अकाली मृत्यूने धक्काच बसतो. असा अचानक झालेला मृत्यू , कुटुंब आप्तेष्ट, मित्र नातेवाईकांसाठी वेदनादायक असतो. सुखाचे चार घास खायचे दिवस यावेत आणि काळाने डाव साधावा, सगळेच कसे अनपेक्षित घडते. डोक सुन्न पडते. काळ प्रश्न विचारायची संधी देत नाही. एवढेच काय ते खरे आहे. काळा पुढे माणूस हतबल आहे. कारण, मृत्यू अटळ आहे. तुकाराम महाराजांनी मृत्यूला “मुक्तीद्वार” म्हटले असून,भगवान गौतम बुद्ध यांनी “जन्म दुःखाचे कारण” असल्याचे प्रतिपादन केले आहे.
पण…अल्पवयातला मृत्यू नाही म्हणल तरी चटका लावतोच. अशा दुखद प्रसंगाने माणसे कोलमडून पडतात.
अंकुश मनोहरराव सुतार,वय वर्ष 40 , रा. गेवराई जि.बीड (मराठवाडा) यांची एक्झिट अशीच चटका लावून गेली आहे. आमचं चांगल बाॅन्डिग होत. एक मित्र म्हणून आमचा संवाद व्हायचा. त्या दिवशी म्हणजे, 9 नोव्हेंबर 2021 रोजी, सायंकाळी सात वाजता त्यांनीच फोन करून आजाराची माहिती देऊन, कुठे उपचार घेऊ , अशी विचारणा केली. मी त्यांना म्हणालो, काय होत नाही त्याला. लगेच या, गेवराईला. आधार मध्ये उपचार घेता येतील. तासाभरात चार पाच वेळा फोनवर बोलणे झाले. आधार रुग्णालयाचे संचालक डॉ. मोटे यांना परिस्थिती सांगितली. त्यांनी पेशंटला घेऊन या म्हणून सांगितले होते. मात्र, अंकुशराव यांचा फोन आला नाही. त्यांना पून्हा फोन करून विचारले. बीडला खाजगी रुग्णालयात उपचार घेत असल्याचे त्यांनी सांगितले. त्यानंतर बोलणे झाले नाही. दुर्दैवाने, दहा दिवसानंतर त्यांच्या मृत्यूची बातमी आली. विश्वास बसत नव्हता. या घटनेने अनेकांना खूप वेदना झाल्या. त्यांनी एवढ्या लवकर हार मानली. मित्रांना दुख देऊन गेले.
स्व. मनोहरराव सुतार यांचे ते चिरंजीव होत. ते तहसील कार्यालयात कार्यरत होते. जय बाबा नावाने परिचित होते. सौजन्यशील व्यक्तिमत्त्व होत. तलवडा ता. गेवराई येथे बदली झाल्यावर हे कुटुंब स्थलांतरित झाले. फार पगार नव्हता. आधीच गरीब परिस्थिती होती. मुलांनी मोलमजुरी तर आईने काबाडकष्ट करून घर प्रपंच चालवला. प्राथमिक शिक्षणाच्या वयात अंकुश यांनी तलवडा परीसरात रस्त्याची कामे केली होती. अंगावर कपडे घालायची पंचायत असायची. एकच ड्रेस, त्याला ही ठिगळं पडलेली. प्रतिकूल परिस्थितीत जुळवून घेत, अंकुश यांनी वाटा शोधल्या. आहे त्यात समाधान व्यक्त करून ऋणानुबंध वाढविणारे, माणुसकीला, गरीबाला जपणारे अंकुशराव अल्पावधीत चांगल्या पदावर आले. त्यांच्या वडिलांची पुण्याई त्यांच्या कामाला आली.
महसूल प्रशासनात चांगल्या पदावर कार्यरत झाले. त्यांचे सुंदर हस्ताक्षर होते. कामाशी प्रमाणीक राहून त्यांनी महसूल प्रशासनात स्वतःची इमेज उभी केली. एखादी फाईल त्यांनी “सादर” केली की, अधिकारी सहीच करायचे. अल्पावधीत लोकप्रिय झाले. तहसील कार्यालयाचे ते आवडते कर्मचारी होते.
ग्रामीण भागातून येणाऱ्या प्रत्येक माणसाला त्यांनी वेळ दिला. त्यांची कामे केली. हसून बोलणे. गालावर पडणारी खळी अन हलका फुलका विनोद, हजरजबाबी लोकांना भावली. बहुजन समाजातील असंख्य मित्र त्यांनी मिळविले होते. तहसील कार्यालयात अकृषी, दंडविभाग, संजय गांधी निराधार योजना, गोदामपाल म्हणून काम केले. जिल्हा प्रशासन देईल ती जबाबदारी त्यांनी उत्कृष्टरीत्या पार पाडली होती. रस्त्याच्या कामावर आयुष्य वेचलेल्या या भल्या माणसाने प्रतिकूल परिस्थितीशी जुळवून घेत, पाऊलवाट शोधली. ते खडतर दिवस ही गेले. सुगीचे दिवस आले. चार घास खायची वेळ आली. परंतू , त्यांनी अर्ध्यावर डाव सोडला.
पत्नी, दोन लहान मुल, आई, भाऊ, बहीण, नातेवाईक, आप्तेष्टांच्या गोतावळ्यात सुखाचा दिवस जात होता. पुरेसा आनंद घ्यायच्या आधीच….ते शेवटच्या प्रवासाला निघून गेले. फुलासारख्या दोन गोंडस मुलांचे छत्र काळाने हिरावून नेले आहे. त्यांच्या मृत्यूनंतर, असंख्य फोन आले. काहींनी भेट घेऊन विचारणा केली. खूप वाईट झाले हो..! अशा असंख्य प्रतिक्रिया दिल्या. लहान भावासारखा अंकुश मनोहरराव सुतार प्रवासाला निघून गेले आहेत. त्यांची स्मृती आयुष्यभर राहील. एका कवीने शब्दबद्ध केलय, जिंदगी के सफर मे गुजर जाते है, जो मकाम. वो…फिर नही आते..वो नही आते..! भावपूर्ण श्रद्धांजली…!
तुळजाभवानी इंग्लिश स्कूलचे शैक्षणिक कार्य कौतुकास्पद- आ.विजयसिंह पंडित तुळजाभवानी इंग्लिश स्कूलचे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न गेवराई दि 24 (वार्ताहर) तुळजाभवानी...
परमेश्ववर सातपुते यांच्यावर पक्षाकडून मोठी कार्ययाई बीड दि15 ( वार्ताहार ) अखेर जिल्हाप्रमुख परमेश्वर सातपुते यांची पक्षातून हाकालपट्टी करण्यात आलेले...
सामान्य जनतेत काम करणाऱ्यांना पक्ष संघटनेत प्राधान्य देवू - अमरसिंह पंडित जिल्हाध्यक्ष राजेश्वर चव्हाण यांच्या उपस्थितीत गेवराईत सदस्य नोंदणीचा शुभारंभ...