
वाळूचा हायवा चालू देण्यासाठी मागितली लाच
स्थानिक गून्हे शाखेच्या कर्मचाऱ्यांवर गून्हा दाखल
गेवराई दि 7 ( वार्ताहार ) जिल्ह्यात वाळु तस्करीला पोलीसिंचेच आशीर्वाद असल्याचे लपून राहिलेले नाही. त्यातच आता वाळूचा हायवा चालू देण्यासाठी खाजगी व्यक्तीच्या माध्यमातून लाच घेतल्याप्रकरणी बीडच्या एसीबीने स्थानिक गुन्हे शाखेच्या (LCB )कर्मचाऱ्याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. एका हायवा चालकाकडून गेवराईत 15 हजाराची लाच घेण्यात आली.
बीड जिल्ह्यात वाळूची तस्करी सर्रास सुरु आहे. यासाठी पोलीसांना देखील हप्ते असल्याचे नेहमीच बोलले जाते. त्यातच आता संगम जळगाव ता. गेवराई येथील हायवा चालकास गोदावरी पात्रातून अवैध वाळू उपसा करून शेवगाव जि. नगरमध्ये वाहतूक करण्यासाठी एलसीबीचा कर्मचारी मुकेश गुंजाळ याने 15 हजाराची लाच मागितली. सदरची लाच मुकेश गुंजाळ याच्यासाठी स्वीकारताना एसीबी अर्थात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने गेवराईत हॉटेल साईचा मालक प्रमोद कोठेकर याला रंगेहाथ पकडले.या प्रकरणी पोलीसासह खाजगी व्यक्तीविरुध्द गेवराई पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला जात आहे. सदरची कारवाई सापळा अधिकारी गुलाब बाचेवाड पोलीस निरीक्षक यांनी संदीप आटोळे, पोलीस अधीक्षक,ला.प्र.वि शंकर शिंदे, पोलिस उप अधीक्षक, ला.प्र.वि.बीड यांच्या मार्गदर्शनाखाली व श्रीराम गिराम,अमोल खरसाडे, अविनाश गवळी, गणेश मेहेत्रे, अंबादास पुरी, स्नेहल कोरडे ला. प्र. वि.बीड यांच्या साहाय्याने केली.