खोटे कागदपत्र दाखल करून भुखंड हडपण्याचा प्रयत्न; गुन्हा दाखल करण्याचे न्यायलयाचे आदेश
गेवराई दि 7 ( वार्ताहार ) – भाड्याने दिलेली जागा बळकावण्यासाठी गेवराई येथील अ.हन्नान मं.युसुफोद्दिन यांनी खोटा अर्ज गेवराई बाजार समितीकडे दाखल करून सदरील जागा हडपण्याचा प्रयत्न केला. मात्र हा बनाव मयताच्या मुलाच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी याबाबत न्यायालयात अर्ज दाखल केला होता. न्यायालयात साक्ष पुरावे समोर आल्यानंतर न्यायालयाने आरोपी विरोधात फसवणूकीचा गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले आहेत.
याबाबद सविस्तर माहिती अशी की,गेवराई येथील कृषी उत्पन्न बाजार समितीने शेख खुदस शेख इस्माईल (रा. मादळमोही) यांना एक भुखंड भाड्याने दिला होता. त्यांनी त्या जागेवर बरेच वर्षे व्यवसाय चालविला परंतु त्यांचे नातेवाईक असलेले अब्दुल हन्नान मोहंमद युसूफोद्दीन यांनी शेख खुद्दूस यांच्यानावाने स्वतः अर्ज लिहून व शेख खुदूस यांची स्वतः सही करून सदर भुखंड परत करण्याचा खोटा व बनावट अर्ज कृषी उत्पन्न बाजार समितीत दिला व त्याच दिवशी स्वतःला भुखंड मिळण्याच्या मागणीचा अर्ज सुध्दा दिला. त्यानंतर शेख खुदूस हे आजारी पडल्यानंतर मयत झाले. वडीलांच्या जागेचे काय झाले याचा शोध त्यांचा मुलगा शेख सिद्दीकी शेख खुदुस याने घेण्याचा प्रयत्न केला. त्याने खरेदी विक्री संघातून कागदपत्रे काढल्यानंतर आपल्या वडीलांच्या नावे खोट्या सहीचा अर्ज दिला असल्याचे आढळुन आल्याने त्यांनी फौजदारी न्यायालय गेवराई येथे विधिज्ञ.सुभाष निकम यांच्या मार्फत अब्दुल हन्नान युसूफोदीन यांच्या विरुद्ध न्यायलयात अर्ज दाखल केला न्यायालयाने या प्रकरणी तपास करून अहवाल सादर करण्याचा आदेश गेवराई पोलीस यांना दिले व झालेला साक्ष पुरावा, पोलीस ठाणे गेवराई यांनी दाखल केलेला अहवाल विधिज्ञ.सुभाष निकम यांचा युक्तीवाद ग्राह्य धरून प्रथम दर्शनी गुन्हा सिध्द झाला असल्याचे दिसुन आले. आरोपी हन्नान मोहंमद युसूफोदीन याच्या विरुध्द भादंवीच्या कलम ४२०, ४६५, ४६७,४६८ आणि ४७१ अन्वये केस दाखल करण्याचे आदेश दिले आहेत.