Happy Birthday| वेटर ते फोटोग्राफर, 42व्या वर्षी बॉलिवूडमध्ये पदार्पण करत बोमन इराणी बनले सुपरस्टार!
कधी ‘व्हायरस’ तर, कधी ‘डॉक्टर अस्थाना’ म्हणून ओळखले जाणारे अभिनेता बोमन इराणी यांचा जन्म 2 डिसेंबर 1959 रोजी झाला. बोमन हे आजच्या काळातील चित्रपट सृष्टीतील प्रसिद्ध आणि मोठे नाव आहे.
मुंबई :दि 2 ( वार्ताहार ) कधी ‘व्हायरस’ तर, कधी ‘डॉक्टर अस्थाना’ म्हणून ओळखले जाणारे अभिनेता बोमन इराणी यांचा जन्म 2 डिसेंबर 1959 रोजी झाला. बोमन हे आजच्या काळातील चित्रपट सृष्टीतील प्रसिद्ध आणि मोठे नाव आहे. पण, बोमन यांनी वयाच्या अशा टप्प्यात बॉलिवूडमध्ये पाऊल ठेवले, जेव्हा इतर कलाकारांनी त्यांची निम्म्याहून अधिक करिअर पूर्ण केली होती. वयाच्या या टप्प्यावर पदार्पण करूनही बोमन यांची गणना आज यशस्वी अभिनेता म्हणून केली जाते. बोमन इराणी यांच्या वाढदिवशी आम्ही तुम्हाला त्याच्याशी संबंधित काही रंजक गोष्टी सांगणार आहोत…
बोमन इराणी यांनी वयाच्या 42व्या वर्षी मनोरंजन विश्वात पदार्पण केले. बोमन यांना फोटोग्राफीची खूप आवड आहे, हे फार कमी लोकांना माहीत आहे. जेव्हा ते 12वीत शिकत होते, तेव्हा ते शाळेत क्रिकेट सामन्यांचे फोटो काढत असत. त्यासाठी त्यांना काही पैसे देखील मिळायचे. बोमन यांनी पुण्यात पहिल्यांदाच व्यावसायिकरित्या बाईक रेसमध्ये फोटोग्राफी केली. यानंतर त्यांना मुंबईत बॉक्सिंग विश्वचषक कव्हर करण्याची संधी मिळाली.
‘या’ व्यक्तीने दिला थिएटरमध्ये सामील होण्याचा सल्ला!
बोमन इराणी यांनी मुंबईच्या मिठीबाई कॉलेजमधून ग्रॅज्युएशन पूर्ण केलं. शिक्षणानंतर त्यांनी मुंबईतील हॉटेल ताजमध्ये 2 वर्षे काम केलं. ते वेटर आणि रूम सर्व्हिस स्टाफमध्ये होते. काही कारणांमुळे बोमन यांना ही नोकरी सोडावी लागली. त्यानंतर ते त्यांचा कौटुंबिक व्यवसाय सांभाळू लागले. बोमन त्यांच्या आईसोबत त्यांच्या बेकरी दुकानात 14 वर्षे काम करत होते. एके दिवशी ते कोरियोग्राफर श्यामक डावरला भेटले आणि इथूनच त्यांचे नशीब बदलले, असे म्हणता येईल.
या भेटीत श्यामक डावर यांनी बोमन इराणी यांना थिएटरमध्ये काम करण्याचा सल्ला दिला. बोमन यांना बहुतेक विनोदी भूमिकाच मिळाल्या. बोमन स्वतः पारशी आहेत आणि त्यांनी साकारलेली बहुतांश पात्रेही पारशी होती. हळूहळू त्यांनी नाट्यविश्वात एक वेगळी ओळख निर्माण केली. काही वर्षांच्या संघर्षानंतर त्यांना 2001मध्ये ‘एव्हरीबडी सेज आय एम फाइन’ आणि ‘लेट्स टॉक’ हे दोन इंग्रजी चित्रपट मिळाले.
‘मुन्नाभाई’ने मिळवून दिली ओळख!
2003 मध्ये ‘मुन्नाभाई एमबीबीएस’ या चित्रपटातून बोमन इराणी यांना खरी ओळख मिळाली. बोमन इराणी यांनी आतापर्यंत 50 हून अधिक चित्रपट केले आहेत. ‘फेरारी की सवारी’, ‘हनीमून ट्रॅव्हल्स प्रायव्हेट लिमिटेड’, ‘दोस्ताना’, ‘युवराज’, ‘3 इडियट्स’, ‘तीन पत्ती’, ‘हम तुम और घोस्ट’, ‘हाऊसफुल’, ‘हाउसफुल 2’ आणि ‘संजू’ यांसारख्या चित्रपटांमध्ये बोमन इराणी वेगवेगळ्या छटांमध्ये दिसले आहेत.