January 22, 2025

माध्यमिक विद्यालय रामपुरी येथे भरला माजी विद्यार्थ्यांचा स्नेह मेळावा

२१ वर्षानंतर शालेय विद्यार्थ्यांचे गेटटुगेदर

          गेवराई दि 3 ( वार्ताहार )

 जयभवानी शिक्षण प्रसारक मंडळ संचलित गेवराई तालुक्यातील माध्यमिक विद्यालय रामपुरी येथे तब्बल २१ वर्षानंतर सन १९९९-२००० या वर्षाच्या दहावीच्या बॅचचे माजी विद्यार्थी व शिक्षक एकत्रित आले. अतीशय थाटामाटात स्नेहमेळावा भरवून शालेय जीवनातील आठवणींना उजाळा देण्यात आला.

माध्यमिक विद्यालय रामपुरी येथे तब्बल २१ वर्षानंतर दहावीच्या बॅचचे माजी विद्यार्थी आपले वय,पद,प्रतिष्ठा,कामाचा व्याप बाजूला ठेवून सर्व विद्यार्थी पुणे, मुंबई परभणी, औरंगाबाद अशा महाराष्ट्रातील वेगवेगळ्या ठिकाणाहून मोठ्या उत्साहाने एकत्र जमले. सर्व सुख दुःख विसरून सर्वजण मोठ्या आनंदाने आणि उत्साहाने या मेळाव्यामध्ये सहभागी झाले होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेचे मुख्याध्यापक अशोक तौर होते तर प्रमुख पाहुणे म्हणून त्यावेळेचे शिक्षक विश्वनाथ दराडे, गंगाधर बोर्डे आदी मान्यवर उपस्थित होते.

यावेळी बोलताना आपल्या अध्यक्षीय भाषणामध्ये मुख्याध्यापक अशोक तौर यांनी शिक्षणाचे महत्त्व सांगून आपल्या मुलांना सु – संस्कारीत करा, त्यांच्या शिक्षणाकडे विशेष लक्ष द्या, शिक्षणामुळे माणूस कसा मोठा होतो याची उदाहरणे दिली. कार्यक्रमात जमलेल्या मित्रांच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहत होता. अनेक वर्षानंतर आपण एकत्र भेटत आहोत त्यामुळे बऱ्याच जणाला एकमेकाला ओळखता येत नव्हते, नावे ऐकली की हसून एकमेकांची गळाभेट घेत होते. शाळेतील जुन्या आठवणी, गप्पा गोष्टी, धमाल-मस्ती, त्यावेळच्या स्नेह संमेलनातील आठवणी, शिक्षक दिनाच्या आठवणी, एकमेकांच्या टोपण नावाच्या आठवणी, वाद विवाद यावर भरपूर चर्चा रंगली यावेळी पाच हजार रुपयांची शाळेला भेट वस्तु देण्यात आली. या सर्व कार्यक्रमामध्ये दिवस कधी निघून गेला हे कुणालाही कळाले नाही.

कार्यक्रमाचे सूत्र संचलन जाधव एल.जी. यांनी केले कार्यक्रमाचे आयोजन जगदिश मस्के, संदिपान मस्के, आण्णासाहेब मस्के, नितीन पवार, किसन घटे, ज्ञानेश्वर घटे, अनिल पवार, प्रल्हाद मस्के, पुरुषोत्तम मस्के, योगेश मस्के, हरिभाऊ डोंगरे, सचिन राखे, नाना वैद्य, गणेश वैद्य, शिवाजी तौर, गोपाळ माने, दत्ता लांडे आदीनी परिश्रम घेतले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *