धनंजय मुंडेंच्या कृषीमंत्री पदाचा लाभ सामान्य शेतकऱ्यांना मिळेल – अमरसिंह पंडित
संशोधकांच्या उपस्थितीत गेवराईत मोसंबी विकास परिसंवादाचे आयोजन
गेवराई, दि.१९ ( वार्ताहार ) ना.धनंजय मुंडे यांच्या माध्यमातून बीड जिल्ह्याला मिळालेल्या कृषीमंत्री पदाचा लाभ सर्वसामान्य शेतकऱ्यांना मिळवून देण्यासाठी आम्ही कटिबध्द आहोत. मोसंबी उत्पादक शेतकऱ्यांना येणाऱ्या अडचणींच्या पार्श्वभुमीवर मोसंबी विकास परिसंवादाचे आयोजन करण्यात आले. कृषीमंत्री धनंजय मुंडे यांच्या निर्देशामुळे तज्ञ संशोधकांचे मार्गदर्शन शेतकऱ्यांना लाभत असून लवकरच मोसंबी उत्पादक शेतकऱ्यांचे प्रश्न त्यांच्यासमोर मांडणार असून शेतकरी हिताचा निर्णय नक्की होईल असा विश्वास अमरसिंह पंडित यांनी व्यक्त केला. तज्ञ संशोधकांच्या उपस्थितीत आयोजित केलेल्या मोसंबी विकास परिसंवादात ते बोलत होते. यावेळी मोसंबी उत्पादक शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
गेवराई तालुक्यात मोसंबी फळबागांवर पडलेल्या गळ रोगामुळे अनेक शेतकरी मोसंबीची बाग मोडीत काढण्याच्या तयारीत होते, या पार्श्वभुमीवर जय भवानी सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन अमरसिंह पंडित यांनी शारदा प्रतिष्ठानच्या माध्यमातून गेवराई येथे मोसंबी विकास परिसवांदाचे आयोजन केले. यावेळी बदनापूर येथील मोसंबी संशोधन केंद्राचे प्रभारी अधिकारी डॉ.संजय पाटील, खामगाव येथील कृषी विज्ञान केंद्राच्या प्रमुख दिप्ती पाटेगावकर, मोसंबी संशोधक डॉ.गणेश मंडलिक, फळबाग तज्ञ डॉ.दिपक कछवे, उपविभागीय कृषी अधिकारी शिवप्रसाद संगेकर, फळपिक विमा कंपनीचे जिल्हा प्रतिनिधी बाबासाहेब वायभसे यांच्यासह कृषी विभागातील अधिकारी उपस्थित होते. कृषीमंत्री धनंजय मुंडे यांनी त्यांचे विशेष कार्य अधिकारी संजय केंद्रे यांना या कार्यक्रमासाठी आवर्जून पाठविले होते. कार्यक्रमाला गेवराई तालुक्यातील सुमारे तीनशेहून अधिक मोसंबी उत्पादक शेतकरी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना माजी आ.अमरसिंह पंडित यांनी मोसंबी उत्पादक शेतकऱ्यांच्या अडचणी सांगताना कृषी विज्ञान केंद्रातील तज्ञांचे अडचणीच्या काळातही शेतकऱ्यांना मार्गदर्शन मिळत नसल्याची खंत व्यक्त केली. कृषी विद्यापीठातील एका बैठकीत मोसंबी संशोधन केंद्राचे अधिकारी व्यस्त असतानाही कृषीमंत्री धनंजय मुंडे यांनी त्यांना त्यांची बैठक रद्द करून शेतकऱ्यांसाठी गेवराईत पाठविल्याबद्दल आपल्या भाषणात अमरसिंह पंडित यांनी धनंजय मुंडे यांचे आभार व्यक्त केले. ना.धनंजय मुंडे यांच्या माध्यमातून बीड जिल्ह्याला मिळालेल्या कृषीमंत्री पदाचा लाभ सर्वसामान्य शेतकऱ्यांना मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचेही त्यांनी सांगितले. किड रोग, फळगळ, मृगबहार यासंदर्भात मोसंबी फळपिक विमा धारक शेतकऱ्यांना तक्रार करता येत नाही, त्याचा पंचनामाही होत नाही, त्यामुळे यातून मार्ग काढण्यासाठी कृषीमंत्र्यांच्या माध्यमातून प्रयत्न करून मोसंबी उत्पादक शेतकऱ्यांना पिक विम्याचे संरक्षण मिळवून देण्याचे आश्वासन अमरसिंह पंडित यांनी दिले. कार्यक्रमात मोसंबी उत्पादक शेतकऱ्यांनी उपस्थित केलेल्या शंकांचे निरसन संशोधक व तज्ञांनी केले, संजय केंद्रे यांनी कृषीमंत्र्यांची भुमिका विषद केली.
मोसंबी संशोधन केंद्राचे प्रभारी अधिकारी डॉ.संजय पाटील यांनी सांगितले की, मराठवाड्यातील मोसंबी फळपिकाला भौगोलिक मानांकन प्राप्त झाले असून त्याची चव देशभरात नावाजलेली आहे. सध्या फळगळीमुळे मोसंबी उत्पादक शेतकरी त्रस्त असला तरी प्रत्येक समस्येला उत्तर असून शेतकऱ्यांनी तंत्रज्ञानाची कास धरली पाहिजे. अमरसिंह पंडित यांच्यासारख्या दूरदृष्टीच्या नेत्यांनी तळमळीने लक्ष देवून या परिसंवादाचे आयोजन केले आहे त्याचा लाभ शेतकऱ्यांना मिळेल. शेतकऱ्यांनी मोसंबीची लागवड करताना काळजी घेण्याची गरज आहे. झाडांमध्ये रोग प्रतिकारक क्षमता निर्माण करून खोडांना बोर्डोपेस्ट करण्याचे सांगताना त्यांनी मोसंबी उत्पादक शेतकऱ्यांसमोर आधुनिक तंत्रज्ञानाच्या नाविण्यपूर्ण संकल्पना मांडल्या. यावेळी डॉ.दिनेश मंडलिक, संजय केंद्रे, दिप्ती पाटेगावकर यांनी उपस्थित शेतकऱ्यांशी संवाद साधून त्यांच्या शंकांचे निरसन केले.
कार्यक्रमाला मोसंबी उत्पादक शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. भविष्यातही फळबाग आणि इतर शेतीच्या संदर्भात तज्ञांच्या उपस्थितीत परिसंवादाचे आयोजन शारदा प्रतिष्ठान करेल असे आश्वासन अमरसिंह पंडित यांनी दिले. सुत्रसंचलन माधव चाटे यांनी केले.