January 22, 2025

बी.आर.एस. पक्षाचे काम थांबव, नसता गोळ्या घालून दाभोळकर करु

बाळासाहेब मस्के, मयुरी खेडकर – मस्के यांना निनावी पत्राद्वारे धमकी

गेवराई : दि 19 (वार्ताहार ) तुम्ही दोघे नवरा-बायको तालुक्यात शिबीर घेऊन आमच्या नेत्यांचे खच्चीकरण करत आहात. त्यामुळे बीआरएस पक्षाचे काम थांबव, नसता गोळ्या घालून दाभोळकर करु अशी धमकी बाळासाहेब मस्के, मयुरीताई खेडकर – मस्के यांना निनावी पत्राद्वारे देण्यात आल्याने तालुक्यात मोठी खळबळ उडाली आहे. या पत्रात अत्यंत खालची भाषा वापरून खोट्या केसेसमध्ये अडकवून जेलमध्ये टाकण्याची धमकी देखील देण्यात आली आहे. याप्रकरणी बाळासाहेब मस्के यांनी माझ्यासह माझ्या कुटुंबातील सदस्यांच्या जिवीतास धोका असल्याची तक्रार दिल्यानंतर अज्ञात व्यक्तीविरोधात गेवराई पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

बी.आर.एस. पक्षाच्या गेवराई विधानसभा समन्वयक मयुरीताई मस्के व बी.एम. प्रतिष्ठाणचे अध्यक्ष तथा दैनिक पुण्यभूमीचे संपादक बाळासाहेब मस्के हे सध्या गेवराई तालुक्यात गाव तेथे आरोग्य शिबीर घेत आहेत. या शिबिराला गावोगाव मोठा प्रतिसाद मिळत असून हजारो लोक शिबिराचा लाभ घेत असल्याचे दिसत आहे. त्यामुळे बी.आर.एस. पक्ष संघटना गेवराई तालुक्यात वाढत असताना मंगळवारी बाळासाहेब मस्के व मयुरी खेडकर – मस्के यांना निनावी पत्राद्वारे जिवे मारण्याची धमकी देण्यात आल्याने तालुक्यात मोठी खळबळ उडाली आहे. या निनावी पत्रात बाळासाहेब मस्के यांना खालच्या पातळीवरील भाषा वापरत तु बी.आर.एस. पक्षात जाऊन जास्त माजलास का, तुला जास्त झालय का, तु गावोगाव शिबीर घेऊन आमच्या नेत्यांचं खच्चीकरण करत आहे. त्यामुळे तु करत असलेलं राजकारण बंद कर, नसता आमच्या नेत्याचा आदेश आल्यावर तुला गोळ्या घालून तुझा दाभोलकर करु अशी धमकी देऊन अत्यंत खालची भाषा वापरली आहे. तसेच शिबीर बंद केले नाही तर खोट्या केसेसमध्ये अडकवून जेलमध्ये टाकण्याची धमकी देखील देण्यात आली आहे. याप्रकरणी बाळासाहेब मस्के यांनी माझ्यासह माझ्या कुटुंबातील सदस्यांच्या जिवीतास धोका असल्याची तक्रार दिल्यानंतर अज्ञात व्यक्तीविरोधात गेवराई पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

धमकी देणाऱ्याला अटक करा, नसता रस्त्यावर उतरु भारत राष्ट्र समिती पक्षाच्या माध्यमातून बाळासाहेब मस्के व मयुरीताई खेडकर – मस्के या गावोगावी जाऊन गोरगरीबांसाठी शिबीर घेत आहेत. या शिबिराला तालुक्यात मोठा प्रतिसाद मिळत आहे, मात्र हे विरोधकांच्या डोळ्यात खुपत असल्याने अशा लपून निनावी धमक्या देण्यात येत आहे. तरी घरात लपून धमकी देणाऱ्याला पोलिसांनी तात्काळ अटक करावी, नसता बीआरएस पक्ष रस्त्यावर उतरून तिव्र आंदोलन छेडेल, असा इशारा पदाधिकाऱ्यांनी दिला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *