाखेच्या संयुक्त पथकाने शनिवारी (दि.८) त्यांना मुंबईतील बेलापूर येथील एका लॉजमधून ताब्यात घेतले.

शिवराज बांगर यांच्याविरुद्ध एमपीडीएनुसार कारवाईचा प्रस्ताव शिवाजीनगर ठाण्याचे तत्कालीन पोलिस निरीक्षक साईनाथ ठोंबरे यांनी पोलीस अधीक्षकांकडे पाठविला होता. पोलीस अधीक्षक आर. राजा यांनी हा प्रस्ताव तपासून जिल्हाधिकारी राधाविनोद शर्मा यांना सादर केला. श्री. शर्मा यांनी ता. ३१ डिसेंबरला

या प्रस्तावाला मान्यता दिली. तेव्हापासून श्री. बांगर यांचा शोध सुरू होता. बांगर मुंबईतील बेलापूर येथे असल्याची माहिती मिळाल्यावरून पोलीस अधीक्षक आर. राजा, अप्पर अधीक्षक सुनील लांजेवार, उपअधीक्षक संतोष वाळके, गुन्हे शाखेचे निरीक्षक सतीश बाघ, शिवाजीनगर ठाण्याचे निरीक्षक के तन राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक प्रवीण पाथरकर, गुन्हे शाखेचे सहायक उपनिरीक्षक हनुमंत खेडकर, हवालदार रामदास तांदळे यांचे पथक रवाना झाले. तांत्रिक तपासाआधारे शनिवारी सकाळी साडेदहा वाजता बेलापूर येथे एका लॉजमधून बांगर ताब्यात घेतले. त्यांना सायंकाळी बीडला आणले. त्यानंतर औरंगाबाद येथील हर्मूल कारागृहात स्थानबद्ध करण्यात आले.

कार्यकर्त्याविरूद्ध झालेल्या कारवाईबद्दल संताप

शिवराज बांगर हे अनेक वर्षापासून राजकीय, सामाजिक जिवनात आहेत. वंचित बहूजन आघाडीच्या माध्यमातून बांगर यांनी सातत्याने समाजातील अनेक प्रश्नावर आवाज उठविलेला आहे. त्यातही ऊसतोड कामगारांच्या प्रश्नावर राज्यभरात बांगर यांनी आवाज उठविला होता. वंचितच्या माध्यमातून शोषितांचे प्रश्न मांडताना त्यांनी अनेकदा व्यवस्थेला अंगावर घेतले. तसेच अनेक प्रकरणात प्रस्तापितांनाही त्यांनी आव्हान दिले होते. कोणत्याही स्वरूपाचे व्यक्तीगत गुंडगिरीचे गुन्हे नसताना त्यांच्यावर ही कारवाई करण्यात आल्याची भावना सोशल मीडियामध्ये व्यक्त होत आहे. विविध सामाजिक चळवळीमध्ये काम करणाऱ्या कार्यकत्यांनी देखील शिवराज बांगर यांच्यावर झालेल्या या कारवाईचा जाहीरपणे निषेध केला आहे. जयभीम चित्रपटात शोभावी अशा पद्धतीने ही दडपशाहीची कारवाई असल्याच्या भावनाही अनेकांनी सोशल मीडियावर पोस्ट केल्या आहेत. शिवराज बांगर यांच्याबद्दल राजकीय मतभेद असू शकतात मात्र कोणत्याही कार्यकर्त्यांवर अशा प्रकारची कारवाई होणे दुर्दैवी असल्याच्या भावना विविध संघटनामधील कार्यकर्ते बोलवून दाखवत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *