कापुस शेतीला बागायती शेतीसाठी दिली जाणारी नुकसान भरपाई द्या
आ. विजयसिंह पंडित यांची कृषी राज्यमंत्र्यांकडे मागणी
गेवराई, दि. ०८ ( वार्ताहार ) – कापुस उत्पादक शेतकर्यांना जिरायती क्षेत्राच्या वर्गवारी नुसार अतिवृष्टीची नुकसान भरपाई दिली जात असल्या प्रकरणी गेवराई विधानसभा मतदार संघाचे आ. विजयसिंह पंडित यांनी आज लेखी निवेदन देवुन कापुस शेतीला बागायती शेतीसाठी दिली जाणारी नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी राज्याचे कृषी राज्यमंत्री ना. आशिष जयस्वाल यांच्याकडे केली. बागायती वर्गवारी साठी आवश्यक असलेले सर्व निकष कापुस शेतीला लागु होत असल्यामुळे नुकसानग्रस्त कापुस उत्पादक शेतकर्यांना प्रति हेक्टरी २७ हजार ५०० रुपये प्रमाणे नुकसान भरपाईची रक्कम द्यावी अशी मागणी त्यांनी लेखी निवेदनाव्दारे केली आहे. या प्रकरणी आ. विजयसिंह पंडित यांनी राज्यमंत्री ना. आशिष जयस्वाल यांना लेखी निवेदन दिले आहे. या मागणीसाठी शेवट पर्यंत पाठपुरावा करणार असल्याचे आ. पंडित यांनी सांगितले.
मराठवाड्यात विशेषत: बीड जिल्ह्यात अतिवृष्टी व महापुर परिस्थितीमुळे शेतकर्यांचे सार्वाधिक नुकसान झाले आहे. बीड जिल्ह्यातही तुलनेने गेवराई विधानसभा मतदार संघात नुकासनीची दाहकता जास्त आहे. शासनाने ३१ हजार ६२८ कोटी रुपयांचे पॅकेज जाहीर केल्या बद्दल आ. विजयसिंह पंडित शासनानचे आभार मानले आहेत. मात्र प्रशासनाकडुन सुरु असलेल्या पंचनाम्याच्या अनुषंगाने त्यांनी तिव्र नाराजी व्यक्त केली आहे. गेवराई विधानसभा मतदार संघात खरीप हंगामात कापुस पिकाचे सार्वाधिक क्षेत्र आहे, बहुतांश बागायत शेत जमिनीमध्ये कपाशीचे पिक घेतले जाते. तरीही कापुस उत्पादक शेतकर्यांना जिरायती पिकांसाठी दिली जाणारी नुकसान भरपाई मिळणार असल्यामुळे आ. विजयसिंह पंडित यांनी या बाबत आक्षेप नोंदविला आहे.
या बाबत आ. विजयसिंह पंडित यांनी दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे की, गेवराई विधानसभा मतदार संघात सुमारे १ लाख ४० हजार हेक्टर क्षेत्रावर कपाशीची लागवड केली जाते. कापुस पिकासाठी विहीर, पाटपाणी, ठिबक सिंचन आदी माध्यमातुन पाणी दिले जाते. खत, बि-बियाणे, किटकनाशके आदींवर मोठा खर्च शेतकरी करतात. अलीकडच्या काळात अनेक शेतकरी कपाशीला पाणी देवुन फडतरीसह सुमारे आठ महिण्यांपेक्षा जास्त कालावधीसाठी हे पिक घेत असल्यामुळे एका वर्षी एकच पिक शेतकर्यांना घेता येते. त्यामुळे बागायती वर्गवारी मधील सर्व निकष कापुस पिकाला लागु होतात. महसुल विभागाच्या वर्गवारी नुसार शासकीय अभिलेख्यात ज्या शेती जमिनीची वर्गवारी बागायती क्षेत्र म्हणुन केली आहे त्या क्षेत्रावर प्रामुख्याने कपाशीची लागवड झालेली दिसुन येते. असे सर्व असतांना कापुस पिकासाठी नुकसान भरपाई देतांना जिरायती क्षेत्राचे निकष का ? असा सवालही आ. विजयसिंह पंडित यांनी उपस्थित करुन कापुस उत्पादक शेतकर्यांवर अन्याय करु नका असे शासनाला लेखी पत्राव्दारे कळविले आहे.
कृषी मंत्री ना. दत्तात्रय भरणे इतरत्र दौर्यावर असल्यामुळे त्यांनी बुधवार दि. ८ ऑक्टोबर रोजी कृषी विभागाचे राज्यमंत्री ना. आशिष जयस्वाल यांची भेट घेवुन त्यांना या बाबतची तपशिलवार माहिती दिली. यावेळी त्यांनी राज्यमंत्र्यांना लेखी निवेदन देवुन कापुस उत्पादक शेतकर्यांना बागायती शेतीसाठी दिली जाणारी नुकसान भरपाईची २७ हजार ५०० रुपये प्रति हेक्टर प्रमाणे नुकसान भरपाई देण्याची मागणी केली. या प्रकरणी नुकसानग्रस्त कापुस उत्पादक शेतकर्यांच्या हितासाठी शेवट पर्यंत प्रयत्न करणार असल्याचे आ. विजयसिंह पंडित यांनी शेवटी सांगितले आहे.