नाकर्तेपणा झाकण्यासाठी आ.लक्ष्मण पवारांचा खटाटोप

आ.पवारांच्या उपोषणबाजीला राष्ट्रवादीकडून सडेतोड उत्तर

                   गेवराई, दि.१३ ( वार्ताहार )

दिल्लीपासून गल्लीपर्यंत सत्ता असतानाही आ.लक्ष्मण पवार यांना निराधारांचे प्रश्‍न सोडविता आले नाहीत. विधवा, अपंग आणि निराधारांना बोगस मंजुरीपत्र वाटप करून त्यांच्या तोंडाला पाणी पुसण्याचे काम भाजपच्या सत्तेत आ.पवार यांनी केले. त्यांचा खोटारडेपणा लक्षात आल्यानंतर गावागावातील बगलबच्चांना आणि दलालांना लोकांनी सोळो की पळो करून सोडले, स्वतःचा नाकर्तेपणा झाकण्यासाठी आ.पवार उपोषणाचा खटाटोप करत असल्याची टिका निराधार समितीचे अध्यक्ष राधेशाम येवले व राष्ट्रवादी काँग्रेसकडून करण्यात आली आहे. अशा उपोषणाच्या नौटंकीला निराधार भिक घालणार नसल्याचे त्यांनी सांगितले.

निवडणुकीच्या तोंडावर आ.लक्ष्मण पवार यांना निराधारांचा पुळका आलेला दिसतो, राज्यात आणि देशात भाजपची सत्ता असताना त्यांनी सुमारे ११ हजारा निराधारांना मंजुरीपत्राचे वाटप केले, मंजुरीपत्र दिल्यानंतर त्यांचे पगार चालू करण्याची जबाबदारी आ.लक्ष्मण पवार यांची होती. मात्र गोरगरीब विधवा, अपंग आणि निराधारांकडून दलाली आणि लाच घेवून दाखल केलेल्या खोट्या आणि बनावट कागदपत्रांमुळे प्रशासनाने त्या निराधारांचे अनुदान स्थगित केले. भाजपच्या सत्तेत माजी आ.अमरसिंह पंडित यांच्या साध्या पत्रावर ११ निराधारांचे पगार रद्द होत असतील तर त्याचवेळी आ.लक्ष्मण पवार यांनी हार पत्कारून घरी बसायला पाहिजे होते, त्यासाठी चार वर्षे वाट का पाहिली? असा सवाल करून आ.लक्ष्मण पवार स्वतःच्या नाकर्तेपणाचे खापर माजी आ.अमरसिंह पंडित यांच्यावर फोडत असल्याचे प्रतिपादन संजय गांधी निराधार समितीचे अध्यक्ष राधेशाम येवले, ज्ञानेश्‍वर नवले व दिपक आतकरे यांनी केले आहे.

गेवराई तालुक्यातील गावागावात भाजपच्या दलालांनी निराधारांची फसवणुक करून त्यांच्याकडून मंजुरीपत्रासाठी पैसे गोळा केले. पैसे दिलेल्यांना आमदारांच्या हस्ते तहसिल कार्यालयात समारंभपूर्वक मंजुरीपत्राचे वाटप झाले. मात्र प्रत्यक्षात पगार मिळाले नाहीत, निराधारांची फसवणुक झाल्याचे लक्षात आल्यानंतर या निराधारांनी भाजपच्या दलालांकडे पैशांची मागणी सुरु केली. या दलालांना गावात तोंड दाखविण्याची सोय राहिली नाही. याच्यावर पांघरून घालण्यासाठी भाजपच्यावतीने आ.लक्ष्मण पवार उपोषणाचा खटाटोप करत आहेत, त्यांना तालुक्यातील निराधार जनता कधीही माफ करणार नाही. याप्रकरणी झालेली चौकशी आणि तत्कालीन चौकशी अधिकार्याने दिलेला अहवाल आमदारांना माहित असताना ते पुन्हा अर्जबाजी करून वेळ मारून नेत आहेत. राजकारणाचा दर्जा खालावला असून निष्क्रिय आमदारांना गावागावात कागदाच्या चिटोर्या वाटण्याची दुर्दैवी वेळ आली असल्याचीही प्रसिध्दीपत्रकात म्हटले आहे. आ.लक्ष्मण पवारांच्या उपोषणबाजीला राष्ट्रवादी काँग्रेसकडून सडेतोड उत्तर देण्यात आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *