January 22, 2025

महाविकास आघाडी सत्तेवर आल्यास तीन लाखापर्यंतची कर्जमाफी करुन शेतकऱ्यांना कर्जमुक्त करु – आदित्य ठाकरे

बदामराव पंडित यांना प्रचंड मतांनी विजयी करण्याचे आदित्य ठाकरे याचं अवाहन

गेवराई दि 12 ( वार्ताहार ) शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे साहेब हे मुख्यमंत्री झाले तेव्हा आपण शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली. त्यानंतर आलेल्या मिंदे सरकारने शेतकऱ्यांसाठी काहीच केलं नाही. म्हणून आता महाविकास आघाडी व शिवसेनेची मशाल पेटवून महाराष्ट्रातील अंधार दूर करण्यासाठी महाविकास आघाडीच्या उमेदवारांना निवडून द्या तसेच राज्यात आमचं महाविकास आघाडीचे सरकार येणार असून या काळात शेतकऱ्यांसह सर्वसमावेशक पंचसूत्री नुसार काम करणार असून सत्तेवर आल्यावर सर्वात आधी शेतकऱ्यांचे कर्ज माफ करुन शेतकरी कर्जमुक्ती करणार असल्याचे प्रतिपादन युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी केले.

गेवराई विधानसभा मतदार संघाचे महाविकास आघाडी व शिवसेना (उबाठा) गटाचे उमेदवार बदामराव पंडित यांच्या प्रचारार्थ शिवसेनेचे युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या प्रचारसभेचे आयोजन करण्यात आले होते. या प्रसंगी ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर शिवसेना नेते लक्ष्मण वडले, माजी आ.सुनील धांडे, जिल्हाप्रमुख परमेश्वर सातपुते, गणेश वरेकर,जि प चे माजी अर्थ व बांधकाम सभापती युधाजित पंडित यांच्यासह आदींची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी पुढे बोलताना त्यांनी सांगितले की, आज या निवडणुकीत राज्यभरात भाजप जुमलेबाजी करतंय, राज्यभरात रोज कित्येक शेतकरी आत्महत्या करत आहेत अन हे खोके सरकार शेतमालाचे भाव कमी करून खताचे भाव वाढवत आहे. आज देशाचे कृषिमंत्री राज्यात कुठंतरी शेतकऱ्यांच्या बांधावर आलेले दिसले नाही. भाजप सरकारने तरुणांसाठी एकही नोकरी उपलब्ध करून दिली नाही. राज्यातील उद्योगधंदे त्यांनी गुजरातला हलवले, म्हणून भाजप अन मिंदे सरकार हे महाराष्ट्र द्वेषी आहेत. राज्यात अनेक प्रश्न असताना यांना फक्त सत्ता मिळाली पाहिजे यासाठी या तिघांमध्ये स्पर्धा चालू आहे. राज्यात नोकर भरती करत नाहीत. तरुणांच्या हाताला काम मिळत नाही. म्हणून कित्येक तरुण बेरोजगार होत आसताना या सरकारने त्यांच्या हाताला काम मिळावे म्हणून काहीच केले नाही. भाजपची लाडकी बहीण योजना फसवी, 2014 मध्ये 15 लाख देणार होते त्यांनी दहा वर्षानंतर पंधराशे रुपये दिले. म्हणून ही योजना फसवी आहे. म्हणून राज्यात महाविकास आघाडी सरकार सत्तेवर आल्यास लाडक्या बहिणीची तीन हजार रु देणार असल्याचे त्यांनी सांगितले.
एकनाथ शिंदे आणि भाजपने हा महाराष्ट्र कुठे नेवून ठेवलाय कळायला तयार नाही.कोविड काळात उद्धव ठाकरे साहेबांनी या राज्यातील जनतेची सेवा केलेली आहे. ती कुणीच विसरू शकत नाही. आज राज्यातील आरोग्य सेवा कोलमडलेली आहे. येणाऱ्या काळात जनतेच्या आरोग्यासाठी पंचवीस लाखांपर्यंत कॅशलेस सेवा उपलब्ध करून देणार आहे. म्हणून येणाऱ्या काळात आपले मुख्य ध्येय हेच असेल ते म्हणजे रोजगार निर्मिती. सत्तेवर आल्यास आपले सरकार पंचसूत्री नुसार काम करणार आहे. जे भाजप आपल्याला हिंदूत्वाबद्दल बोलत आहेत. आपल्या मुस्लीम बांधवांवर संशय निर्माण करत आहेत. परंतु जनता आता हुशार आहे जात पात विसरून एका दिलाने पुढे जात आहे. एकनाथ शिंदेंनी स्वतःला वाचवण्यासाठी भाजपची साथ देऊन आपला पक्ष चोरला, स्व.बाळासाहेब ठाकरे या आमच्या आजोबांचा फोटो चोरला असून आता महाराष्ट्रातील जनता या गद्दारांना घरी बसवल्याशिवाय राहणार नाही. म्हणून येणाऱ्या 20 तारखेला महाविकास आघाडी शिवसेना उबाठा गटाचे आपले उमेदवार बदामरावजी पंडित यांना विजयी करून आपली मशाल पेटून राज्यातील अंधार दूर करा असे आवाहन युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी केले. या सभेला गेवराई मतदार संघातून मोठ्या संख्येने मतदार बांधवांची उपस्थिती होती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *