गेवराई दि 15 ( वार्ताहार ) – सासरच्या जाचास कंटाळून एका विवाहित महिलेने आत्महत्या केल्याची घटना काल रात्री जोडवाडी येथे घडली. या घटनेनंतर मयत महिलेच्या सासूचाही मृत्यु झाला. या दोन्ही घटनेने गेवराई तालुक्यामध्ये एकच खळबळ उडाली. चकलांबा पोलीसांनी घटनास्थळी धाव घेवून घटनेचा पंचनामा केला. मयत सासूचा मृतदेह शवविच्छेदनासाठी मादळमोही येथील प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये आणण्यात आला होता या प्रकरणी दुपारपर्यंत गुन्हा दाखल झालेला नव्हता.
प्रतिक्षा संदिप कोकाटे (वय 24 ) या महिलेचे गेल्या काही वर्षापुर्वी लग्न झाले होते. लग्नानंतर काही महिन्याने सासरच्या मंडळीकडून तिचा छळ होवू लागला. काल तिला सासरच्यांनी मारहाण केली असल्याचे सांगण्यात येते. या मारहणीमुळे सदरील महिलेने आत्महत्या केली. या महिलेचा मृतदेह शवविच्छेदनासाठी जिल्हा रूग्णालयामध्ये आणण्यात आला होता. या घटनेनंतर प्रतिक्षा कोकाटेंची सासू कौंताबाई कोकाटे हिचाही मृत्यु झाला. या मृत्यु बाबत वेगवेगळे तर्क विर्तक लावले जात असले तरी हदयविकाराच्या झटक्याने कौंताबाई यांचा मृत्यु झाला असावा असा संशय पोलीस प्रशासनाने व्यक्त केला. चकलांबा पोलिसांनी घटनास्थळी जावून पचंनामा केला व कौताबाईचा मृतदेह शवविच्छेदनासाठी मादळमोहिच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात आणण्यात आला होता. प्रतिक्षा कोकाटे हिच्या आत्महत्या प्रकरणी दुपारपर्यंत गुन्हा दाखल झाला नव्हता. सुनेच्या आत्महत्या नंतर सासूचा मृत्यु झाल्याने गेवराई तालुक्यात एकच खळबळ उडाली. प्रतिक्षा हिला उपचारार्थ बीडच्या जिल्हा रूग्णालयामध्ये आणण्यात आले होते. मात्र तिचा मृत्यु झाल्यानंतर सासरा व नवरा फरार झाला असल्याचे सांगण्यात येत आहे.