एक कोटींची लाच मागितल्या प्रकरणी अर्थिक गून्हे शाखेचा कर्मचारी ताब्याब
जालन्याच्या एसीबीची कार्यवाई
बीड दि.15 ( वार्ताहार ): बीड जिल्ह्यात काही महिन्यापूर्वी एलसीबीच्या कर्मचार्याला लाच घेताना पकडण्यात आले होते. त्यानंतर आता आर्थिक गुन्हे शाखाच अडचणीत आली आहे. एका मल्टीस्टेटच्या प्रकरणात सहकार्य करण्यासाठी तब्बल 1 कोटी रुपयांची लाच मागितल्या प्रकरणी आर्थिक गुन्हे शाखेच्या एका कर्मचार्यावर जालन्याच्या एसीबीने कारवाई केल्याची माहिती आहे. विशेष म्हणजे या प्रकरणाचे धागेदोरे या शाखेच्या पोलीस निरीक्षकापर्यंत पोहोचत असल्याची सूत्रांची माहिती आहे. पोलीस निरीक्षक हरिभाऊ खाडे मात्र सध्या बीड जिल्ह्यात नसून त्यांच्याशी संपर्क होत नसल्याचे चित्र आहे.
बीड जिल्हा पोलीस दलात लाचखोरीचे प्रमाण मोठ्या प्रमाणावर वाढले आहे. त्यातच आर्थिक गुन्हे शाखा तर पैसे कमविण्याचे कुरण झाल्याची चर्चा यापूर्वी अनेकदा होती.जिल्ह्यात मागच्या काही काळात मल्टीस्टेटचे अनेक घोटाळे समोर आले. त्यात आर्थिक गुन्हे शाखेची भुमिका कायम संशयास्पद राहिली.त्यातच आता एका मल्टीस्टेटच्या प्रकरणात सहकार्य करण्यासाठी तब्बल 1 कोटी रुपयांच्या लाचेची मागणी आर्थिक गुन्हे शाखेकडून करण्यात आली होती.या बाबतची तक्रार एसीबीच्या जालना येथील पथकाला सोपविण्यात आली. त्यानंतर जालना एसीबीच्या एका पथकाने बीडच्या आर्थिक गुन्हे शाखेतून एका कर्मचार्याभोवती जाळे टाकले असून त्याच्यावर कारवाई करण्यात आल्याची माहिती आहे. भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्याच्या कलम 12 नुसार या प्रकरणात आर्थिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक हरिभाऊ खाडे हे देखील संशयाच्या भोवर्यात अडकले आहेत.इतरही काही मल्टिस्टेटच्या प्रकरणात हरिभाऊ खाडे चक्क मल्टिस्टेट चालकांसोबतच असल्याचे चित्र आहे. गेवराई मधील एका मल्टिस्टेटच्या संदर्भाने दाखल गुन्ह्यात आरोपी शहरात फिरत असतांनाही आर्थिक गुन्हे शाखेने मात्र आरोपी फरार असल्याचे सांगत दोषारोपपत्र दाखल केले होते.असे अनेक कारनामे आता समोर येवू लागले आहेत.
दरम्यान या घटनेनंतर हरिभाऊ खाडेच्या काही ठिकाणच्या मालमत्तांवर देखील छापे मारण्यात आल्याची माहिती आहे. रात्री उशिरापर्यंत या प्रकरणात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.