जिचं मुंडकं उडवून जीव घेतला, ती बहीण दोन महिन्यांची गरोदर, वैजापूर हत्या प्रकरणात दोन नवे खुलासे
19 वर्षीय तरुणीने ज्युनिअर कॉलेजपासून मैत्री असलेल्या तरुणाशी विवाह केला होता. हा आंतरजातीय विवाह नव्हता, मात्र पळून जाऊन कुटुंबाची प्रतिष्ठा धुळीस मिळवल्याच्या भावनेतून या दोघांनी ही हत्या केल्याची माहिती आहे.
औरंगाबाद :दि 6 ( वार्ताहार )
पळून जाऊन प्रेम विवाह केल्याने बहिणीचं मुंडकं उडवल्याच्या प्रकरणात मोठी माहिती समोर आली आहे. बहिणीची हत्या करणारा भाऊ अल्पवयीन नसून 18 वर्षे 6 महिन्याचा सज्ञान आरोपी असल्याचं स्पष्ट झालं आहे. तर मयत तरुणी दोन महिन्यांची गरोदर असल्याची माहितीही सूत्रांनी दिली आहे. औरंगाबाद जिल्ह्यातील वैजापूर तालुक्यातील गोळेगावात दोन दिवसांपूर्वी हा प्रकार घडला.
आई आणि भावाने कीर्ती थोरे हिची घरी जाऊन हत्या केली होती. कीर्तीचा सख्खा भाऊ संजय मोटे यांने कोयत्याने वार करत कीर्तीचे मुंडके छाटल्याचा थरारक प्रकार समोर आला होता.
काय आहे प्रकरण?
औरंगाबाद जिल्ह्यातील गोळेगावात राहणाऱ्या 19 वर्षीय कीर्ती थोरेने पळून जाऊन लव्ह मॅरेज केल्यामुळे भावाने तिची कोयत्याने सपासप वार करुन हत्या केली. ज्या ताईने हातावर राखी बांधली, तिच्याविषयी भावाच्या मनात इतका राग भिनला होता, की त्याने बहिणीचे शिर धडावेगळे केले. हत्या केल्यानंतर आरोपी भावाने वैजापूर पोलीस ठाण्यात आत्मसमर्पण केले.
ज्युनिअर कॉलेजपासून मैत्री
लेकीने पळून जाऊन लग्न केल्यानंतर आईने तिच्याशी संबंध तोडले होते. 19 वर्षीय तरुणीने ज्युनिअर कॉलेजपासून मैत्री असलेल्या तरुणाशी विवाह केला होता. हा आंतरजातीय विवाह नव्हता, मात्र पळून जाऊन कुटुंबाची प्रतिष्ठा धुळीस मिळवल्याच्या भावनेतून या दोघांनी ही हत्या केल्याची माहिती आहे.
बहिणीच्या घरी जाऊन डोकं उडवलं
ताईला भेटण्याच्या निमित्ताने भाऊ आणि आई रविवारी तिच्या घरी गेले होते. त्यावेळी बहीण चहा बनवत असताना स्वयंपाकखोलीत जाऊन कोयत्याने सपासप वार करत भावाने तिची निर्घृण हत्या केली. बहिणीचं डोकं शरीरापासून वेगळं होईपर्यंत तो वार करत राहिला. कळस म्हणजे त्यानंतर छाटलेल्या मुंडक्यासोबत मायलेकाने सेल्फीही काढला.
मराठी चित्रपटावरुन प्रेरणा
हत्या केल्यानंतर आरोपी भावाने वैजापूर पोलीस ठाण्यात आत्मसमर्पण केले. अल्पवयीन असल्याने पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले, तर आईला अटक केली आहे. ‘सैराट’ चित्रपटात ज्याप्रमाणे आर्चीची तिचा भाऊ प्रिन्स हत्या करतो, त्यावरुन प्रेरणा घेत भावाने ही हत्या केल्याचा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे.