
अतितटीच्या लढतीत बजरंग सोनवणे विजयी
बीड दि.4 (प्रतिनिधी): आठराव्या लोकसभेसाठी बीड लोकसभा मतदारसंघात झालेल्या अत्यंत अतितटीच्या निवडणूकीत राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार)चे उमेदवार बजरंग सोनवणे यांनी भाजपला धक्का देत ऐतिहासिक विजय मिळविला आहे.भाजप उमेदवार पंकजा मुंडे यांचा त्यांनी 6553 मतांनी पराभव केला.2009 पासून भाजपच्या ताब्यात असलेला हा मतदारसंघ भाजपकडून हिसकावून घेण्यात राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाला यश आले आहे.बजरंग सोनवणे यांना 6 लाख 83 हजार 950 मते मिळाली तर त्यांच्या प्रतिस्पर्धी पंकजा मुंडे यांना 6 लाख 77 हजार 397 इतकी मते मिळाली. बजरंग सोनवणे यांच्या या ऐतिहासिक विजयानंतर जिल्हाभरात उत्साहाचे वातावरण आहे.
बीड लोकसभा मतदारसंघाची निवडणुक जाहीर झाल्यापासूनच चुरसीची होती. भाजपने या मतदारसंघात आपला उमेदवार बदलत प्रितम मुंडे यांच्या ऐवजी पंकजा मुंडे यांना उमेदवारी दिली होती तर राष्ट्रवादी काँग्रेस(शरचंद्र पवार) पक्षाने बजरंग सोनवणे यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरविले होते. सोनवणे यांनी मागची निवडणुक प्रितम मुंडे यांच्या विरोधात लढविली होती. त्यात त्यांचा पराभव झाला होता. पाच वर्षानंतर सोनवणे यांनी त्या पराभवाचा वचपा काढला आहे तसेच 32 व्या फेरीत बजरंग सोनवणे विजयी झाल्यानंतर पंकजा मुंडे यांनी फेर मत मोजणीचा अर्ज दिला होता यामुळे बीड चा निकाल जाहिर करण्यात जिल्हा प्रशासनाला उशीर झाला होता परंतू या फेर मतमोजणी नंतरही बजरंग सोनवणे हे आघाडीवर राहिले आणि ते विजयी झाले आहेत.