April 29, 2025

आदिवासी व्यवहार मंत्रालय,भारत सरकार संचलित एकलव्य आदर्श निवासी विद्यालयाच्या प्रशिक्षित पदवीधर शिक्षकपदी स्वप्निल सुरवसे यांची निवड

गेवराई दि 11( वार्ताहार ) – आदिवासी व्यवहार मंत्रालय, भारत सरकार संचलित एकलव्य आदर्श निवासी विद्यालयाच्या प्रशिक्षित पदवीधर शिक्षकपदी (टीजीटी) स्वप्निल सेनापती सुरवसे यांची निवड झाली आहे.भारत सरकार च्या आदिवासी व्यवहार मंत्रालयामार्फत चालवण्यात येत असलेल्या एकलव्य आदर्श निवासी विद्यालयाच्या 2023 या वर्षी शिक्षक व शिक्षकेतर पदांच्या भरती साठी जाहिरात प्रसिद्ध कऱण्यात आली होती. कठीण काठिण्य पातळी समजल्या गेलेल्या ट्रेन्ड ग्रॅच्युएट टीचर सामाजिक अध्ययन – गट ब – अराजपत्रित (पे लेवल 7 – रु.44900 – 142400/-) या पदासाठीची परीक्षा ऑफलाईन पद्धतीमध्ये झाली.या परीक्षेमध्ये मराठवाड्यातील अग्रगण्य समजल्या जाणाऱ्या गेवराई बाजार समितीतील पर्यवेक्षक पदावर कार्यरत असणारे स्वप्निल सेनापती सुरवसे यांची निवड झाली आहे.

     आदिवासी विद्यार्थ्यांना दुर्गम आदिवासी भागात दर्जेदार शिक्षण मिळावे यासाठी राज्य घटनेच्या अनुच्छेद 275(1) अंतर्गत अनुदानासह एकलव्य विद्यालयाची स्थापना राज्य व केंद्र शासित प्रदेशामध्ये भारत सरकारच्या द्वारा कऱण्यात आलेली आहे. एकलव्य विद्यालय ईयत्ता 6 ते ईयत्ता 12 या वर्गासाठी स्थापित करण्यात आलेले आहे . देशभरात या विद्यालयाच्या एकूण 694 तर महाराष्ट्रामध्ये एकूण 37 शाळा आहेत. स्वप्निल सुरवसे हे गेवराई बाजार समितीमध्ये महत्वाचे कामकाज जबाबदारीने पार पाडत असताना कार्यालयीन अवधी संपल्यानंतर मिळालेल्या वेळेचे नियोजन करून ते अभ्यास करत आलेले आहेत.

   नियमित अभ्यास आणि एन सी ई आर टी पुस्तकांना प्राधान्य यामुळे त्यांनी शिक्षक पदासाठीच्या अभ्यासक्रमानुसार रणनीती आखून हे यश संपादन केले आहे. स्वप्निल यांचे शालेय शिक्षण जगदंबा शिक्षण प्रसारक मंडळाच्या शारदा विद्या मंदीर, गेवराई येथून झालेले असून त्यांनी बी.एड. ची पदवी पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर अध्यापक महाविद्यालय शिवाजीनगर, गढी येथून पुर्ण केलेली आहे. त्यांनी सन 2018 या वर्षी केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षा उत्तीर्ण झाल्या नंतर शिक्षक होण्यासाठीचा अभ्यास सुरू केला होता. काही वर्षाच्या खंडानंतर मागिल वर्षी नवोदय विद्यालय, केंद्रीय विद्यालय व एकलव्य विद्यालय यासाठीच्या एका मागून एक आलेल्या जाहिरातीमुळे केंद्र शासनाचे शिक्षक होऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी संधी उपलब्ध झाली होती.

यातील शिक्षा मंत्रालय,भारत सरकार संचलित केंद्रीय विद्यालय संघटन यांच्या मार्फत निघालेल्या 2023 या वर्षीच्या भरती प्रक्रियेमध्ये ट्रेन्ड ग्रॅच्युएट टीचर सामाजिक अध्ययन – गट ब या पदासाठी स्वप्निल यांनी केंद्रीय विद्यालय जेएनयू कॅम्पस, नवी दिल्ली या ठिकाणी मुलाखत दिलेली होती.परंतु त्यांची अंतिम यादी मध्ये निवड होऊ शकली नाही. यावर खचून न जाता स्पर्धा परीक्षेसाठी आवश्यक संयम अंगी ठेवून शिक्षकी पेशात जाण्यासाठीचे प्रयत्न त्यांनी सुरूच ठेवले.आणि अभ्यासातील सातत्य, ऑनलाईन क्लासेसचा योग्य उपयोग करून घेत प्रामाणिक मेहनतीच्या जोरावर आपली ईच्छा पूर्ण केली.त्यांच्या या यशाबद्दल अमरसिंह पंडित, विजयसिंह पंडित, रणवीर पंडित,भाऊसाहेब नाटकर, जगन पाटील काळे, बाजार समितीचे सभापती मुजीब पठाण, उपसभापती विकास सानप, सचिव गंगाभिषण शिंदे,व सर्व संचालक मंडळ यांनी कौतुक करत अभिनंदन केले आहे.

बाजार समितीतील प्रशासकीय कामकाजाचा पुढील सेवेमध्ये निश्चितच लाभ होणार आहे. नोकरीच्या कार्यकाळात देशभर जिथे जिथे पोस्टिंग मिळेल त्या राज्याची व आदिवासी समाजाची भाषा, संस्कृती जाणून घेवून त्याच्याशी जुळवून घेण्याचा प्रामाणिक प्रयत्न करणार आहे. तसेच समाजातील मुख्य प्रवाहापासून वंचित असणाऱ्या आदिवासी समूहातील विदयार्थ्यांना गुणवत्तापूर्ण आधुनिक शिक्षण देवून भारत देशाचे जबाबदार नागरिक बनवण्यासाठी काम करता येणार असल्याने आनंद होत आहे.
– स्वप्निल सेनापती सुरवसे,शिक्षक, ईएमआरएस 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *