January 22, 2025

कारवाई झाली नाही तर आंदोलन अजून तीव्र करणार – विजयसिंह पंडित

गेवराई नगर परिषदेतील भ्रष्टाचाराची विजयसिंह पंडितांनी केली पोलखोल

गेवराई दि ८ ( वार्ताहार ) नगर परिषदेत झालेल्या कोट्यावधी रुपयांच्या आर्थिक गैरव्यवहार, भ्रष्टाचार व अनियमितता प्रकरणाचा पाढा माजी जिल्हा परिषद अध्यक्ष विजयसिंह पंडित यांनी नगर परिषदेसमोर अंदोलन करुन वाचला. यावेळी ते म्हणाले की, शहरातील जलतरण तलाव आणि नाट्यगृह बांधकामाची मुदत संपलेली असतानाही ते सार्वजनिक वापरासाठी खुले होत नाहीत, परिवहन विभागाच्या जागेवर नगर परिषद बेकायदेशीररित्या करत असलेली विकास कामे यांसह विविध भ्रष्टाचारांच्या मुद्यांबाबत दोषीविरुध्द कारवाई करण्याची मागणी विजयसिंह पंडित यांनी करुन कारवाई झाली नाही तर येणाऱ्या काळित हे आंदोलन अधिक तीव्र केले जाईल असा इशारा त्यांनी दिला. नगर परिषदेच्या समोर केलेल्या आंदोलन ते बोलत होते.

गेवराई शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्यावतीने विजयसिंह पंडित यांच्या नेतृत्वाखाली गुरुवार, दि.७ डिसेंबर रोजी नगर परिषद कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले‌. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.यावेळी बोलताना विजयसिंह पंडित पुढे म्हणाले की, गेवराई नगर परिषद आपल्या बापाची जहागिरी आहे अशा आविर्भावात विद्यमान लोकप्रतिनिधी वागत आहेत. हम करे सो कायदा ते राबवताना दिसत असून आम्ही हे सहन करणार नाही. या तालुक्यातील मायबाप मतदारांनी आपल्याला निवडून दिले याचे भान त्यांना राहिले नाही. त्यांनी जनतेच्या रक्षणकर्ता या भुमिकेत असावे, मात्र ते शहर भक्षकस्थानी असल्याचा सनसनाटी आरोप त्यांनी यावेळी केला.

गेवराई नगर परिषदेतील अनियमिततेचा पाडा वाचताना विजयसिंह पंडित पुढे म्हणाले की, गेवराई शहरातील जलतरण तलाव आणि नाट्यगृहाचे काम कंत्राटदाराने मुदतीत पूर्ण केलेले नाही, वारंवार या कामाला बेकायदेशीररित्या मुदतवाढ दिली गेलेली आहे. कंत्राटदाराला पाठिशी घालणाऱ्या विरुध्द कारवाई करा आणि जलतरण तलाव व नाट्यगृह सार्वजनिक वापरासाठी तात्काळ खुले करा अशी मागणी करुन केवळ निवडणुकीसाठी या कामांचा सार्वजनिक वापर सत्ताधाऱ्यांनी रखडविला असून शहरातील जनतेला त्याच्या रास्त वापरापासून वंचित ठेवल्याचा आरोपही त्यांनी केला. गेवराई शहरातील जुन्या बसस्थानकाची जागा राज्यमार्ग परिवहन महामंडळाची असून या जागेसंदर्भात न्यायालयात वाद सुरु आहे. असे असतानाही नगर परिषदेचे प्रशासक या जागेवर शासकीय निधीतून रस्त्याचे काम कसे करू शकतात ? असा प्रश्न उपस्थित करून नव्याने जुन्या बसस्थानकाच्या जागेवर कोण अतिक्रमण करत आहे ? असा सवाल उपस्थित करून त्याची चौकशी करण्याची मागणी त्यांनी यावेळी केली‌. नगर पालिकेत सुरु असलेल्या आर्थिक गैरव्यवहार, भ्रष्टाचार व अनियमितता प्रकरणी पालिका बरखास्त करून दोषीविरुध्द कारवाई करण्याची मागणी सन २०२० पासून पुराव्यासह केली जात आहे. भाजपचे आ.लक्ष्मण पवार यांच्या राजकीय दबावापोटी कारवाईला मोठा विलंब झाला. त्यामुळे तक्रारदाराला उच्च न्यायालयात दोनवेळा रिट याचिका दाखल करावी लागली.जिल्हाधिकाऱ्यांनी दि.०२/१२/२०२२ रोजी कारवाईचे आदेश पारीत करूनही आजवर कोणतीही कारवाई झाली नाही. गेवराई शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्यावतीने यापूर्वी प्रशासक तथा मुख्याधिकारी यांना निवेदन देवून प्रकरणातील दोषीविरुध्द कारवाई करण्याची मागणी केली होती. करोडो रुपयांचा झालेला भ्रष्टाचार आणि राजकीय वरदहस्त यामुळे दोषीविरुध्द कारवाई होत नाही. यापुढील काळात कारवाई झाली नाही तर येणाऱ्या काळात शहर राष्ट्रवादीच्या माध्यमातून तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही त्यांनी यावेळी दिला.

याप्रसंगी नगर परिषदेचे मुख्याधिकारी तथा प्रशासक यांना निवेदन दिले. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे शहराध्यक्ष दिपक आतकरे, सभापती मुजीब पठाण, युवानेते रणवीर पंडित, नगरसेवक शाम येवले, शेख खाजाभाई, शांतीलाल पिसाळ, संतोष आंधळे, जिजा पंडित, सरवर पठाण, दिनेश घोडके, दत्ता पिसाळ, कांता नवपुते, दत्ता दाभाडे, संजय पुरणपोळे, शाम रुकर, सजय दाभाडे,बाळु दाभाडे,धम्मापाल भोले, जे.के.बाबुभाई, गोरख शिंदे, रवी कानडे, प्रकाश साळवे, संदिप मडके, सोमनाथ घार्गे, शेख शारेकभाई, अमीत वैद्य, नजीब सय्यद, विलास निकम, अक्षय पवार, नविद मशाएक, राजु पठाण, शेख मोहसीन, रफिक बागवान, बाबासाहेब दाभाडे, महेश मोटे, कृष्णा गळगुंडे, वसिम फारुकी, शाहारुख पठाण, बाबा शेख, आनंद दाभाडे, संकेत कांडेकर, शेख रहीम, रजनी सुतार, विजय सुतार, सुनील सुतार, जयसिंग माने, भागवत परळकर, वैभव दाभाडे यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *