ठाण्यात फुले दाम्पत्याचे स्मारक उभारणार; महासभेत सभागृह नेत्यांचा प्रस्ताव 

             ठाणे: दि 18 ( वार्ताहार )

ठाण्यात महात्मा फुले आणि क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले यांचं स्मारक उभारण्याचा मार्ग अखेर मोकळा झाला आहे. ठाणे पालिकेचे सभागृह नेते अशोक वैती यांनी फुले दाम्पत्याचं स्मारक उभारण्याचा प्रस्ताव सभागृहात सादर केला आहे. त्यामुळे हा प्रस्ताव मंजूर होताच ठाण्यात महात्मा फुले आणि सावित्रीमाई फुले यांचं स्मारक साकारलं जाणार आहे.

ओबीसी एकीकरण समिती आणि ठाणेकर नागरिकांनी महात्मा फुले आणि सावित्रीमाईंचं स्मारक ठाण्यात उभारण्याची मागणी लावून धरली होती. ठाणे शहरामध्ये फुले दाम्पत्याचा एकही पुतळा नाही. कडबा गल्लीत असलेला जोतिराव फुले यांचा पुतळा खासगी संस्थेने उभारला आहे. तर, सध्या पुतळा असलेली इमारतच धोकादायक झाल्याने हा पुतळा बाजूला ठेवण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर काही दिवसांपूर्वी ठाण्यातील ओबीसी समाजाने एक बैठक आयोजित करुन फुले दाम्पत्याचे स्मारक उभारण्यासंदर्भात प्रस्ताव दाखल केला होता. या बैठकीसाठी नगरसेवक दिलीप बारटक्के, प्रफुल वाघोले, सचिन शिंदे, राहुल पिंगळे, राज राजापूरकर, सचिन केदारी आदींनी पुढाकार घेतला होता.

या बैठकीनंतर गठीत केलेल्या ओबीसी एकीकरण समितीच्या माध्यमातून फुले दाम्पत्याचे स्मारक उभारण्याची लेखी मागणी ठाणे राज्याचे नगरविकास तथा जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे, गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड, आमदार संजय केळकर, निरंजन डावखरे तसेच ठाणे पालिकेकडे केली होती. त्याशिवाय, अनेक आंबेडकरी संघटना, विविध संस्था आणि नागरिकांनी या मागणीसाठी निवेदने दिली होती. त्यामुळे ठाणे महापालिका सभागृह नेते अशोक वैती यांनी हा विषय पटलावर आणण्याचे ठरवले. त्यानंतर वैती यांनी स्मारकासाठी ठाणे पालिकेच्या महासभेत प्रस्तावही सादर केला आहे. सोमवारी हा प्रस्ताव मंजूर झाल्यानंतर खर्चाची तरतूद आणि जागानिश्चिती करण्यात येणार आहे. दरम्यान, अशोक वैती यांनी तातडीने हा विषय पटलावर आणल्याबद्दल अनेकांनी वैती यांचे कौतूक केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *