April 19, 2025

नाताळनिमित्त सेंट झेवियर्समध्ये सांस्कृतिक कार्यक्रम संपन्न
अन्याय सहन करू नका,पण उत्तर शांततेने द्या – फादर खंडागळे

                  गेवराई दि 25 ( वार्ताहार ) 

आज सर्वत्र प्रगतीसाठी आणि वर्चस्व निर्माण करण्याची स्पर्धा सुरू आहे. पण खऱ्या अर्थाने प्रगती साधण्यासाठी जगाला शांततेची गरज आहे. शांत आणि संयमी रहा, परंतु कोणाचा अन्याय सहन करू नका. अन्यायाला उत्तर देतानाही ते शांततेने दिले गेले पाहिजे हाच संदेश येशू ख्रिस्ताने दिला असल्याचे प्रतिपादन मुख्याध्यापक फादर पीटर खंडागळे यांनी केले आहे.

गेवराई येथील सेंट झेवियर्स स्कूलमध्ये नाताळनिमित्त विविध सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्याप्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमास गेवराई तालुका पत्रकार संघाचे सचिव तथा सेंट झेवियर्स स्कूलचे पालक प्रतिनिधी दिनकर शिंदे, प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक अमोल भालेकर, पर्यवेक्षक दीपक देशपांडे यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी शाळेतील प्राथमिक व माध्यमिक विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी येशू ख्रिस्त यांचा जीवन प्रवास दाखवणारी नाटिका सादर केली. तसेच बहारदार गीत व नृत्य सादर करून रसिकांची मने जिंकली. शाळेतील शिक्षकांनीही सांस्कृतिक कार्यक्रमात सहभाग नोंदवुन विद्यार्थ्यांना प्रोत्साहन दिले. पुढे बोलताना फादर पीटर खंडागळे म्हणाले की, जीवन जगताना प्रेम, दया, शिस्त आणि शांती अतिशय महत्त्वाची आहे. समाजातील सर्व घटकांना सोबत घेऊन चालणे अत्यंत गरजेचे आहे, हीच शिकवण येशु ख्रिस्त यांनी दिली. आपण शांत राहिलो तर आपले कुटुंब, नातेवाईक व शेजारी शांततेने व्यवहार करतात असेही ते म्हणाले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक शरद सर यांनी केले. सूत्रसंचालन विनोद वंजारे तर आभार प्रदर्शन नमोद दहीवाले यांनी केले. कार्यक्रमास पालक सर्व शिक्षक वृंद व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. शेवटी सांता क्लॉजने सर्वांना खाऊचे वाटप केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *