
आता खते आणखी स्वस्त होणार; अनुदान वाढवण्याचा सरकारचा विचार
शेतकऱ्यांसाठी दिलासादायक बातमी आहे. भविष्यात खताच्या किमती कमी होऊ शकतात. सरकार खताच्या अनुदानात 62 टक्क्यांपर्यंत वाढ करण्याच्या विचारात आहे. ‘क्रिसिल’ने केलेल्या दाव्यानुसार नैसर्गीक गॅस आणि इतर कच्च्या मालाच्या किमतीमध्ये वाढ झाल्याने खताचे दर वाढले आहेत. त्यामुळे खताचे दर कमी करण्यासाठी केंद्राकडून खतावर देण्यात येणारे अनुदान वाढू शकते
नवी दिल्ली : दि 8 ( वार्ताहार ) शेतकऱ्यांसाठी दिलासादायक बातमी आहे. भविष्यात खताच्या किमती कमी होऊ शकतात. सरकार खताच्या अनुदानात 62 टक्क्यांपर्यंत वाढ करण्याच्या विचारात आहे. ‘क्रिसिल’ने केलेल्या दाव्यानुसार नैसर्गीक गॅस आणि इतर कच्च्या मालाच्या किमतीमध्ये वाढ झाल्याने खताचे दर वाढले आहेत. त्यामुळे खताचे दर कमी करण्यासाठी केंद्राकडून खतावर देण्यात येणारे अनुदान वाढू शकते असा अंदाज वर्तवण्यात येत आहे. चालू आर्थिक वर्षात केंद्राकडून खतांसाठी 79530 कोटी रुपयांचे अनुदान देण्यात आले होते. आता त्यामध्ये वाढ करून ते 1 लाख 30 हजार कोटी रुपये होण्याची शक्यता आहे. अनुदानामध्ये वाढ झाल्यास खताचे दर आणखी स्वस्त होऊ शकतात.
21328 कोटी रुपयांच्या अतिरिक्त अनुदानाची घोषणा
कच्च्या मालाच्या किमतीमध्ये भरमसाठ वाढ झाली आहे. त्यामुळे खताचे दर देखील मोठ्याप्रमाणात वाढले आहेत. सरकारकडून जाहीर करण्यात येणाऱ्या अनुदानामुळे खताचे दर कमी होतात. अनुदानामध्ये आणखी वाढ केल्यास खताचे दर सध्या असलेल्या किमतीपेक्षा आणखी दहा टक्के कमी होण्याचा अंदाज आहे. खताचे दर वाढल्यास त्याचा मोठा फटका हा शेतकऱ्यांना बसतो. त्यामुळे खताचे दर नियंत्रणात कसे ठेवता येतील यावर सरकारचे विशेष लक्ष असते. चालू आर्थिक वर्षात सरकारकडून खतावर आतापर्यंत 21328 कोटी रुपयांच्या अतिरिक्त अनुदानाची घोषणा करण्यात आली आहे.
नैसर्गीक गॅसच्या किमतीमध्ये 50 टक्के वाढ
नैसर्गीक गॅसच्या किमतीत चालू आर्थिक वर्षामध्ये तब्बल 50 टक्क्यांपर्यंत वाढ झाली आहे. खताच्या निर्मितीमध्ये नैसर्गिक गॅसचा सत्तर ते पंचाहत्तर टक्के वाटा असतो. त्यामुळे खताच्या किमती देखील वाढल्या आहेत. नैसर्गीक गॅससोबतच खतांच्या निर्मितीसाठी लागणारा कच्चामाल फॉस्फरस आणि अमोनियाचे दर देखील चाळीस ते पन्नास टक्क्यांनी वाढले आहेत. सरकारकडून खतांसाठी देण्यात येणारे हे अनुदान नॉन-यूरिया खतांसाठी देण्यात येते.