जि.प./पं.स.निवडणुकीत राष्ट्रवादीचा झेंडा फडकणार – अमरसिंह पंडित
सात गावच्या सरपंचांसह शेकडो कार्यकर्त्यांचा राष्ट्रवादीमध्ये जाहिर प्रवे
गेवराई, दि.०२ (प्रतिनिधी) ः- सत्तेत असताना ज्यांना कामे करता आली नाहीत ते स्वतःची निष्क्रियता लपविण्यासाठी विरोधी पक्षात असल्याचे कारण पुढे करत आहेत. विरोधी पक्षातून गेवराईचे प्रतिनिधीत्व करताना ६५ गावांच्या रस्त्यांना भरघोस निधी मिळवून अनेक विकासाची कामे केली असे सांगून अमरसिंह पंडित यांनी विद्यमान आमदाराच्या निष्क्रियतेवर बोट ठेवले. जुन्या-नव्या कार्यकर्त्यांना विश्वासात घेवून तालुक्यात विकास कामे करणार, विकास कामांच्या जोरावर ही निवडणुक आपण जिंकणार असून जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत राष्ट्रवादीचाच झेंडा फडकणार असल्याचा विश्वास अमरसिंह पंडित यांनी व्यक्त केला. भव्य पक्षप्रवेश सोहळ्यात ते बोलत होते. यावेळी तालुक्यातील पाचेगाव, सिरसदेवीसह सात सरपंचांनी शेकडो कार्यकर्त्यांसह राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये प्रवेश केला.
गेवराई तालुक्यातील पाचेगाव व सिरसदेवी या जिल्हा परिषद गटाच्या ग्रामपंचायतीसह टाकळगाव, हिंगणगाव, भेंड, वसंतनगर तांडा आणि ढालेगाव येथील सरपंच व रामपुरी, तपेनिमगाव येथील भाजपा-शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी विजयसिंह पंडित यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये प्रवेश केला. यावेळी माजी आ.अमरसिंह पंडित यांनी त्यांचे स्वागत केले. सरपंच इमु पटेल, रविंद्र गाडे, संजय राठोड, अरुण तौर, त्रिंबक मदने, ज्ञानेश्वर खरात, योगेश गव्हाणे, नंदकुमार जंगले, उदयसिंह मस्के, शरद शिंदे यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांचा यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये प्रवेश झाला. राजकीयदृष्ट्या या पक्षप्रवेश सोहळ्याला भविष्यातील निवडणुकीच्या दृष्टीने दिशादर्शक मानले जात आहे. माजी जि.प. अध्यक्ष विजयसिंह पंडित आणि माजी आ.अमरसिंह पंडित यांनी आपल्या भाषणात विरोधकांचा खरपूस समाचार घेतला.
यावेळी कार्यक्रमाला जयभवानीचे उपाध्यक्ष जगन्नाथ शिंदे, ज्येष्ठ संचालक पाटीलबा मस्के, तालुकाध्यक्ष भाऊसाहेब नाटकर, सभापती जगनपाटील काळे, सभापती बाबुराव जाधव, बाळासाहेब मस्के, उपसभापती शाम मुळे, माजी सभापती अप्पासाहेब गव्हाणे, कुमारराव ढाकणे, जि.प.सदस्य फुलचंद बोरकर, शेख हन्नानसेठ, माऊली आबुज, प्रताप पंडित, श्रीराम आरगडे, शेख मिनहाज, गणेश बांगर, राष्ट्रवादी युवकचे तालुकाध्यक्ष ऋषिकेश बेदरे यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते व्यासपीठावर उपस्थित होतेे.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक भाऊसाहेब नाटकर यांनी केले तर आनंद सुतार, रविंद्र गाडे, गजानन काळे, सभापती बाळासाहेब मस्के यांनीही याप्रसंगी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाला विविध ग्रामपंचायतचे सरपंच, सदस्य, सेवा सोसायटीचे चेअरमन यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी बोलताना अमरसिंह पंडित म्हणाले की, टाकळगाव बॅरेज मंजुर झाला असला तरी सिंदफणा नदीपात्रात बारमाही पाणी राहण्यासाठी निमगाव मायंबापासून नाथापूर पर्यंत सर्व को.प.बंधार्याचे बॅरेजमध्ये रुपांतर करण्यासाठी पाठपुरावा सुरु आहे. गावातील लोकांना विश्वासात घेवून विकासाची कामे करावयाची आहेत. आपण कधीही सुडाचे राजकारण केले नाही. राजकारणात कार्यकर्त्यांना कधीही वार्यावर सोडले नाही, त्यामुळे आज प्रवेश केलेल्या सर्व कार्यकर्त्यांना भविष्यात सन्मानाची वागणुक दिली जाईल असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला. जि.प.माजी अध्यक्ष विजयसिंह पंडित यांनी भाजपा आमदारावर टिका करताना विद्यमान आमदारांच्या निष्क्रियतेला कंटाळून भाजपाच्या सर्व ग्रामपंचायत राष्ट्रवादीमय होत आहेत. पंचायत समितीमध्ये सत्ता असतानाही दलालांच्या विळख्यातील भ्रष्ट कारभारामुळे कार्यकर्ते भाजपाला सोडत आहेत. शिवछत्र परिवाराने लोककल्याणाची कामे केली, भविष्यातही अशीच कामे करू, विद्यमान आमदारांना भोजगाव येथील पुलाचे काम करता आले नाही. केवळ त्यांनी राजीनामा देवू नये म्हणून या पुलाच्या कामासाठी एक कोटी पंधरा लक्ष रुपयांचा निधी मंजुर केला असल्याचे प्रतिपादन त्यांनी केले. आजचा प्रवेश सोहळा केवळ ट्रेलर असून पिक्चर अभी बाकी है असे सांगताच उपस्थितांनी जोरदार घोषणा आणि टाळ्यांच्या गजरात त्यांना प्रतिसाद दिला.
आजच्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या पक्षप्रवेश सोहळ्यामुळे गेवराई तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अधिक मजबुत झाली आहे.