मुलांचं कर्तव्य गेलं कुठं? बहिणींनी सख्ख्या भावांना का करु दिले नाहीत आईवर अंत्यसंस्कार?
औरंगाबाद : दि 3 ( वार्ताहार )
वृद्धापकाळाने निधन झालेल्या आपल्या आईवर तीन मुलींनी अंत्यसंस्कार केले आहेत. या तिनही मुलींनी आपल्या सख्ख्या भावाला आईचे अंत्यसंस्कार करू दिले नाहीत. या तिनही मुलींनी एका जाऊबाईच्या मदतीने आईच्या मृतदेहाला खांदा देत स्मशानभूमी गाठली आणि अंत्यसंस्कार केले. ही घटना घडलीय औरंगाबाद जिल्ह्यातील सिल्लोड तालुक्यातील लिहाखेडी या गावात. आता तुम्हाला सहाजीकच असा प्रश्न पडला असेल की, या मुलींनी आपल्या भावांना आईचे अंत्यसंस्कार करण्यापासून का रोखले?
सिल्लोड तालुक्यातील लिहाखेडी येथील चंद्रभागाबाई आनंदा साखळे (वय, 90) यांचे निधन झाले. त्यांनी आपल्या तिनही मुलांना शिकवलं, मोठं केलं. पण आईच्या उपकाराची परतफेड करण्याची वेळ आल्यानंतर त्यांच्या तिनही मुलांनी 20 वर्षांपूर्वी त्यांना घराबाहेर हाकलून दिले. वंशाच्या दिव्यांनीच घरातून बाहेर काढल्यानंतर ‘त्या’ आईला आधार दिला, तो मुली आणि जावयांनी. अखेर वृद्धापकाळाने शनिवारी चंद्रभागाबाई यांनी जगाचा निरोप घेतला. तिच्या अंत्यसंस्कारालादेखील तीन मुलांपैकी दोघांनी फक्त पाहुण्यांसारखी हजेरी लावल्याने संतप्त लेकींनी त्या दोघांनाही आईच्या मृतदेहाला हात लावू दिला नाही. सुभद्राबाई श्रीकृष्ण टाकसाळे (रा. औरंगाबाद), सुनीता शिवाजी सोने (रा. अनवी), जिजाबाई उत्तम टाकसाळे (रा. कोटनांद्रा), तर जाऊबाई छाया शिरसाठ (रा. लिहाखेडी) या चौघींनी आपल्या आईच्या मृतदेहाला खांदा दिला आहे
मुलांनी चंद्रभागाबाईंना वाऱ्यावर सोडले होते. तरीही त्यांना आपल्या तिन्ही मुलांना भेटायची इच्छा होती. अनेक वेळा तिन्ही मुलांना फोन करूनही ते आईला बघायला फिरकले नाहीत. शेवटी मुलांच्या भेटीविनाच तिने आपले प्राण सोडले. पोटाला चिमटा घेऊन चंद्रभागाबाईंनी तिन्ही मुलांसह मुलींना शिक्षण दिले. काबाडकष्ट करून मुलांच्या शिक्षणासाठी त्यांनी पै-पै जमा केली. मुलगा सेवानिवृत्त कृषी अधिकारी, दुसरा उच्च न्यायालयात क्लर्क, तर तिसरा मुलगा एका खासगी कंपनीत उच्च पदावर आहे. पण या मुलांनी सुखाच्या प्रसंगात आईला आपल्यापासून दूर केले. अखेर त्या आईला मायेचा आधार मिळाला, तो औरंगाबाद शहरात राहणारी मुलगी सुभदा आणि जावई श्रीकृष्ण टाकसाळे यांचा.
तीस वर्षांपूर्वी वडिलांचे निधन झाले होते. तेव्हापासून माझ्या भावांनी आईला सोडून दिलेले आहे. सुरुवातीची दहा वर्षे ती आम्हा बहिणींकडे राहत असे. तर गेल्या वीस वर्षांपासून ती माझ्याकडे होती. मुलीच्या नात्याने मी तिचे सर्व कर्तव्य पूर्ण केले. पण भाऊ मात्र कर्तव्य विसरले. असे निर्दयी भाऊ व मुले कोणालाही मिळवू नयेत, अशी संतप्त प्रतिक्रिया तिनही बहिणींनी दिली आहे.