April 19, 2025

गेवराईची कन्या उर्दू कनिष्ठ महाविद्यालय लवकरच बंद पडण्याच्या मर्गावर

शिक्षकांची मान्य पदे न भरल्यास आंदोलन – शेख मोहसीन

              गेवराई, दि. 4 (वार्ताहर)

अंजुमन निदा-ए-उर्दूचे अध्यक्ष तथा जेष्ठ पञकार काझी अमान,युवा पञकार अय्यूब बागवान यांच्या विशेष प्रयत्नाने व शिक्षणप्रेमी समाज बांधवांच्या सहकार्याने गेल्या २० वर्षांपुर्वी गेवराई येथे अल्पसंख्यांक मुस्लिम समाजातील विद्यार्थीनींच्या शिक्षणासाठी उर्दू कनिष्ठ महाविद्यालय (११ वी,१२ वी कला) सुरु करण्यात आले.परंतु संपुर्ण बीड जिल्ह्यातील जिल्हा परिषदचे एकमेव असलेले हे कनिष्ठ महाविद्यालय शिक्षकांअभावी लवकरच बंद पडण्याच्या मर्गावर आहे.शिक्षकांची ३ मान्य पदे त्वरित न भरल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे गेवराई शहराध्यक्ष शेख मोहसीन यांनी दिला आहे.

याबाबत प्रसिद्धीस दिलेल्या पञकात शेख मोहसीन यांनी म्हटले आहे की,गेवराई येथे अल्पसंख्यांक मुस्लिम समाजाच्या मुलींसाठी १० वी नंतर पुढील शिक्षणाची सोय नसल्याने त्यांना बीड येथे जाऊन शिक्षण घ्यावे लागत होते.त्यामुळे अर्थिक परिस्थितीअभावी पुढील शिक्षणापासुन मुलींना वंचित राहावे लागत होते.तर अनेक विद्यार्थीनी १० वी नंतर शिक्षण सोडून घरी बसल्या होत्या.या बाबीचा गांभीर्यांने विचार करुन अंजुमन निदा-ए-उर्दूचे अध्यक्ष तथा जेष्ठ पञकार काझी अमान,युवा पञकार अय्यूब बागवान व शिक्षण प्रेमी समाजबांधवांनी विशेष प्रयत्न केले.गेवराई तालुक्याचे भूमिपुञ असलेले काँग्रेसचे माजी आमदार एम. एम.शेख यांच्यामार्फत त्यांनी शिक्षण विभागात प्रस्ताव दाखल केला.माजी.आ.शेख यांनी तत्कालीन शिक्षणमंञ्यांकडे पाठपुरावा करुन गेवराई येथे कन्या उर्दू कनिष्ठ महाविद्यालयाला(११वी, १२वी कला) सन २००१ मध्ये मंजुरी मिळवून दिली.तर हे कनिष्ठ महाविद्यालय चालु राहावे,म्हणुन राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस तथा माजी आमदार अमरसिंह पंडित यांनी त्यावेळी जि.प.चे विरोधी गटनेते असतांना प्रतिनियुक्तीवर शिक्षक उपलब्ध करुन दिले व विद्यार्थीनींच्या शिक्षणासाठी त्यांना स्वखर्चाने अभ्यासक्रमाची पुस्तके दिली.त्यामुळे गेल्या २० वर्षांमध्ये दिड ते दोन हजार विद्यार्थिंनी उतीर्ण झाल्या असुन असंख्य मुली ग्रॅज्युएट-पोस्ट ग्रॅज्युएट तर अनेक मुली जिल्हा परिषद व संस्थेत शिक्षिका म्हणुन कार्यरत आहेत.अश्या प्रकारे विद्यार्थीनींना स्वावलंबी बनण्यासाठी या महाविद्यालयापासून फायदा होत असतांना दुर्दैवाची बाब म्हणजे गेल्या २० वर्षांपासुन हे कनिष्ठ महाविद्यालय उधार शिक्षकावर चालत आहे.या महाविद्यालयाच्या दुरावस्थेबाबत विधानपरिषदेचे तत्कालीन आमदार अमरसिंहजी पंडित यांनी अधिवेशनात तारांकीत प्रश्न विचारुन शिक्षणमंञ्यांना धारेवर धरले होते. आता तर,प्रथामिक पदवीधर असलेल्या एकाच प्रतिनियुक्त शिक्षकाला ११वी, १२वी या दोन्ही वर्गातील विद्यार्थीनींच्या अध्यापनासह कारकुन व सेवकाचीही जबाबदारी पार पाडावी लागत असल्याने हे महाविद्यालय लवकरच बंद पडण्याच्या मर्गावर आहे.

विशेष म्हणजे सन २००१ पासुन सुरु असलेल्या गेवराईच्या कन्या उर्दू कनिष्ठ महाविद्यालयाला सन २००९ पासुन १००% अनुदान व शिक्षकांची ३ पदे मंजुर आहेत.परंतु शिक्षण विभागाने ही पदे न भरल्याने विद्यार्थीनींचे प्रचंड शैक्षणिक नुकसान होत आहे.शिक्षकांची मान्य पदे त्वरित न भरल्यास तिव्र आंदोलन करण्याचा इशारा राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे गेवराई शहराध्यक्ष शेख मोहसीन यांनी दिला आहे.

पालकमंत्री व वरिष्ठ अधिकारी यांना भेटून निवेदन देणार

गेवराई येथील कन्या उर्दू कनिष्ठ महाविद्यालयात शिक्षकांची ३ मान्य पदे त्वरित भरण्यात यावीत,या मागणीसाठी बीड जिल्ह्याचे पालकमंत्री ना.धनंजय मुंडे,राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस तथा मा.आमदार अमरसिंहजी पंडित,जि.प.चे मुख्यकार्यकारी अधिकारी,शिक्षणाधिकारी आदिंना भेटून निवेदन देणार असल्याचे राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे गेवराई शहराध्यक्ष शेख मोहसीन यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पञकात म्हटले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *