डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचे विचार हेच संपूर्ण भारतीय साहित्याचे प्रेरणास्थान –  डॉ. सुखदेव शिरसा

मुबंई  दि  9 (  वार्ताहार )   डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे 65 वे महापरिनिर्वाण दिनाचे औचित्य साधत येथे प्रगतिशील लेखक संघाचे सरचिटणीस सुखदेव सिंग शिरसा यांनी अभिवादन करण्यासाठी चैत्यभूमीवर पोहोचले होते. डॉ.बाबासाहेब आंबेडकर हे असे एक व्यक्तिमत्त्व होते, ज्यांच्या तत्वज्ञानाने येथील करोडो लोकांना मुक्तीचा मार्ग दाखवला आणि जातिअंताचा प्रश्न भारतीय राजकारणाच्या ऐरणीवर आला. जो प्रगतीशील असतो तो जात्यंध धर्मांध कधीही असू शकत नाही. सेक्युलर आणि प्रगतिशील असल्याशिवाय तुम्हाला लेखक होता येत नाही. ही भूमिका प्रगतिशील लेखक संघाची असल्यामुळे डॉ.बाबासाहेब आंबेडकर हे आमचे प्रेरणास्थान आहे. अशी भावना मनात घेऊन प्रगतिशील लेखक संघाचे सरचिटणीस मुंबई येथे अभिवादनासाठी आले होते.

        देशात ज्या वेळेस दुहीचे वातावरण आहे त्या वेळेस आंबेडकरांचे विचार हेच मूलगामी आणि क्रांतिकारक असे आहेत. ज्या वेळेस संविधानाच्या मूलभूत तत्त्वांना मूठमाती देण्यासाठी प्रयत्न उजव्या शक्तींच्या द्वारे चाललेले आहेत, त्यावेळेस आपण डॉ.बाबासाहेबांच्या विचारांवर अधिकाधिक ठाम राहून विवेकाने सार्वजनिक जीवनात जगले पाहिजे. आणि तशी भूमिका आपल्या साहित्यातून व्यक्त केली पाहिजे. तोच निर्धार व्यक्त करण्याचा दिवस म्हणजे महापरिनिर्वाण दिवस असतो.अशी माझी आणि माझ्या संस्थेची धारणा आहे. यावेळी हजारोंचा जनसमुदाय दादर येथील चैत्यभूमी वर जमला होता. तेथील काही लोकांसोबत आपले विचार व्यक्त करण्यासाठी प्रथम प्राधान्य डॉ. शिरसा यांनी दिले.

       रस्त्यावरून जाणाऱ्या लोकांना त्यांनी शेतकरी आंदोलनाचे आणि डॉ. बाबासाहेबांच्या विचारांचे महत्त्व विषद केले .लोकांशी प्रत्यक्ष रस्त्यावर संवाद साधला .त्यावेळी उत्स्फूर्तपणे अनेक भीमसैनिक त्यांच्या भोवती गोळा होऊन त्यांची भूमिका समजावून घेत होते. लोकांचा उत्साह आणि चैतन्य पाहून शेतकरी आंदोलनातील चैतन्य आणि उत्साह यांची तुलना करण्याचा मोह अनावर होतो,अशा भावना डॉ. शिरसा यांनी व्यक्त केल्या. कुणीही बोलवत नसताना आणि कुठलेही आयोजन नसताना स्वयंप्रेरणेने दरवर्षी सालोसाल चैत्यभूमीवर उसळणारा लाखो भीमसैनिकांचा जमाव पाहून कोणालाही आश्चर्य वाटेल असे मत त्यांनी व्यक्त केले .

        येथे दरवर्षी लागणारे हजारो पुस्तकांचे स्टॉल्स आणि त्या माध्यमातून होणारा करोडो रुपयांची होणारी पुस्तक खरेदी – विक्री हे जगातील एक आश्चर्य आहे. भिमसैनिकांनी दिलेली ही बौद्धिक मानवंदना भारताच्या लोकशाहीला बळकट करणारी आहे असा विश्‍वास डॉ. शिरसा यांनी व्यक्त केला. त्याच बरोबर येथील चैत्यभूमी स्मारक समितीचे अध्यक्ष डॉ.प्रदीप आगलावे यांच्याशी महापरिनिर्वाण दिनाच्या संयोजना बाबत डॉ. शिरसा यांनी बातचीत करून अधिकाधिक माहिती जाणून घेतली.

     त्याचप्रमाणे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू असणारे आनंदराज आंबेडकर आणि भिमराव आंबेडकर या दोघांशी संवाद साधला. प्रगतिशील लेखक संघाचे कार्य, त्याचा इतिहास आणि जातीअंताच्या प्रश्नावर आम्ही घेत असलेली भूमिका, याबाबत विविध स्वरूपाचे राष्ट्रीय स्तरावर करण्यात येणारे उपक्रम, यांची माहिती डॉक्टर शिरसा यांनी या ठिकाणी दिली. त्याचप्रमाणे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू भीमराव आंबेडकर यांनी शेतकरी आंदोलनाच्या बाबत अनेक उत्सुकता पूर्ण प्रश्न विचारून प्रगतिशील लेखक संघाच्या संघटनात्मक स्वरूपाविषयी चर्चा केली. आणि डॉ.शिरसा हे चंदिगड होऊन मानवंदना देण्यासाठी आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यासाठी आल्याचे पाहून अत्यंत आनंद व्यक्त केला. या भेटीच्या प्रसंगी प्रगतिशील लेखक संघाचे राज्य सरचिटणीस राकेश वानखेडे तसेच प्रगतिशील लेखक संघ शाखा नाशिकचे जिल्हाध्यक्ष प्रमोद आहिरे, सरचिटणीस प्रल्हाद पवार ,त्याचबरोबर मुंबई प्रगतिशील लेखक संघाचे कॉम्रेड सुबोध मोरे, डॉ.श्रीधर पवार, पत्रकार दीपक पवार त्याच प्रमाणे प्रगतिशील लेखक संघाचे अन्य पदाधिकारी देखील उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *